Skip to main content
x

गोडसे, दत्तात्रेय गणेश

           चित्रकलेबरोबरच उपयोजित कला, नेपथ्य, लोककला, इतिहास अशा विविध क्षेत्रांत रमलेले कलामीमांसक दत्तात्रेय गणेश गोडसे यांचा जन्म खानदेशातील वढोदे या गावी झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे पणजोबा होते. त्यांचे वडील गणेश गोडसे यांची शेतीवाडी होती व दिंडी दरवाजा असलेला प्रशस्त वाडा होता. सावनेरजवळच आदासा हे त्यांचे गाव. गोडसे यांचे शालेय शिक्षण सावनेर आणि नागपूर इथे झाले. चित्रकलेची आवड त्यांना लहानपणापासून होती. लोककलेचा आणि ग्रमसंस्कृतीचा ठसा त्यांच्या बालमनावर उमटल्याने उत्तरायुष्यात तो त्यांचा, कलातत्त्वांच्या शोधाचा ध्यासविषय बनला.

           गोडसे यांचे उच्च शिक्षण नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात आणि मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. विल्सन महाविद्यालयाजवळच चित्रकार सा.ल. हळदणकर राहायचे. त्यांच्याकडे गोडसे यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले.

           मराठी व इंग्रजी घेऊन बी.ए. झाल्यावर गोडसे कलाशिक्षणासाठी लंडनच्या स्लेड स्कूलमध्ये दाखल झाले. तिथे अभ्यास म्हणून केलेल्या रेखाटनांमधून गोडसे यांनी रेषेवर प्रभुत्व मिळवले. दुसरे महायुद्ध सुरू होण्याची चिन्हे दिसू लागताच गोडसे अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परतले. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तसमूहाच्या कला विभागामध्ये त्यांनी होतकरू चित्रकार म्हणून प्रवेश मिळवला.

           वॉल्टर लँगहॅमर यांची नुकतीच टाइम्समध्ये नियुक्ती झाली होती. त्यांनी गोडशांची आठ दिवस कसून चाचणी घेतली आणि पराकाष्ठेची मेहनत करण्याच्या अटीवर त्यांना टाइम्समध्ये सामावून घेतले. जवळपास सहा वर्षे गोडशांनी लँगहॅमर ह्यांच्या हाताखाली शिष्यासारखे काम केले. लँगहॅमर ह्यांच्याकडे अभिजात चित्रकाराचे गुण होते आणि उपयोजित चित्रकलेच्या तंत्रातही ते निष्णात होते. गोडसे त्यामुळेच प्रकाशनकला आणि जाहिरातीच्या क्षेत्रात इलस्ट्रेशनचे आणि जाहिरात संकल्पनाचे काम उत्तम प्रकारे करू शकले.

           टाइम्समधून बाहेर पडल्यावर गोडसे यांनी दोन-अडीच वर्षे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यात (ब्रॉडकास्टिंग अ‍ॅण्ड इन्फर्मेशन, पब्लिकेशन डिव्हिजन) काम केले. स्ट्रोनॅक्स, एव्हरेस्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग, प्रेस सिंडिकेट इत्यादी जाहिरात - संस्थांमध्येही त्यांनी काम केले. काही काळ त्यांनी ‘डीजीजी’ या नावाने स्वतंत्र स्टूडिओदेखील चालवला. बडोदा (वडोदरा) येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात १९६७ ते १९७४ पर्यंत गोडसे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. तिथून निवृत्त झाल्यावर मुंबई विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सौंदर्यशास्त्र शिकवायला गोडसे जात असत.

           द.ग. गोडसे यांच्यासारख्या चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यासंगी कलावंताच्या कार्यक्षेत्राचे मुख्यतः तीन पैलू आहेत. उपयोजित चित्रकलेतील त्यांचे काम, नाटकाचे नेपथ्य व नाट्यलेखन आणि मूलभूत तत्त्वशोध असलेली कलामीमांसा. याशिवाय ललितलेखन, इतिहाससंशोधन अशा आसपासच्या क्षेत्रांतही त्यांनी लीलया संचार केला. उत्कट संवेदनक्षमता, कल्पनाशक्तीची जोड असलेली स्वयंप्रज्ञा आणि कामाचा झपाटा यांमुळे गोडसे यांचे लेखन झपाटून टाकते आणि विचारशक्तीला चालनाही देते.

           गोडसे यांनी टाइम्समध्ये असताना कथाचित्रांची, इलस्ट्र्ेशन्सची अनेक कामे केली. त्याच वेळी मौज, पॉप्युलर, ढवळे अशा प्रकाशनांसाठी त्यांनी पुस्तकांची मुखपृष्ठे आणि नियतकालिकांसाठी अंतर्गत मांडणीही केली. गोडसे यांच्या इलस्ट्रेशन्सवर लँगहॅमर यांच्या शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. ‘द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’च्या १९४१ च्या वर्षारंभाच्या अंकावर गोडसे यांचे चित्र आहे. सैनिकांची नववर्षाची पार्टी असा त्याचा विषय आहे. त्यातली मांडणी, छायाप्रकाशाचा वापर, व्यक्तिरेखांकन तत्कालीन कोणत्याही पाश्‍चात्त्य इलस्ट्रेटर / चित्रकाराच्या पंक्तीत बसेल अशा योग्यतेचे आहे. ‘विकली’मध्ये दर्जेदार कथाचित्रे देण्याची पद्धत लँगहॅमर यांच्या आधीपासून होती. प्र.ग. सिरूर        हेदेखील त्या वेळेस ‘टाइम्स’मध्ये कथाचित्रकार म्हणून काम करत होते. या कथाचित्रांमध्ये कथेतलाच एखादा प्रसंग नाट्यपूर्ण आणि वास्तववादी शैलीत चितारलेला असे. कथेचे शीर्षक आणि मजकूर व कथाचित्राची मांडणीदेखील त्यात अंतर्भूत होती. ही चित्रे रंगीत व ग्रॅव्ह्युअर पद्धतीने छापली जात असल्यामुळे कथाचित्रकारांना अधिक मुक्त वाव असे.

           गोडसे यांनी मराठी पुस्तकांसाठी कामे केली तेव्हा मात्र अक्षरमुद्रणपद्धतीमुळे आणि ब्लॉक्सने चित्रांची छपाई होत असल्याने संकल्पन आणि चित्रांकन यावर खूपच मर्यादा येत. त्या परिस्थितीतही गोडसे यांनी अनेक चांगली मुखपृष्ठे केली. रेषेवर त्यांची हुकमत होतीच, ती त्यांना फक्त काळ्या रेषेचा वापर करून लाइन इलस्ट्रेशन्ससाठी प्रभावीपणे वापरता आली.

           मराठी प्रकाशनांच्या क्षेत्रात गोडसे यांनी एक वेगळी कलादृष्टी आणली. ‘अभिरुची’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे आणि ‘निषाद आणि शमा’ या सदरासाठी निषाद (मं.वि.राजाध्यक्ष) यांच्या स्फुटलेखनासाठी प्रासंगिक विषयांवर गोडशांनी काढलेली व्यंगचित्रे विशेष गाजली. ही चित्रे लँगहॅमर यांनी काढलेल्या व्यंगचित्रांच्या शैलीशी मिळतीजुळती आहेत. ‘अभिरुची’च्या १९४६ च्या दिवाळी अंकावर गोडसे यांचे चित्र होते. त्यात भडक रंगांच्या पट्ट्यात बेमालूम मिसळून गेलेले फुलपाखरू आणि पानाफुलांचे अमूर्त भासणारे आकार होते. दिवाळी अंकावर एखाद्या स्त्रीचे अथवा नटीचे मोहक चित्र छापण्याचा संकेत गोडसे यांनी या मुखपृष्ठाच्या निमित्ताने मोडीत काढला. योगायोग असा की, बा.सी. मर्ढेकरांची ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ ही वादग्रस्त ठरलेली कविता याच अंकात होती.

           पुढे ‘काही कविता’ या मर्ढेकरांच्या १९४७ मध्ये प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ गोडशांनी केले. त्यावर व्यंगचित्राच्या शैलीत एका संभ्रमित पुरुषाचे नग्न रेखाचित्र छापलेले होते. या काव्यसंग्रहावर अश्‍लीलतेच्या संदर्भात खटलाही झाला. गोडसे यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे केली. त्यांत पुस्तकांच्या आशयानुसार चित्रशैलीची विविधताही होती. पुस्तकाचे मुखपृष्ठ करण्यापूर्वी गोडसे हस्तलिखित वाचत. लेखकाच्या व्यक्तित्वाचा, त्याला बोलते करून शोध घेत. ‘एक झाड दोन पक्षी’चे मुखपृष्ठ करण्यापूर्वी चारेक महिने गोडशांनी विश्राम बेडेकरांबरोबर चर्चेच्या बैठकी केल्या होत्या.

           मुखपृष्ठांबरोबर आतील पृष्ठांची मांडणी, अक्षरवळणे या बाबतीतही गोडशांनी मुद्राक्षररचनेचे एक नवे भान आणले. पुस्तकाचे संकल्पन आणि मांडणी यामध्ये मुखपृष्ठ वा आतील चित्रांबरोबरच शीर्षक वा अन्य घटकांचा साक्षेपाने आणि समग्र विचार करणारे गोडसे हे सुरुवातीच्या काळात तरी एकमेव होते.

           कवितेच्या दृश्य रूपासंबंधी जागरूक असणारे कवी म्हणजे पु.शि.रेगे. त्यांच्या कवितासंग्रहांची मांडणी गोडशांच्या मदतीनेच होत असे. ‘रणांगण’, ‘पेर्तेव्हा’, ‘शीळ’, ‘सौंदर्य आणि साहित्य’, ‘ऊर्जायन’ ही गोडशांची काही चांगली मुखपृष्ठे आहेत. शीर्षके, लेखकांची नावे यांसाठी गोडशांनी अक्षरवळणे वापरली आहेत, ती इंग्रजी म्हणजेच रोमन अक्षरवळणांप्रमाणे सेरिफ असलेली अशी आहेत.

           मराठी देवनागरीत डिस्प्ले टाइप म्हणून वापरता येतील अशी इंग्रजीला समांतर अक्षरवळणे गोडशांच्या मुखपृष्ठांमध्ये दिसतात. अक्षरांबरोबरच अलंकरणात्मक पॅटर्न्सच्या ब्रोमाइड्सचा वापरही ते मुखपृष्ठांसाठी करत. नंतरच्या काळात अक्षरवळणांचा हा प्रवाह कमल शेडगे यांनी अधिक शास्त्रशुद्धपणे समृद्ध केला आणि एक चित्रघटक म्हणून अक्षररचनेला वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली.

           द.ग. गोडसे यांनी शंभराहून अधिक नाटकांचे नेपथ्यही केले. त्यात ‘हयवदन’सारख्या प्रायोगिक नाटकांपासून ते ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘बॅरिस्टर’- सारख्या व्यावसायिक नाटकांपर्यंत विविध प्रकृतिधर्मांच्या नाटकांचा समावेश होता. ‘मुद्राराक्षस’ आणि ‘शाकुंतल’ या नाटकांच्या जर्मनीतील प्रयोगांचे नेपथ्यही गोडसे यांनी केले होते. वि.वा.शिरवाडकरांच्या ‘वैजयंती’ या नाटकासाठी गोडसे यांनी केलेले नेपथ्य विशेष गाजले. गोडसे यांनी भासाच्या ‘प्रतिमा’ या नाटकाचे आणि कालिदासाच्या ‘शाकुंतल’ या नाटकाचे स्वैर मराठी रूपांतर केले होते. नाटक, एकांकिका लेखनाबरोबरच त्यांचे दोन लेखसंग्रह (‘समंदे तलाश’, १९८५; ‘नांगी असलेले फुलपाखरू’, १९८९) व दोन इतिहाससंशोधनात्मक पुस्तके (‘मस्तानी’, १९८९ व ‘दफ्तनी,’ १९९२) प्रकाशित झालेली आहेत.

           द.ग. गोडसे यांचे कलामीमांसक म्हणून नाव झाले ते १९६३ पासून १९९३ या काळात प्रकाशित झालेल्या त्यांच्या सात पुस्तकांमुळे. ‘पोत’, ‘शक्तिसौष्ठव’, ‘गतिमानी’, ‘लोकधाटी’, ‘मातावळ’, ‘ऊर्जायन’, आणि ‘वाऽऽक विचार’ अशी त्यांची नावे आहेत. ‘पोत’मध्ये गोडशांनी कलाविष्काराला कापडाच्या संदर्भात वापरली जाणारी पोत ही संकल्पना लावून दाखवली आहे. कापड म्हणजे ज्या पदार्थाचे बनवण्यात येते तो मूळ पदार्थ. जीवनविषयक तत्त्व. धागा म्हणजे तत्त्व विशद करणारी जाणीव. ताणाबाणा म्हणजे या जाणिवांची उभी-आडवी वीण. यंत्रणा म्हणजे जाणिवांचा आविष्कार घडवून आणणारे माध्यम. यंत्रणेच्या उत्क्रांतीबरोबर आविष्काराचा पोत कसा बदलत जातो ते गोडसे यांनी विस्ताराने सांगितले आहे.

           ‘शक्तिसौष्ठव’मध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील भावविश्‍वाचे शक्तिसौष्ठव हे सौंदर्याचे गमक कसे आहे ते गोडशांनी तत्कालीन कागदपत्रे, शिल्पकलांची उदाहरणे देऊन विशद केले आहे. शक्तितत्त्व हे चेतनायुक्त व गतिमान आहे. शक्तितत्त्वामुळे आकृतिबंधाचा घाट ठसठोंबस होतो. आकृतिबंधातील आकार, अवकाश स्थिर असले तरी गतिमान  भासतात. शक्तीने मिळणारे नेटकेपण हा त्यांचा स्थायिभाव असतो.

           ‘गतिमानी’ या पुस्तकात गोडशांनी रेषा या मूलभूत घटकाचा विचार केला आहे. आशयाला मूर्त रूप देण्याचे साधन म्हणजे रेषा. कलावंताच्या भावविश्‍वातून तिला रूप मिळते. तर्काच्या चौकटीत निर्माण होणारी रेषा ही ‘गणितमानी’ आणि मुक्त, स्वैर अशा उत्कट ऊर्मीचा आविष्कार असलेली ती ‘गतिमानी’ असे रेषेचे दोन प्रकार त्यांनी केले आहेत. ‘लोकधाटी’ आणि ‘मातावळ’मध्ये लोकाविष्कारामागच्या प्रेरणांचा शोध गोडसे यांनी घेतला आहे. लोकधाटी आविष्कार लवचीक, वळणदार असतात. त्याला गतिमानतेबरोबरच अंगभूत अशी चुंबकशक्ती कारणीभूत असते. वाकवळण हे असे मूलभूत तत्त्व आहे. शक्ती, गती आणि आविष्कार यांच्यामधला दुवा गोडशांना आदिम ऊर्मीमध्ये म्हणजेच ऊर्जेमध्ये सापडला, त्यातून तयार झाले ‘ऊर्जायन’. सर्जनशील अवकाशाला भावनेने प्रेरित करून आविष्काराची प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे ऊर्जा. गोडशांनी या ऊर्जेच्या प्रभावक्षेत्राची, बालकवींची ‘औदुंबर’, बी कवींची ‘चाफा’ अशी उदाहरणे देऊन चर्चा केली आहे. आविष्काराची प्रवाही वाकवळणे आणि त्यांचा परमउत्सेकबिंदू यांची चिकित्सा ‘वाऽऽक विचार’मध्ये आलेली आहे.

           गोडसे सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीचा एक घटक म्हणून कलाकृतीकडे पाहतात. वेगवेगळ्या टप्प्यांवर गोडशांना जे काही कलेसंबंधी अभ्युपगम सुचले, ते त्यांनी त्यांच्या शैलीत मांडले आहेत. सुरुवातीला असलेली ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थितीबद्दलची सापेक्षता ‘लोकधाटी’पासून कमी होत जाते आणि तिची जागा सामूहिक नेणिवेने, गतिमानता आणि ऊर्जा यांसारख्या संकल्पनांनी घेतलेली दिसते.

           गोडसे यांनी प्रत्येक पुस्तकात त्यांना प्रातिभज्ञानाने गवसलेला एक सिद्धान्त मांडला आहे आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांबरोबरच भावनेच्या अंगाने त्याची मांडणी केली आहे. अनेकदा गृहीतक सिद्ध करण्यासाठी जे प्रमेय ते मांडतात, त्या प्रमेयाच्या आहारी गेल्याने अनेक विसंगती निर्माण होतात, आणि सलग, परिपूर्ण अशा सैद्धान्तिक लेखनाचे स्वरूप त्याला येत नाही; पण कलाविष्कार आणि कलेचे संस्कृतीशी असलेले नाते उलगडणारी मर्मदृष्टी देण्याचे सामर्थ्य गोडसे यांच्या लेखनात आहे.

           मराठीत कलेबद्दलचा सौंदर्यविचार मुख्यतः साहित्याच्या अंगाने झालेला आहे. मर्ढेकरांनी त्याला विविध कलांची व्यापक बैठक देण्याचा प्रयत्न केला. मर्ढेकरांनंतर रूपवादी समीक्षेकडे आणि अलौकिकतावादाकडे झुकलेला सौंदर्यविचार गोडसे यांनी लोकसंस्कृती आणि सामाजिकता यांच्याकडे आणला. साहित्य, चित्र, शिल्प अशा अनेक कलांचा एकत्रितपणे विचार करणारी आणि त्यासाठी इतिहास, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांची मदत घेणारी तसेच नागर-अनागर कलांना सारखेच महत्त्व देणारी गोडसे यांची कलामीमांसा मराठीत तरी विरळ आहे.

           द.ग.गोडसे यांना चित्रकलेत बॉम्बे आर्ट सोसायटी, कॅग (कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्ड) ची पारितोषिके मिळाली. उत्कृष्ट नेपथ्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रीय पारितोषिकासह अनेक पुरस्कार मिळाले. तसेच त्यांच्या पुस्तकांनाही महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मृदंगवादनाचीही आवड होती.

- दीपक घारे

गोडसे, दत्तात्रेय गणेश