Skip to main content
x

गोखले, शरच्चंद्र दामोदर

          रच्चंद्र दामोदर गोखले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव वत्सला.  त्यांचे वडील दामोदर वि. गोखले, हे नामवंत समाजसेवक आणि पत्रकार, केसरीचे संपादक होते. गोखले यांना बालपणीच मातृसुखाला पारखे व्हावे लागले. मात्र वडील बाबूराव, क्रांतिकारक काका नानासाहेब आणि आत्या यांनी त्यांच्यावर भरभरून संस्कार केले. त्यांचे घर ही एक सामाजिक संस्थाच होती. वडिलांच्या बरोबर त्यांना भरपूर वाचायला मिळाले. घराजवळच्या न्यूइंग्लिशस्कूल, रमणबाग येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्या शाळेच्या टिळक बालवीर कुलात ते होते. त्यामुळे त्यांची सामाजिक जाणीव आपोआप बळकट होत गेली.

         तेथील स्काउट मास्तर वि.सी. भागवत हे एक असामान्य शिक्षक होते. घरात पत्रकारिता आणि राजकारण होतेच. १९४६ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत त्यांनी बी.ए. पदवी मिळवली. पदवी मिळविल्यावर पुढे काय करावे याबद्दल दोन-तीन पर्याय होते. वकील होऊन राजकारणात पडावे, लंडनला जाऊन पत्रकारितेचे शिक्षण घ्यावे किंवा विकासाच्या कामात स्वत:ला झोकून द्यावे.

        १९४२ ते १९४६ हा राजकीयदृष्ट्या फार नाट्यपूर्ण काळ होता. सर्व राजकीय पक्षांची माणसे त्यांच्या घरी येत असत. फर्गसन महाविद्यालयात प्रा.कोगेकर, प्रा.मावळंकर यांचा विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव होता. गोखले राजनीती आणि अर्थशास्त्राचे विद्यार्थी असले तरी मराठी साहित्याची आवड असल्याने प्रा.रा.श्री.जोग, पारसनीस, मोरे यांचेही ते शिष्य झाले. घरी येणाऱ्या मंडळींपैकी अच्युतराव पटवर्धन यांनी त्यांची जे.कुमारप्पा यांच्याशी गाठ घालून दिली. त्यांचे बंधू डॉ.जे.सी.कुमारप्पा हे त्या वेळी टाटा इन्स्टिट्यूटचे प्रमुख होते. त्यांच्याशी  झालेल्या चर्चेनंतर गोखले त्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले.

        टाटा समाजविज्ञान संस्थेत अभ्यास करणे हा एक वेगळाच अनुभव होता. या संस्थेतून १९४९मध्ये त्यांनी एम.एस.डब्ल्यू.ची पदवी घेतली. पुण्याच्या मराठी वातावरणातून एकदम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वातावरणात नेणारा तो बदल होता. सर्व राज्यांतले, परदेशांतले विद्यार्थी व प्राध्यापक तिथे होते. मुंबईला डॉ.पी.व्ही.मंडलिक यांच्या घरी गोखले राहत असत. त्यांच्या घरी येऊन राहणाऱ्या साने गुरुजी, अरुणा असफअली अशांचा प्रभाव गोखले यांच्यावर पडला. देशाची फाळणी झाली त्या वेळी पंडित नेहरू यांच्या सांगण्यावरून निर्वासितांचे काम करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटमार्फत वीस विद्यार्थी व विद्यार्थिंनींना दिल्ली व कुरुक्षेत्र येथे पाठविण्यात आले. त्या दरम्यान पंडित नेहरू, गांधीजी यांच्या भेटी होण्याचा योग आला. विद्यार्थी असतांनाच पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेने निर्वासितांच्या प्रश्‍नावर गोखले यांचे व्याख्यान ठेवले व बावीसाव्या वर्षी त्यांचा मोठा गौरव झाला. ‘मौजे’च्या भागवतांनी त्यांच्या साप्ताहिकासाठी निर्वासितांच्या प्रश्‍नावर लेखमाला लिहायला सांगितली त्यातून ‘निर्वासितांचा प्रश्‍न’ हे पुस्तक निर्माण झाले. त्याला काकासाहेब गाडगीळांनी प्रस्तावना लिहिली. शिक्षण चालू असतांनाच मुंबईच्या रघुनाथराव आपटे या उद्योगपतींच्या मुलीशी, मालतीशी गोखले यांचा विवाह झाला.

        टाटा इन्स्टिट्यूटमध्येच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या वतीने अभ्यागत प्राध्यापक  म्हणून गोखले यांना एक वर्षासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी इन्स्टिट्यूटकरिता भारतातील सुधार प्रशासन आणि गुन्हेगारी या विषयावर एक ग्रंथ प्राध्यापकजे.जे.पानाकल यांच्याबरोबर गोखले यांनी संपादित केला. सामान्य विज्ञानात डॉक्टरेट मिळविण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. इन्स्टिट्यूटमध्ये ती सोय नसल्याने बनारसच्या काशी विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली. ते शिकत असताना सरकारी समाजकल्याण खात्याचे उपसंचालक गोविंदराव हर्षे यांच्यामुळे ते त्या खात्यात दाखल झाले. पुण्याच्या रिमांड होमचा चीफ ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. हर्षे व के.डेव्हिस या इंग्रज बाईंनी महाराष्ट्रात रिमांड होमची चळवळ रुजविली. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरल्याने गोखले यांना एक वास्तव दृष्टिकोन मिळाला. याच काळात गोखले यांनी त्या खात्याचे ‘समाजसेवा’ नावाचे मासिक सुरू केले. या मुलांसाठीच्या कायद्यात बदल होण्यासाठी चळवळ करावी असा आग्रह गोखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धरला. त्यावेळच्या चिंतनातून गोखले यांनी ‘नावडती मुले’ हे आपले दुसरे पुस्तक लिहिले. त्याला महाराष्ट्र शासनाचा व इतर मिळून पाच पुरस्कार प्राप्त झाले. पाठ्यपुस्तक म्हणून मान्यताही मिळाली. सर्व महाराष्ट्रातून या विषयावर बोलण्यासाठी गोखले यांना निमंत्रणे येत.

       मुलांच्या या कामात रमलेले असताना अचानक सरकारी खलिता आला. मुंबईला भिक्षा प्रतिबंधनाचे व कुष्ठ निवारण्याचे काम सुरू करण्यासाठी शासनाच्या चेंबूर येथील संस्थेच्या प्रमुखपदी म्हणून गोखले यांची बढतीवर बदली झाली होती. त्यानुसार चेंबूरला कुष्ठरोग्यांच्या संस्थेत गोखले रहावयास गेले. तेथील अनुभव फारच वेगळे होते. गोखले पत्नी व मुलांना घेऊन कुष्ठधामात रहायला गेले हे त्यांच्या सासऱ्यांनाही आवडले नाही. पण मोठ्या निष्ठेने व निर्धाराने गोखले यांनी तेथे काम केले. दोनच वर्षात त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) शिष्यवृत्ती मिळाली आणि इंग्लंड, नॉर्वे, स्कॅन्डिनेव्हिएन देश व इस्त्रायल येथे वर्षभर राहून त्यांनी अभ्यास केला. सर्वोत्तम परदेशी विद्यार्थी असा त्यांचा गौरव झाला. बी.बी.सी.वर त्यांची मुलाखत झाली. परदेशातून परत आल्यावर बढती मिळून साहाय्यक संचालक म्हणून त्यांची पुण्यास बदली झाली. मोठा अधिकार मिळाला पण काम पुष्कळसे कागदी असे. सरकारी बंधनांची जोखडबंदी त्यांना बोचू लागली होतीच. त्यामुळे भारतीय समाजकल्याण संस्था व आंतरराष्ट्रीय समाज विकास महामंडळ या संस्थांच्या आशिया व पॅसिफिक विभागाचा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाल्याबरोबर गोखले यांनी सरकारी नोकरी सोडायचे ठरविले. तेथे काम करीत असतांना त्या क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यातून १९७५ मध्ये ते आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्रशासक झाले. सर्व देशांत राष्ट्रीय समाजकल्याण महामंडळे स्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या दृष्टीने बांगलादेश, श्रीलंका, इराण, व्हिएतनाम अशा अनेक देशातून त्यांना कार्य करता आले. काही जागतिक परिषदा संघटित कराव्या लागल्या. जगातील सर्व खंडांतून आणि प्रमुख देशांतून जाण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. महामंडळाचे काम स्थिर झाले आहे असे लक्षात येताच १९८८ मध्ये त्यांनी त्या संस्थेचा राजीनामा दिला व पुढच्या काळात कोणतीही नोकरी न करता आपल्या आवडीने काम करावे असा निर्णय त्यांनी घेतला.

       आंतरराष्ट्रीय वयोवर्धन संस्थेकडून आलेले निमंत्रण स्वीकारून डॉ.गोखले यांनी तिचे अध्यक्षपद स्वीकारले. त्या कामात साऱ्या जगातील वयोवर्धन संस्थांचे काम पाहण्याची वा तेथे नव्याने काम सुरू करण्याची संधी होते. दक्षिण आफ्रिकेतील पहिले कार्यालय त्यांनी सुरू केले. चीनमध्येही त्या संदर्भात बोलणी केली. भारतात पहिली जागतिक वयोवर्धन परिषद त्यांनी मुंबई व पुण्यामध्ये घेतली. याच सुमारास इंटरनॅशनल लेप्रसी युनियन स्थापन करण्याचे ठरले व अध्यक्ष म्हणून डॉ.गोखले यांची निवड झाली. त्याच काळात ते गांधी मेमोरियल लेप्रसी फौंडेशनचे अध्यक्ष झाले. मुंबईत काम करीत असतांना डॉ. गोखले यांच्या ध्यानात आले की अपंग कुष्ठरुग्ण यांच्या मुलांचा प्रतिपाळ कोणीच करीत नाही. त्यासाठी झालेल्या विचारमंथनातून कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम (कास्प) या संस्थेचा जन्म झाला. दोन मुलांपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता देशातील बारा राज्यात राबविला जात असून त्यामार्फत सुमारे साठ हजार मुलांच्या प्रतिपालनाची जबाबदारी घेण्यात आली आहे.

        जयंतराव टिळक यांच्या सूचनेवरून गोखले यांनी केसरीचे संपादकपद स्वीकारण्याचे ठरविले आणि त्यामुळे काही काळ कास्पचे अध्यक्षपद सोडले. ते संपादक असताना केसरीच्या जन्मशताब्दीचा मोठा समारंभ झाला. केसरीचे संपादक म्हणून त्यांना राजीव गांधीबरोबर युरोप, रशिया व चीनचा दौरा करता आला. केसरीचा निरोप घेतल्यावर प्रतापराव पवार यांच्या सूचनेवरुन सकाळ चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्तपद डॉ. गोखले यांनी स्वीकारले. त्याच वर्षी पुणे विद्यापीठावर गव्हर्नरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली. अलीकडे ते प्रामुख्याने कास्पचेच काम करीत असतात व त्यामुळे देश-विदेशात त्यांना भ्रमंती करावी लागते.

        संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांनी त्यांची बर्‍याच समित्या, शिक्षण संस्था व प्रतिष्ठानांवर संचालक म्हणून नेमणूक केली आहे. या सर्व प्रवासात डॉ. गोखले यांंच्या हातून इतरही अनेक कामे घडली. इंग्रजी मराठी मिळून त्यांची तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

         १९९८ सालचा कुष्ठकार्याविषयीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार त्यांच्या वाट्याला आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेला संबोधित करण्याचा बहुमान जे.आर.डी.टाटा यांच्यानंतर डॉ.गोखले यांच्याकडेच आलेला आहे. वयोवर्धन क्षेत्रातील कामाबद्दल १९९६ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले.

        अशा ह्या निष्ठावान कार्यकारी अधिकाऱ्याचे  २०१३ साली वृद्धापकाळाने निधन झाले.

- सविता भावे

गोखले, शरच्चंद्र दामोदर