गोखले, भालचंद्र कृष्णाजी
भालचंद्र कृष्णाजी गोखले यांचे शालेय शिक्षण पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयात तर पदवीपर्यंतचे शिक्षण फर्गसन महाविद्यालयात आणि इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात झाले. केंब्रिजमध्ये असतानाच १९१४ साली यांनी तत्कालीन ब्रिटिश राजवटीतील भारतीय नागरी सेवा (आय.सी.एस.) परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यांचे वडील कृष्णाजी केशव गोखले ब्रिटिश राजवटीतल्या जत संस्थानात न्यायाधीश आणि प्रशासक (कारभारी) म्हणून नोकरीला होते. भालचंद्र गोखले यांनी इंग्लंडहून १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर ओरिसातल्या खुर्दा येथे जिल्हाधिकारी आणि सहायक न्यायाधीश या पदाचा कार्यभार यांनी स्वीकारला. यानंतर यांची नियुक्ती बिहारातील पुरूलियाचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. काही काळातच यांनी छोटा नागपूरचे विशेष पुनर्वसन अधिकारी म्हणून सूत्र हाती घेतली. या पदावर असताना १९१८-१९२५ या सहा-सात वर्षात यांनी मानभूम जिल्ह्यासाठी महसूल आणि पुनर्वसनाचा खास अहवाल सादर केला. या प्रदेशासाठी हा अहवाल इतका उपयोगी ठरला की १९२८मध्ये ब्रिटिश प्रशासनाने गोखले यांचा खास गौरव केला.
यानंतर बिहार शासनाने गोखले यांची प्रदेशाचे शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली. ते काही काळ गयाचे जिल्ह्यात जिल्हाधिकारी होते. १९३७मध्ये मुंगेर या जिल्ह्यात त्यांची नियुक्ती झाली. मुंगेरला असताना आपल्या देशप्रेमामुळे त्यांनी ब्रिटिश शासनाचा रोषही ओढवून घेतला होता. नंतर त्यांनी काही काळ प्रदेशाचे अर्थसचिव म्हणून काम पाहिले. १९४२मध्ये गोखले यांची भागलपूर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. यावेळी संपूर्ण देशभर ‘छोडो भारत’ चळवळ उसळली होती. तेव्हा गोखले यांनी संयम बाळगून पण खंबीरपणे परिस्थिती हाताळली.
नंतर बिहारमध्ये पटना येथे आयुक्त या पदावर १९४४मध्ये गोखले यांची नियुक्ती झाली. हा काळ स्वातंत्र्यलढ्याचा असल्याने डॉ.राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण आणि बाबू जगजीवनराम अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांशी गोखले यांचा प्रशासक म्हणून संबंध आला. नंतर १९५०मध्ये डॉ.राजेंद्रप्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी आपले सचिव म्हणून आग्रहाने गोखले यांचीच निवड केली होती.
१९४३मध्ये ब्रिटिश शासनाने सी.आय.ई. (कँपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर) हा किताब देऊन गोखले यांचा गौरव केला. पुढच्या दोन वर्षांत यांना सी.एस.आय. (कँपॅनियन ऑफ दी स्टार ऑफ इंडिया) हा आणखी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. याच सुमारास देशातल्या बहुतेक राज्यातल्या काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिले होते. या कारणास्तव राज्यांचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गव्हर्नर नेमले होते. परिणामी ओरिसाचे गव्हर्नर या पदावर सर हॉथोर्न लुईस यांची नेमणूक झाली होती. त्यांचे प्रशासकीय मदतनीस दोन अधिकारी सल्लागार नेमण्यात आले आणि गोखले हे त्यापैकी एक होते. या काळात गोखले यांनी ओरिसाच्या विकासासाठी योजना आलेख तयार केला होता. या योजनेत हिराकूड धरण, पारादीप बंदर विकास आणि ओरिसाची नवी राजधानी म्हणून भुवनेश्वरची जडणघडण यांचा समावेश होता. या योजनांमुळे गोखले ओरिसात लोकप्रिय झाले होते. भारत स्वतंत्र होण्याआधी काहीच महिने गोखले यांची दिल्लीत बदली झाली. नंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील काकासाहेब गाडगीळ यांच्या सार्वजनिक बांधकाम, खाण आणि ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी गोखल्यांवर सोपवण्यात आली. या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सिंचन आणि वीजनिर्मिती क्षेत्रातल्या अनेक बहुउद्देशीय प्रकल्पांचा पाया गोखले याच्या कारकिर्दीत रचला गेला. याशिवाय दिल्लीत आज जगभरच्या राजदूतांची कार्यालये असलेल्या चाणक्यपुरी विभागाची आखणी करण्यात गोखले यांचा मोठा सहभाग होता.
१९५२मध्ये निवृत्तीनंतर जवाहरलाल नेहरू यांनी गोखले यांची नेपाळमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. नेपाळला भूपृष्ठ वाहतुकीने भारताशी जोडणारा काठमांडूपासूनचा त्रिभुवन राजमार्ग तयार करण्यात गोखले यांचे महत्त्वाचे योगदान होते.
गोखले यांचे देशातल्या नदी-खोरे विकास या विषयावर चांगले प्रभुत्व होते. म्हणूनच भारतात परतल्यावर १९५५मध्ये गोखले यांची तुंगभद्रा आंतरराज्य पाणी वाटप मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. या प्रकल्पाअंतर्गत सिंचन आणि वीजनिर्मितीचा प्रस्ताव होता. भारत सरकारने १९५८-५९मध्ये गोखले यांच्या नेतृत्वाखाली आंतरराज्य जलवाहतूक समिती स्थापन केली. या समितीच्या अहवालातल्या शिफारशी आजही महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रकृतीच्या कारणास्तव गोखले यांनी १९६७मध्ये तुंगभद्रा आंतरराज्य पाणीवाटप मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते सक्रिय सेवेतून निवृत्त झाले. गोखले यांनी पुण्यातल्या कर्वे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि डेक्कन जिमखाना व्यवस्थापकीय समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. तसेच नदी खोरे विकास, शिक्षण, यांसारख्या विषयांवर भरपूर लेखनही केले. गोखले यांचे प्रदीर्घ आजाराशी झगडत असताना निधन झाले. यांचे पुत्र अशोक गोखले यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.
- संपादित