Skip to main content
x

गोडबोले, रामचंद्र विष्णुपंत

स्वामी स्वरूपानंद

     स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक काळातील साक्षात्कारी महापुरुष होत. स्वामी स्वरूपानंदांचे मूळ नाव रामचंद्र विष्णुपंत गोडबोले होते. त्यांच्या आईचे नाव रखुमाबाई हे होते. स्वरूपानंदांचा जन्म पावस (जि. रत्नागिरी) येथे (मार्गशीर्ष वद्य द्वादशी) रोजी झाला. पावस येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर ते रत्नागिरीस व तेथून पुढे मुंबईस माध्यमिक शिक्षणासाठी गेले. मुंबईस ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात त्यांना श्री. घारपुरे या नावाचे तपोवृद्ध शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे स्वरूपानंदांना शालेय जीवनातच गीता, ज्ञानेश्वरी, गीतारहस्य इत्यादी ग्रंथांची गोडी लागली. स्वामी स्वरूपानंदांना लोकमान्य टिळकांबद्दल नितांत प्रेम होते. ‘केसरी’च्या वाचनाने त्यांनीही राष्ट्रकार्यार्थ जीवन-समर्पण करण्याचा निश्चय केला. टिळकांनंतर महात्मा गांधी यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांनी कार्य सुरू केले.

     राष्ट्रीय-मेळे, चरखा, स्वावलंबन, राष्ट्रीय-शिक्षण इत्यादी मार्ग त्यांनीही अवलंबिले. १९३० साली त्यांनी सत्याग्रहातही भाग घेतला. त्यांना येरवडा येथील कारावासात ठेवण्यात आले. या प्रसंगाच्या आधीच स्वामीजींना श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांच्याकडून सांप्रदायिक गुरूपदेश मिळाला होता. त्या वेळी स्वामीजी केवळ वीस वर्षांचे होते. बाबामहाराजांनी म्हटले होते, ‘‘विरजण लावले आहे, दूध आता दूध राहिले नाही; पण दही व्हायला वेळ लागणारच!’’ ‘दही होण्याची’, ‘मंथन होण्याची’ नि ‘नवनीत येण्याची’ साधना दीर्घकाळ करावी लागते.

     स्वामीजी कारावासातही आध्यात्मिक साधना करीत. स्वामीजींची सद्गुरूंवर नितांत निष्ठा होती. बाबामहाराज नित्य ज्ञानेश्वरी वाचत. त्यांची पोथी जीर्ण झाली होती. १९२८ सालच्या सुमारास स्वामीजींनी उत्कृष्ट हस्ताक्षरात आणि पूर्ण निर्दोष अशी समग्र ज्ञानेश्वरी लिहून ‘श्रीं’ना अर्पण केली. स्वामींनी आपल्या सद्गुरूंना ‘नवरत्नहार’— अनुभूतिपर नऊ ओव्या — अर्पण केल्या. तेव्हा गुरुदेवांनीच त्यांना ‘स्वरूपानंद’ या नावाने संबोधिले. यानंतर स्वामीजी पावस येथे आले आणि आजारी पडले. ते सहा महिने अंथरुणावर खिळून होते. या आजारात त्यांनी ‘अमृतधारा’ नावाचे काव्य लिहिले. त्यात त्यांनी लिहिले आहे :

     शुक्ल पक्ष भृगु-वासर रात्रौ आषाढीची नवमी ।

     अठराशे छप्पन्न शकाब्दीं मृत्यु पावलो आम्ही ॥

     (आषाढ शुद्ध नवमी, शुक्रवारी रात्री आम्ही मृत्यू पावलो; शके १८५६.) म्हणजे इ.स. १९३४ ची ही घटना आहे. त्या वेळी ‘अहंकाराचे पूर्ण निर्वाण’ झाले! त्यांची आध्यात्मिक ‘सोऽहं साधना’ आणि अनुभूती पराकोटीला पोहोचली. त्यानंतर ते ‘पावस’ येथेच राहिले. हळूहळू त्यांचा कीर्ति-सुगंध पसरू लागला. ते सांप्रदायिक दीक्षा देऊ लागले. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. त्यात स्वामी अमलानंद, स्वामी सत्यदेवानंद, स्वामी माधवनाथ ही प्रसिद्ध मंडळी होती. त्यांनी हा संप्रदाय पुढे चालवला.

     स्वामी स्वरूपानंदांनी ‘अभंग ज्ञानेश्वरी’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘अभंग अमृतानुभव’, ‘भावार्थ गीता’, ‘चांगदेव पासष्टी’ असे काही अनुवादात्मक ग्रंथ लिहिले. ‘भावार्थगीता’ हे गीतेवरील ज्ञानेश्वरीला धरून भाष्यच आहे. स्वरूपानंदांची भाषा अत्यंत ओघवती आणि प्रासादिक आहे. त्यांनी ‘ज्ञानेश्वरी-नित्यपाठ’ हा ज्ञानेश्वरीतील निवडक १०८ ओव्यांचा ‘पाठ’ सिद्ध केला आहे. हे संपादन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्ञानेश्वरीची समग्र आध्यात्मिक शिकवण ध्यानी यावी या पद्धतीने ओव्यांची निवड व रचना केली आहे. साधकांसाठी तो एक स्वतंत्र चिंतनशील ग्रंथ आहे. ती केवळ मांडणी नाही, केवळ निवड नाही, तर ती एक आध्यात्मिक पाठांची अनुक्रमणिका आहे. याखेरीज स्वामी स्वरूपानंदांनी स्वतंत्र अभंग रचना केली आहे, ती ‘संजीवनी गाथा’ म्हणून प्रसिद्ध आहे. संजीवनी गाथेत दोनशे एकसष्ट (२६१) अभंग आहेत. ‘अमृतधारा’ या साकीबद्ध ग्रंथात त्यांच्या आजारपणात आलेले आध्यात्मिक अनुभव ग्रथित आहेत. त्यांची ‘तीन प्रवचने’ही प्रसिद्ध आहेत. याखेरीज स्वामीजींनी आपल्या शिष्य-परिवाराला वेळोवेळी जी पत्रे लिहिली, ती ‘स्वरूप-पत्र-मंजूषा’ या नावाने संग्रहित व विषयानुसार संपादित केलेली आहेत. (संपादक : स्वामी सत्यदेवानंद)

     श्री स्वामी स्वरूपानंदांनी १५ ऑगस्ट १९७४ या दिवशी समाधी घेतली. त्यांची समाधी ‘पावस’ (जि. रत्नागिरी) येथे आहे. स्वामी स्वरूपानंदांची गुरुपरंपरा अशी : आदिनाथ-मत्स्येंद्र-गोरक्ष-गहिनी-निवृत्ती-ज्ञानदेव-देव-चुडामणी-गुंडाख्य-रामचंद्र-महादेव-रामचंद्र-विश्वनाथ-गणेश-स्वामी स्वरूपानंद.

डॉ. वि.. कुलकर्णी

गोडबोले, रामचंद्र विष्णुपंत