गोखले, अशोक भालचंद्र
अशोक भालचंद्र गोखले यांचा जन्म बिहार (आत्ताचे झारखंड) राज्यातील रांची येथे झाला. त्यांचे वडील आय.सी.एस. होते. त्यांनी १९१५ ते १९५२ या कालावधीत ब्रिटिशकालीन बिहार आणि ओरिसा या प्रांतात प्रांताधिकारी म्हणून काम केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते केंद्र सरकारच्या खाणकाम आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव होते. त्यानंतर त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान राजेंद्र प्रसाद यांचे सचिव म्हणून काम केले तर १९५३ ते ५४ या कालावधीत ते भारताचे नेपाळमधील राजदूत होते. अशोक गोखले यांच्या आईचे नाव मनोरमा असे होते.
गोखले यांचे माध्यमिक शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल पटना आणि उत्तराखंड मधील डून स्कूलमध्ये झाले. १९५१ मध्ये त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामधून गणित या विषयात बी.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी गोखले इंग्लंडमधील फिट्झविल्यम हाऊस केंब्रिजमध्ये दाखल झाले.
१९५२-५३ मध्ये अशोक गोखले यांनी इम्पिरिअल बँक ऑफ इंडियामध्ये हैदराबाद येथे सहायक अधिकारी या पदावर काम केले. १९५५ मध्ये गोखले केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये निवड झाली. दिल्लीमधील मेटकॉफ हाऊसमधील प्रशिक्षणानंतर त्यांची प्रथम नियुक्ती ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथे दूतावासाचे तृतीय सचिव (थर्ड सेक्रेटरी टू एम्बसी) या पदावर करण्यात आली. १९५८ ते १९६२ या काळात गोखले यांनी पश्चिम जर्मनीमधील बर्न येथे अर्थ आणि वाणिज्य या विषयाचे प्रथम सचिव या पदावर काम केले. या कालावधीत आपल्या देशात दुसर्या पंचवार्षिक योजने अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात उद्योगांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी आपल्या देशाला परकीय गुंतवणुकीची आवश्यकता होती. त्यावेळी गोखले यांनी दाखवलेल्या राजनैतिक कौशल्यामुळेच, ओरिसामध्ये रुरकेला येथे उभारण्यात येणार्या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या लोह-पोलाद कारखान्यासाठी पश्चिम जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळू शकली. १९६२ ते ६५ या काळात गोखले यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या पश्चिम युरोप विभागाचे उपसचिव या पदावर काम केले.
१९६५मध्ये भारत सरकारने जॉर्डनमध्ये भारतीय दूतावास सुरू करण्याचे ठरवले. या दूतावासाच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी अशोक गोखले यांच्याकडे देण्यात आली. तेथे त्यांची ‘अॅम्बॅसेडर सी.डी.ए.’ या पदावर जून १९६७ मध्ये नेमणूक झाली. नंतर अरब-इस्राईल यांच्यामध्ये ६ दिवसांचे युद्ध झाले. जॉर्डन हा अरब देश आहे. या युद्धात भारताचा इस्राईलला पाठिंबा होता. यामुळे भारताची भूमिका जॉर्डनला समजावून देण्याची खूप मोठी जबाबदारी गोखले यांनी पार पाडली.
१९६८ ते ७१ या काळात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये गोखले यांची नियुक्ती काउन्सिलर या पदावर करण्यात आली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये फ्रान्सकडून पाकिस्तानला जो शस्त्रास्त्र पुरवठा करण्यात येत होता तो थांबवण्यासाठी गोखले यांनी भारतीय दूतावासामार्फत खूप प्रयत्न केले.
नंतर गोखले यांची भूतानमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. या छोट्याशा देशाला विविध क्षेत्रांतील विकास कामासाठी भारतातर्फे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी गोखले यांच्यावर होती. चुखा हा नेपाळचा पहिला जलविद्युत प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.
१९७४ ते ७७ या कालावधीत गोखले परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव या पदावर कार्यरत होते. यावेळी त्यांच्यावर पश्चिम युरोप आणि संसद विभाग या पदांची जबाबदारी होती. संपूर्ण परराष्ट्र व्यवहारांचा समन्वय ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यावेळी अशोक गोखले यांनी पार पाडली. १९७४ मध्ये पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली. त्यामुळे संपूर्ण जगभर विशेषत: युरोपीय देशांमध्ये भारताविरुद्ध प्रतिकूल वातावरण निर्माण झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम युरोप विभागाचे सचिव म्हणून युरोपियन देशांना भारताची भूमिका समजावून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी गोखले यांनी पूर्ण केली.
गोखले यांच्या कारकिर्दीत ‘इंडो-पोर्तुगीज ट्रिटि ऑफ रिझम्शन ऑफ डिप्लोमॅटिक रिलेशन’ हा महत्त्वपूर्ण परराष्ट्र करार झाला. स्वातंत्र्यपूर्व भारतातील गोवा या राज्यावर पोर्तुगिजांचा अंमल होता. १९६१ मध्ये लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करण्यात आला. त्यानंतर पोर्तुगालने नाराज होऊन भारतासोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले होते. पण ३१ डिसेंबर १९७४ रोजी झालेल्या या कराराने पोर्तुगालने गोव्यावरील आपला हक्क जाहीरपणे सोडून दिला. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मारिओ यांनी भारताला भेट देऊन भारतासोबतचे राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले. १९७५ मध्ये आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली. लोकशाहीचे पुरस्कर्ते असणार्या युरोपीय देशांमध्ये भारताविरुद्ध प्रतिकूल वातावरण निर्माण झाले. गोखले यांना यावेळी आपले राजनैतिक कौशल्य पणाला लावावे लागले. युरोपियन देशांसोबत परराष्ट्र व्यवहार सांभाळत असताना त्यांनी आणीबाणी विरुद्ध त्या देशांमध्ये निर्माण झालेली प्रतिकूल भूमिका सांभाळण्याचा प्रयत्न केला.
मार्च १९७७ मध्ये जनता सरकारच्या राज्यात अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. त्यावेळी अशोक गोखले यांची नियुक्ती वॉशिंग्टनमध्ये अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली. यावेळी अमेरिकेत राजदूत असले नानी पालखीवाला यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच पद सोडले. त्यानंतर १३ महिने गोखले यांनी आपल्या पदावर काम करून राजदूताच्याही सर्व जबाबदार्या पार पाडल्या याच कालावधीत भारताने केलेली अणुचाचणी, आणीबाणी या कारणांमुळे अमेरिकेने भारताला अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणारे समृद्ध युरेनियम खनिज देण्याचे नाकारले. परंतु गोखले यांच्या प्रयत्नांमुळे युरेनियमचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला.
१९८० ते ८७ या काळात गोखले इराण, इस्लामिक प्रजासत्ताकामध्ये राजदूत या पदावर कार्यरत होते. १९८० ते ८९ या ९ वर्षांच्या कालावधीत इराण आणि इराक यांच्यामध्ये युद्ध झाले. यावेळी भारताकडे अलिप्त राष्ट्र चळवळीचे अध्यक्षपद होते. त्यामुळे आपण युद्धामध्ये कोणत्याही देशाची बाजू घेऊ शकत नव्हतो. भारत या देशांकडून दरवर्षी ३ दशलक्ष टन कच्चे तेल आयात करतो. युद्ध काळातही त्याचा पुरवठा सुरू राहावा यासाठी गोखले यांनी महत्त्वपूर्ण काम केले.
१९८७ मध्ये अशोक गोखले यांची नियुक्ती दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव या पदी करण्यात आली. १९८७-८८ या एक वर्षाच्या काळात परराष्ट्र सेवा प्रशिक्षण संस्था दिल्लीचे प्रमुख म्हणून गोखले यांनी काम पाहिले. या संस्थेचा प्रशिक्षण कार्यक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. ऑक्टोबर १९८८ मध्ये अशोक गोखले परराष्ट्र मंत्रालय सचिव या पदावरून निवृत्त झाले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा निर्माण करण्यामध्ये गोखले यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. परराष्ट्र सेवेतील आपले अनुभव अशोक गोखले यांनी ‘इनसाइड थ्री मोनार्किज अँड सिक्स रिपब्लिक - मेमरिज ऑफ अॅन इंडियन डिप्लोमॅट’ या आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेचा इतिहास आणि तसेच त्या देशातील राजकीय परिस्थिती आणि भारताची भूमिका जाणून घेण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज आहे.
निवृत्तीनंतर १९८९ ते ९७ या काळात गोखले वरळी येथील हिंदुजा फाउण्डेशनचे अध्यक्ष होते. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. नागरिक चेतना मंच, नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटी अशा विविध सामाजिक उपक्रमांचे ते सदस्य आहेत.