Skip to main content
x

गोवारीकर, शंकर रणछोडदास

     डॉ.शंकर गोवारीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. विद्युत अभियांत्रिकी या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अणू पदार्थविज्ञान या विषयात त्यांनी त्यांच्या मास्टर्स आणि डॉक्टरेट पूर्ण केले.

     १९५५ साली महाविद्यालयीन शिक्षणानंतर शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अणुउर्जा आस्थापन (एटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट), तुर्भे इथून झाली. त्यानंतर जवळजवळ तीन वर्षे डॉ.गोवारीकर यांनी अणू ऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले, न्यूट्रॉन काउण्टर विकसित करून तयार केले. या अनुभवाचा उपयोग त्यांना पुढे म्हणजे युरोपमधील बर्मिंगहॅम विद्यापीठात संशोधन सहायक (रिसर्च असोसिएट) म्हणून काम करताना झाला. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी उच्च धारेचा प्रोटॉन स्रोत विकसित केला आणि त्याचे ब्रिटिश एकस्वही मिळवले. त्याच सुमारास भारत शासनाने डॉ. शंकरराव गोवारीकर यांना ब्रिटिश अणू ऊर्जा संशोधन आस्थापना आणि फ्रेंच अणू ऊर्जा संशोधन आस्थापना या ठिकाणी विद्युतचुंबकीय पद्धतीने समस्थानिके वेगळी करण्याच्या प्रक्रियांविषयीच्या संशोधनात सहभागी होण्यासाठी  पाठवले.

     १९६१ साली डॉ. गोवारीकर भारतात परतले आणि त्यांच्याकडे भारताचा पहिला विद्युतचुंबकीय समस्थानिक विभाजक तयार करण्याच्या प्रकल्पाचे नेतृत्व सोपवले गेले. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे आणि मोठया कुशलतेने यशस्वी करून दाखवली. डॉ. होमी भाभा यांनी त्यांच्या या कामाचे मनापासून कौतुक केले. त्यानंतर  त्यांना अमेरिकेतल्या टेक्सास येथे व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉनच्या कामाचा अनुभव घेण्यासाठी एक वर्षासाठी पाठवण्यात आले. तिथल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी कोलकाता येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन तयार करण्याकरिता केला. कोलकाता येथील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यावर, त्यांनी बी.ए.आर.सी.तील तांत्रिक पदार्थविज्ञान आणि प्रोटोटाइप इंजिनिअरिंग डिव्हिजनच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.

     १९८३ साली डॉ. शंकर गोवारीकर यांनी चंदिगडमधल्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (सी.एस.आय.ओ.) या संस्थेच्या संचालकपदाचा भार सांभाळला. तेथे त्यांनी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, ४ एम.इ.व्ही. लीनिअर अ‍ॅक्सलरेटरसारखी वैद्यकीय उपकरणे, अंतराळ संशोधनासाठी आणि शेतकी कामासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांसाठी  ऑप्टिक साधने विकसित करणे, यांसारख्या अनेक राष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले.

     निवृत्त झाल्यानंतर, त्यांची पतियाळा येथील थापर कॉर्पोरेट संशोधन आणि विकसन केंद्राच्या कुलगुरू आणि संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांनी पुढील चार वर्षे या पदाचा भार यशस्वीपणे सांभाळला. याशिवाय, ते इंडियन व्हॅक्युम सोसायटीचे सरचिटणीस आणि अध्यक्ष होते आणि डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डी.आर.डी.ओ.) निवड समितीचे अध्यक्षही होते.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

गोवारीकर, शंकर रणछोडदास