Skip to main content
x

गोगटे, मधुकर नारायण

        धुकर नारायण गोगटे यांचा जन्म आणि इंटरपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) केल्यावर त्यांनी लंडन विद्यापीठामधून एम.एस्सी. (अभियांत्रिकी) ही पदवी मिळविली. त्यानंतर १९५६ ते १९९६ अशी चाळीस वर्षे त्यांनी वास्तुविशारद, व्हॅल्युअर आणि स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये स्वत:चा व्यवसाय करून लोकांसाठी घरे, व्यापारी आस्थापनांसाठी इमारती आणि उद्योगपतींसाठी कारखाने बांधले. ही कामे त्यांनी प्रामुख्याने मुंबईत केली, पण तुरळकपणे उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात आणि बहारीन येथेही केली. १९७० ते १९८१ या काळात त्यांनी वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी ‘बिल्डिंग प्रॅक्टिस’ नावाचे एक इंग्रजी अनियतकालिक चालविले.

     १९६२-१९६६ या काळात ते मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. १९६३ साली स्थापन झालेल्या शास्त्रीय समितीचे ते कार्यवाह होते. त्या काळात विज्ञान विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने आयोजित केली, संघाच्या प्रादेशिक संमेलनात एक शास्त्रीय संमेलन भरवले. ‘मातीची धरणे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.‘परिभाषेचा परिचय’ ही १५-१६ लेखांची मालिका ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली. अशी ही विज्ञानविषयक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांना प्रश्‍न पडला, की ही साहित्य संस्था आहे की विज्ञान संस्था? त्यातून मतभेद होऊन गोगटे १९६५ साली संघातून बाहेर पडले आणि डॉ.रा.वि. साठे, ज.ग. बोधे, डॉ.श्री.शां. आजगावकर, डॉ.म.आ. रानडे, प्रा.प.म. बर्वे, डॉ.चिं.श्री. कर्वे या समविचारी लोकांना घेऊन त्यांनी २४ एप्रिल, १९६६ रोजी ‘मराठी विज्ञान परिषदे’ची स्थापना केली. डॉ.रा.वि. साठे (अध्यक्ष) आणि म.ना. गोगटे (कार्यवाह) यांनी १९६६ ते १९७६ अशी दहा वर्षे काम केले.

     गोगटे यांनी या काळात तन, मन आणि धन ओतून काम केले. नायगाव-दादर येथे टेबल स्पेसमध्ये असलेले मराठी विज्ञान परिषदेचे कार्यालय ताडदेवला, आपल्या व्यवसायाच्या कार्यालयात नेले. पहिल्या वर्षातच धर्मादाय कायद्याखाली परिषदेची नोंदणी केली. मुंबईनंतर पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, सांगली, मडगाव येथे परिषदेच्या शाखा निर्माण केल्या. त्या-त्या शाखांत भाषणे, चर्चा, परिसंवाद होऊ लागले. जानेवारी १९६७ पासून शाखा-शाखांत जागोजागी होणाऱ्या कार्याची माहिती पोहोचावी म्हणून ‘मराठी विज्ञान परिषद वार्तापत्र’ छापायला सुरुवात करून एप्रिल १९६८ मध्ये त्याचे रूपांतर ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ असे केले.

     पहिल्याच वर्षी मराठी विज्ञान संमेलन झाले. संमेलनात वैज्ञानिकांचा सन्मान करणे, तिसऱ्या दिवशी वैज्ञानिक स्थळाला सहल काढणे, एरवी अनुवाद शिबिर भरवणे, हे उपक्रम सुरू केले. परिषदेची वास्तू व्हावी म्हणून १९७३ सालापासून शासनाशी पत्रव्यवहार सुरू करून १९७५ साली शीव-चुनाभट्टीला १००० चौ.मी.ची जागा मिळवली. आयकर विभागाकडून देणगीवर करमाफी मिळवण्यासाठी सवलत मिळवली आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि सांस्कृतिक खाते, तसेच मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान मिळवले. परिषदेसाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क ठेवला. एखादी सामाजिक संस्था मोठी व्हावी, नावारूपाला यावी यासाठी सर्व गोष्टी त्यांनी पहिल्या ८-१० वर्षांत केल्या. म.ना. गोगटे १९७६ ते १९८२ अशी सहा वर्षे परिषदेचे अध्यक्ष होते आणि परिषदेची वास्तू उभी करायला त्यांनी सुरुवात केली. नंतर ते परिषदेचे विश्वस्तही होते. १९९० साली परिषदेने त्यांना सन्मान्य सभासदत्व दिले.

     म.ना. गोगटे १९९७ साली पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी २००२ साली परिषदेची शाखा तेथे स्थापन केली. ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’च्या पुणे शाखेबरोबर दरमहा व्याख्यानाचे कार्यक्रम सुरू केले.‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चा कार्यक्रम पुण्याच्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’बरोबर सुरू केला.

     पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजात असल्यापासून म.ना. गोगटे यांना मराठी भाषा आणि व्याकरणाची आवड निर्माण झाली आणि मराठी भाषेच्या बाराखडीत ‘अ‍ॅ, ऑ’ नाहीत, बाराखडीत ‘अ‍ॅ, ऑ’ यांना स्थान मिळावे, मग भले ती चौदाखडी का होईना म्हणून दरवर्षी भरणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी ठराव आणला; पण दुर्दैवाने तो तेथे मंजूर झाला नाही. दूरध्वनीच्या तबकडीवर, खेळातील पत्त्यांवर, घड्याळावर, तापमापकावर जर अरेबिक आकडे लिहिले जातात, तर आपणही ते स्वीकारले पाहिजेत, म्हणूनही साहित्य संमेलनात आणि विज्ञान संमेलनात ठराव आणले. १९७२ साली कोल्हापूरला भरलेल्या विज्ञान संमेलनात अखेर हा ठराव मंजूर होऊन परिषदेच्या कामकाजात अरेबिक आकडे वापरले जाऊ लागले. शालेय पाठ्यपुस्तकातही आता असे आकडे वापरले जातात.

     भारताच्या सर्व राज्यांत वेगवेगळ्या भाषा आहेत. आपापसात संपर्क राहावा म्हणून आपण मराठी भाषा रोमन लिपीत लिहावी, अशी एक चळवळ त्यांनी ‘रोमन लिपी परिषद’ स्थापन करून केली. त्या परिषदेतर्फे त्यांनी संमेलने, चर्चासत्रे भरवली, भाषणे दिली, दूरदर्शनवर कार्यक्रम केले. तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमन यांच्याशी चर्चाही केली. पण त्याला लोकमताचा पाठिंबा मिळाला नाही आणि अखेर त्यांनी तिचे विसर्जन केले. पण आज हजारो मराठी मुले परदेशी स्थायिक झाली असताना, त्यांच्या आया मुलांशी इ-मेलवरून रोमन लिपीचा आश्रय घेऊनच पत्रे लिहीत असतात. उदा. ‘तू कसा आहेस’ हे, ‘tukasaahes?’ असे लिहून विचारतात. संगणकात त्याचा उपयोग होईल, हे गोगट्यांनी पूर्वीच ओळखले होते. सैन्यात विविध भाषिक लोक असतात. त्यांच्यासाठी रोमन लिपी उपयोगी पडेल हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ओळखून सैन्यात ते सुरूही केले होते. आधुनिक काळात ते गोगट्यांनी केले.

— अ. पां. देशपांडे

गोगटे, मधुकर नारायण