Skip to main content
x

गोखले, श्रीपाद गणेश

         श्रीपाद गणेश गोखले यांचा जन्म मिरज येथे एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रथमत: बी.ए.पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये १९३८ ते १९४३पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. त्याच वेळी इंग्रजीमधून एम.ए. पदवीसुद्धा घेतली. १९४३ ते १९४९मध्ये त्यांनी इंडियन आर्मी ऑर्डनन्स कोअरमध्ये ऑर्डनन्स ऑफिसर म्हणून काम केले. १९४८च्या मध्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे एका विशेष निवड समितीतर्फे पोलीस सेवेसाठी अर्ज मागवण्यात येत होते. याद्वारे गोखले १९४९ च्या जानेवारीत जोखीम सेवेत रुजू झाले. प्रशिक्षणानंतर सुरत जिल्ह्यात सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पालनपूर, सुरत, नाशिक, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी १९६२ पर्यंत काम केले. त्यानंतर नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण शाळा येथे त्यांची नेमणूक प्राचार्य पदावर  झाली.

     १९६४ पर्यंत प्राचार्य म्हणून काम केल्यावर १९६४ ते १९६६ मध्ये त्यांनी दिल्ली येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग उपमहानिरिक्षक पद भूषविले. १९६६ ते १९७० औरंगाबाद येथे उपमहानिरिक्षकपदी काम केले. १९७० ते जून १९७१ लाचलुचपतविरोधी खात्याच्या संचालकपदी काम केले. जुलै १९७१ ते जानेवारी १९७२ दरम्यान त्यांनी पुणे पोलीस आयुक्त पद भूषविले. १फेब्रुवारी१९७२ ते ३१जुलै१९७४, अर्थात सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीच्या संचालकपदाची धुरा सांभाळली. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही श्रीपाद गोखले यांनी विविध सामाजिक कार्यात  हिरिरीने भाग घेऊन व्यतीत केले.

     लहान गोष्टीतही स्पष्ट मुद्देसूद विचार करावा असे मार्गदर्शन आपल्या अधिकाऱ्यांना गोखले आपल्या कृतीतून देत असत. सुरुवातीच्या काळात गोखले यांच्या हाताखाली प्रशिक्षण मिळाल्याने जमाव नियंत्रित करताना लाठीहल्ला व गोळीबार करण्याचे  प्रसंग टाळता आल्याचेही अधिकारी सांगतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नाना पाटील, आचार्य अत्रे अशा  प्रमुख नेत्यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीवर धडक मोर्चा काढण्याचे ठरविले होते. गोखले त्या वेळी कोल्हापूर येथे डी.एस.पी. होते. धक्काबुक्की, चेंगराचेंगरी अशा गोष्टी न होता मोर्चा अडविण्याची योजना त्यांनी तपशीलवार आखलेली होती; परंतु वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे ती योजना त्यांना काही काळ बाजूला ठेवावी लागली. परंतु योग्य वेळ येताच मूळ योजना वरिष्ठांच्याच परवानगीने कार्यान्वित करून ती यशस्वीपणे पार पाडली. एखादी योजना नियोजनपूर्वक कशी पार पाडावी, याचे सुयोग्य उदाहरणच त्यांनी घालून दिले. हाताखालचे अधिकारी, तसेच अकॅडमीमध्ये येणारे ट्रेनी ऑफिसर्स यांना ते अतिशय सन्मानाने व प्रेमाने वागवीत. शिस्तीचे काटकोर पालन करावयास लावीत. सर्वांना समान न्याय हे त्यांचे तत्त्व होते.

      हाताखालीलअधिकाऱ्यास योग्यप्रकारे आपल्या कामाची माहिती करून देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्यांना निर्णयक्षम बनविणे, विचारपूर्वक योग्य निष्कर्ष घेण्यास प्रवृत्त करणे, कोणतेही काम समजून व सखोल झाले पाहिजे यावर भर देणे, प्रसंगी टिपणी तयार करणे या व अशा अनेक प्रकारांनी हाताखालील अधिकाऱ्यास आत्मनिर्भर बनविणे, अशा प्रकारे कार्य त्यांनी अविरतपणे केले.

      नगरहवेली मुक्तिसंग्राम प्रसंगातही त्यांनी प्रसंगावधान राखून अवघड जबाबदारी पार पाडली होती. तसेच, १९५६ मध्ये जेव्हा मुंबई भाषिक राज्याची घोषणा झाली, तेव्हा सुरत येथे तणावपूर्ण भीती निर्माण झाली होती. तेथील काँग्रेस भवनावर द्विभाषिक विधेयक आंदोलकांचा रोष ओढवेल अशी परिस्थिती होती. या वेळी विलक्षण व्यूहरचना करून, पोलीस बळाचा कमीतकमी वापर करून गोखले यांनी योग्य कामगिरी केली. त्या योगे संभाव्य हिंसाचार टळून शांतता टिकून राहिली.

      संपूर्ण पोलीस दल हे एक कुटुंब आहे व दलातील सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यानुसार ते सर्वांना सर्वतोपरी मदत करीत असत. नि:स्पृह, कर्तव्यनिष्ठ, तत्पर, स्वच्छ, धैर्यशील, दक्ष, उत्साही, स्पष्टवक्ते अशा प्रकारची त्यांची प्रतिमा जनमानसात झाली.

      सेवानिवृत्तीनंतर दोन वेळा त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून काम केले. तसेच अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले, उदा. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी संस्था, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, औरंगाबाद शाखा, श्री संस्थान एकनाथ महाराज, पैठण येथे विश्वस्त.

      गोखले यांच्या सहधर्मचारिणी इंदुमती यांनीही त्यांना सर्व गोष्टींत पाठिंबा दिला व कुटुंबाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.

     - वसुधा विशाल कानडे

गोखले, श्रीपाद गणेश