Skip to main content
x

गोरक्षकर, सदाशिव वसंतराव

      दाशिव वसंतराव गोरक्षकर यांचा जन्म मुंबई येथील सांताक्रूझ येथे झाला. शाळेतल्या मित्रामुळे वयाच्या ११व्या वर्षी त्यांचे रा.स्व. संघाशी नाते जुळले. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरी करत करत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. इतिहास विषयाच्या आवडीमुळे त्यात बी.ए. केले आणि मग एम.ए. करताना प्राचीन भारतीय संस्कृतीचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला. त्यांनी १९६० मध्ये एलएल.बी.ही पूर्ण केले. इतिहास विषयातली त्यांची आवड आणि गती लक्षात घेऊन इतिहासाच्या प्राध्यापकांनी बडोदा येथे असलेला म्युझिऑलॉजीचा दोन वर्षांचा पदवी अभ्याक्रम करण्याविषयी त्यांना सांगितले. गोरक्षकरांनी बडोद्याला जाऊन पदवी घेतल्यानंतर १९६२-६३ मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठात संग्रहालयशास्त्रातील व्याख्याते म्हणून नोकरी केली. त्यानंतर मुंबईत परतल्यावर काही काळ वकिली करून १९६४मध्ये ते काळा कोट उतरवून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये असिस्टंट म्हणून रुजू झाले आणि पुढची बत्तीस वर्षे तिथेच रमले. १९६४ ते १९७५ या काळात साहाय्यक/क्युरेटर व १९७५पासून १९९६ मध्ये निवृत्त होईपर्यंत संचालक म्हणून त्यांनी काम केले.

संग्रहालयशास्त्रात गोरक्षकारांचे फार मोठे योगदान आहे. आपण केलेल्या वस्तूंच्या मांडणीतून भेट देणाऱ्या व्यक्तींच्या मनात अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा जागी करणे, हे संग्रहालयाचे एक प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे हा विचार  गोरक्षकरांनी प्रिन्स ऑफ वेल्समधील आपल्या सहकाऱ्यांमध्ये रुजवला, चेअरमनसह सर्व विश्वस्तांना पटवला. स्थापनेनंतर पन्नास वर्षांनी या म्युझियमने कात टाकली. केवळ संग्रहातल्या वस्तूंची विषयानुरूप पारंपरिक मांडणी, इतकेच संग्रहालयाचे स्वरूप मर्यादित न ठेवता गोरक्षकरांनी नवनव्या विषयांवर, संकल्पनांवर आधारित दालने उभी केली. सर्वसामान्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या दिशेने न वळलेल्यांची पावलेही संग्रहालयाकडे वळायला लागली. म्युझियममध्ये आल्यावर दोनच वर्षात गोरक्षकरांना रॉकफेलर फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. यामुळे युरोपातील व विशेषत: अमेरिकेतील उत्तमोत्तम संग्रहालये त्यांना पाहता आली. या अनुभवामुळे त्यांचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला. गोरक्षकरांच्या कार्यकाळात अनेक दुर्मिळ, वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा खजिना म्युझियममध्ये आला. त्यातही घारापुरीच्या लेण्यांशी नाते सांगणार्‍या शिवमूर्तीचा गोरक्षकरांना लागलेला शोध हा त्यांच्या कारकिर्दीतला एक मानाचा तुरा आहे. जवळजवळ बत्तीस वर्षे गोरक्षकर आणि म्युझियम हे अद्वैत होते. या काळात त्यांनी म्युझिऑलॉजी या विषयातील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत देशाचे प्रतिनिधित्व केले. विविध विषयांवरचे संशोधनात्मक प्रबंध सादर केले. स्वीडन, जपान, मॉरिशस, बल्गेरिया या चार देशांमध्ये भारत सरकारतर्फे प्रदर्शन मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या सेनेटवर Chancellors Nominee म्हणून व राष्ट्रकुल परिषदेचे (Commonwealth Association of Museums) अध्यक्ष म्हणून निवड झाली. तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी सुचवल्यामुळे ओ.एन.जी.सी.साठी उभारून दिलेले संग्रहालय, मुंबईत वडाळा इथे उभारलेले कुष्ठरोगावरचे म्युझियम, वानगीदाखल ही दोन उदाहरणेही त्यांच्या कामातले वैविध्य दाखवण्यासाठी पुरेशी आहेत.

 मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटरच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि ललितकला प्रकाशनाच्या प्राचीन मंडळाचे सन्माननीय सह-संपादक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गोरक्षकर यांना इ.स. २००३मध्ये ‘पद्मश्री’ व २००७ मध्ये ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्राप्त झाले आणि २०११मध्ये अतिशय मानाची अशी ‘टागोर फेलोशिप’ जाहीर झाली, तेव्हा ८०च्या उंबरठ्यावर असलेल्या या ज्ञानसाधकाने पूर्वीच्याच उत्साहाने आणि शिस्तीने दिल्लीच्या नॅशनल म्युझियममधील धातुमूर्तींचा अभ्यास सुरू करून त्या विषयाला न्याय दिला. २०१७ मध्ये चतुरंगच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे ते मानकरी ठरले. आपल्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे निगुतीने जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचवण्यासाठी गोरक्षकरांनी शब्दश: आपलं आयुष्य वेचले आहे.

दीपक हनुमंत जेवणे

गोरक्षकर, सदाशिव वसंतराव