Skip to main content
x

गोरे, नारायण गणेश

गोरे नानासाहेब

     नारायण गणेश गोरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदळे गावात झाला. ते पुण्यातून बी.ए.,एल्एल.बी. झाले. नानासाहेब प्रत्यक्ष राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिले, तरीदेखील त्यांचा पिंड मूलतः सामाजिक राजकीय विचारवंताचा होता. सामाजिक, वैचारिक लेखनाबरोबरच त्यांनी विपुल ललित लेखनही केले. संपादक या नात्यानेही त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. निर्भीड राजकीय विचारवंत, असा लौकिक त्यांनी संपादन केला. महाराष्ट्रात समाजवादी विचारसरणी रुजविण्याचे कार्य त्यांनी केले. यासाठी प्रत्यक्ष कृतिशीलतेबरोबरच शब्दांचा आणि विचारांचा आधार त्यांनी घेतला. १९४८मध्ये त्यांनी लिहिलेले ‘समाजवादच का?’ हे पुस्तक या संदर्भात उल्लेखनीय आहे. वस्तुतः नानासाहेबांच्या लेखनाचा प्रारंभ १९४२च्या कारावासात झाला. गुलबर्ग्याच्या तुरुंगात असताना त्यांनी केलेले दैनंदिनी सदृश्य लेखन ‘कारागृहाच्या भिंती’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. याशिवाय ‘भारताची पूर्व सरहद्द’ (१९५३), ‘तापू लागलेला हिमालय’ (१९५३) ही त्यांची राजकीय-वैचारिक पुस्तके उल्लेखनीय ठरली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्राचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.

     नानासाहेबांकडे सौंदर्यदृष्टी होती आणि संवेदनशील मनही होते. त्यांच्या ललित स्वरूपाच्या लेखनातून हे स्पष्ट होते. ‘सीतेचे पोहे’ हा त्यांचा पहिला ललित लेखसंग्रह १९५३मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘डाली’ (१९५६), ‘गुलबर्गा’ (१९५९), ‘शंख आणि शिंपले’ (१९६४) हे त्यांचे ललित लेखसंग्रह रसिकांसमोर आले. ‘चिनारच्या छायेत’ (१९६९) व ‘काही पाने काही फुले’ (१९८३) या त्यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या सहज शैलीचे व संवेदनशीलतेचे प्रत्यंतर येते. नानासाहेबांच्या रसिक मनाची साक्ष त्यांनी १९५६ मध्ये कलिदासाच्या मूळ संस्कृत भाषेतील ‘मेघदूत’ या काव्याच्या केलेल्या मराठी अनुवादातून पटते. त्यांची २५ पेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादन १९७९ ते १९८३ या काळात केले. याशिवाय ‘जनवाणी’, ‘रचना’, ‘जनता’ आदी नियतकालिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मराठी साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि आद्य मानल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे नानासाहेबांनी १९७० ते १९७३ या काळात सांभाळली.

    - मनोहर सोनवणे

गोरे, नारायण गणेश