Skip to main content
x

गोरे, सौदागर नागनाथ

गायक, गायकनट, संगीतकार 

 

सौदागर नागनाथ गोरे म्हणजेच छोटा गंधर्वयांचा जन्म सातारा जिल्ह्यातील भाडळे या गावी झाला.  त्यांनी १९२८ साली दामुअण्णा जोशी यांच्या बालमोहन नाटक कंपनीत नाटकातून भूमिका करण्यास  सुरुवात केली. संगीत प्राणप्रतिष्ठाआणि संगीत स्वर्गावर स्वारीअशी ती दोन नाटके होती. जेमतेम दहा वर्षे वयाच्या सौदागरची गाणी त्या वेळी खूपच गाजली.

मराठी नाट्यसंमेलनात १९२९ साली शंकराचार्य डॉक्टर कूर्तकोटी यांच्या हस्ते सौदागरचा सत्कार झाला आणि त्याला स्वरकिन्नरअशी पदवी दिली गेली. यानंतर बालमोहन कंपनीच्या प्रत्येक नाटकात सौदागरला प्रमुख स्त्री-पात्राची भूमिका मिळत गेली. यांमध्ये संशयकल्लोळ’, ‘माझा देेश’, ‘स्वर्गावर स्वारी’, ‘मूर्तिमंत सैतान’, तसेच त्यानंतरच्या काळात आचार्य अत्रे यांची साष्टांग नमस्कार’, ‘लग्नाची बेडी’, ‘वंदे मातरम्यांसारखी अनेक नाटके होती.

त्यांनी १९४३ मध्ये बालमोहनमधून बाहेर पडून  अन्य सहकारी कलाकारांसमवेत कलाविकास मंडळीची स्थापना केली. मैलाचा दगड’, ‘फुलपाखरे’, ‘गुणी बाळेअशी अनेक नाटके या कलाविकासने सादर केली. मात्र सर्वांत जास्त प्रसिद्धी ज्याला मिळाली ते नाटक म्हणजे देवमाणूस’. यातली पदे छोटा गंधर्वांनीच रचली होती आणि चालीही त्यांनीच दिल्या होत्या. दिलरुबा मधुर हा’, ‘चांद माझा हा हासरा’, ‘सुखवीत या संसारा’, ‘छळी जीवा दैवगतीअशी त्या नाटकातील काही प्रसिद्ध गीते होती, जी अजूनही रसिकांच्या कानांत आणि गायकांच्या ओठांवर आहेत.

कलाविकास१९४९ मध्ये बंद पडली आणि कंपनीचे कर्ज फेडण्याची जबाबदारी प्रामुख्याने छोटा गंधर्वांवरच पडली. त्यांनी त्यातूनच १९५० पासून इतर विविध नाटक मंडळींच्या नाटकांत रोजंदारी पद्धतीने कामे करायला सुरुवात केली. मात्र ही नाटके म्हणजे प्रामुख्याने किर्लोस्कर आणि गंधर्व नाटक मंडळींनी गाजवलेली नाटके होती जसे की, ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘विद्याहरण’, ‘संशयकल्लोळवगैरे. त्यांनी १९५७ मध्ये स्वतःची छोटा गंधर्व कन्सर्न्स’  ही संस्था स्थापन केली आणि हीच नाटके त्यांनी हाती घेतली. यांतल्या त्यांच्या भूमिका आणि त्यांचे गायन यांना इतकी अफाट लोकप्रियता लाभली, की नाटकाच्या प्रयोगाची तिकीटविक्री सुरू झाली की तासाभरात सगळी तिकिटे संपायची.

 त्यांनी १९६० साली सुवर्णतुलाया नाटकासाठी चाली दिल्या आणि त्यात नारदाची भूमिकासुद्धा केली. पठ्ठे बापूराव’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पुढारीया मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायनही केले. त्यांनी १९७८ साली त्यांचे गायन भरात असूनही संगीत रंगभूमीवरून मानाने निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्यांनी गायनाच्या मैफलींवर लक्ष केंद्रित केले, तसेच १९८८ साली लंडनचा दौराही केला. छोटा गंधर्व यांचा लौकिक संगीत रंगभूमीवरील गायकनट म्हणून जास्त होता हे जरी खरे असले, तरी ते कसलेले ख्यालगायक होते. बागलकोटकर, गोवित्रीकरबुवा, नरहरबुवा पाटणकर, सवाई गंधर्व, भुर्जी खाँ यांसारख्या गायकांकडून त्यांनी ख्यालगायकीचे शिक्षण घेतले होते. त्याचबरोबर सिंदे खाँ या अवलिया गायकाकडून त्यांनी रागरागिण्यांचे अमाप भांडार प्राप्त केले होते. उपजत मधुर, लडिवाळ आवाज, कुशाग्र बुद्धिमत्ता, जास्तीतजास्त विद्या मिळविण्याचा हव्यास आणि अमाप कष्ट या भांडवलावर त्यांनी आपली स्वतःची आगळीवेगळी आणि आकर्षक गायनशैली बनविली होती.

ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्र यांसारख्या घराण्यांच्या शैलींचा त्यांच्या गायनात मिलाफ होता, शिवाय या गायनाला त्यांचा स्वतःचा रंग होता. प्रचलित, तसेच अनवट रागांचा भरणा, शिस्तबद्ध तरीही रंगतदार आलापी, बढत, लयकारी, तीनही सप्तकांत सहज फिरणारा आवाज आणि कोणत्याही लयीत अफाट फिरणारी तान या गोष्टींमुळे त्यांचे गाणे वेगळे आणि रंजक असायचे.

कर्नाटक संगीतातले वाचस्पती, वागधीश्वरी, शुद्धरसाळी, जनसंमोहिनी यांसारखे अनेक राग त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायनशैलीत प्रचलित केले. त्याचबरोबर नंदबसंतभुवनेश्वरी, चंद्रशेखर, गुनकंस, बसंतकोश, मालतीकोश यांसारख्या स्व-निर्मित रागांनी हिंदुस्थानी रागसंगीताच्या खजिन्यात मोलाची भर टाकली. ख्यालगायकीसाठी त्यांनी अनेक बंदिशींची रचना केली. सुरुवातीला या बंदिशींमध्ये त्यांनी गुणरंगहे टोपणनाव म्हणून धारण केले होते. मात्र स्वतः आध्यात्मिक वृत्तीचे असल्याने, तशाच काही तात्त्विक विचारसरणीने त्यांनी हे नाव नंतर वगळले.

ख्यालगायनाबरोबरच, उपशास्त्रीय गायन प्रकारातील ठुमरी, दादरा, कजरी, झूला, फाग, सावन यांसारख्या प्रकारांचा मोठा साठा त्यांच्याकडे होता आणि अतिशय रसाळ पद्धतीने ते त्यांचे गायन करीत. तराणे ते सर्रास असे गात नव्हतेे. फरमाइशी तराणे, म्हणजे ज्यांचा अंतरा हा काही फारसी ओळींमधून बनलेला असतो, त्यांचे गायन ते करीत. मात्र त्या फारसी ओळींचा अर्थ ते स्वतः समजून घेत आणि श्रोत्यांनाही सांगत. जुन्या ढंगाची बैठकीची लावणीही ते उत्तम गात. तसेच ते खास मराठी अभंग गायनाच्याही मैफली करत.

ख्यालगायकीतही चिजा गाताना त्या अर्थपूर्ण असल्याच पाहिजेत या गोष्टीवर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे अनेक प्रसिद्ध बंदिशींचे मूळ अर्थपूर्ण शब्द त्यांनी प्रयासाने मिळवले आणि मगच त्यांचा समावेश आपल्या गायनात केला. यासाठी ब्रज, भोजपुरी, उर्दू आदी भाषांचा त्यांनी खास अभ्यास केला. संतकवींच्या अनेक रचना त्यांनी स्वरबद्ध केल्या आणि ते अत्यंत भक्तिभावाने त्या आपल्या कार्यक्रमात सादर करीत. ठुमरी-दादरा किंवा नाट्यपद गात असताना मूर्च्छनाभेद या अद्भुत क्रियेतून ते षड्ज बदलून गाण्याचा आभास करीत आणि सामान्य श्रोत्यांबरोबरच जाणकारांनासुद्धा चक्रावून टाकत.

छोटा गंधर्व यांना निसर्गदत्त अशा गोड आवाजाची देणगी तर होतीच; पण त्यांनी जाणीवपूर्वक इतर कलाकारांच्या गायनशैलींचा आणि आवाजांचा अभ्यास केला आणि मग स्वतःचा वेगळा असा आवाज बनवला. ते बालगंधर्व आणि उस्ताद अब्दुल करीम खाँ यांना आदर्श मानत. वझेबुवा, मास्टर दीनानाथ मंगेशकर, बडे गुलाम अली खाँ, विलायत हुसेन खाँ, मास्तर कृष्णराव यांसारख्या ख्यालगायनातील धुरंधरांचे गाणे त्यांनी आपल्या कानांत साठवले.

जुन्या जमान्यातील मौजुद्दीन खाँ, मलकाजान, गोहरजान, सुंदराबाई, जानकीबाई, प्यारासाहेब यांसारख्या  अनेक गायक आणि गायिकांच्या ध्वनिमुद्रिकांचाही त्यांनी डोळसपणे अभ्यास केला आणि त्यांतील उत्तमोत्तम तत्त्वे आपल्या स्वतःच्या शैलीत, आपल्या गायकीतून मांडली. समकालीन कलाकारांबाबत कधीही त्यांच्या तोंडून अनुद्गार बाहेर पडले नाहीत. उलट जे त्यांना चांगले वाटत, अशा अनेकांच्या बाबतीत ते फार प्रेमाने आणि आदराने बोलायचे. ते मितभाषी नक्कीच होते; पण जे काही थोडेसेच बोलायचे, ते अत्यंत मार्मिक आणि बोधप्रद असायचे. त्यांनी संस्कृतचाही व्यासंग केला होता व काही संस्कृत काव्य, स्तोत्रांची रचनाही केली होती.

स्वरराजआणि छोटा गंधर्वही नामाभिधाने त्यांना रसिक श्रोत्यांकडूनच मिळाली होती. संगीत अकादमीपुरस्कार (१९९०), ‘विष्णुदास भावे पुरस्कारव मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९८०), महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र गौरवपुरस्कार (१९९२) वगैरेंमधून त्यांचा यथोचित गौरव झाला.  पुणे भारत गायन समाजाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. शिवाय छोटा गंधर्व यांच्या नावाने अनेक संस्थांनी पुरस्कारसुद्धा ठेवले आहेत.

छोटा गंधर्वांच्या एकुलत्या एक पुत्राचे अपघाती निधन त्यांच्या उतारवयात झाले. त्यांची १९९७ नंतर प्रकृती खालावतच गेली होती आणि पुणे येथे त्यांचे दुःखद निधन झाले.

विश्वनाथ ओक

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].