Skip to main content
x

ग्रीअर्सन, जॉर्ज अब्राहम

      यर्लंडमधील डब्लिनजवळ ग्लेनेजरी येथे जॉर्ज अब्राहम ग्रिअर्सन यांचा जन्म झाला. ट्रिनिटी कॉलेज (डब्लिन) येथे गणिताचा विद्यार्थी असताना त्यांनी संस्कृत व हिंदी भाषांविषयी पारितोषिके मिळवली. ऑक्टोबर १८७३ मध्ये ते बंगालमध्ये भारतीय सनदी सेवेत रुजू झाले. तेथे १८९८ सालापर्यंत शासकीय सेवेबरोबरच त्यांनी भाषांविषयीच्या संशोधनातही पुष्कळ लक्ष घातले. त्यांनी प्रबंध, परीक्षणे, शोधनिबंध व पुस्तके या रूपात प्रचंड लेखन केले. आपल्या कामातून मिळणार्या रिकाम्या वेळेत त्यांनी हिंदुस्थानातील असंख्य भाषा व लिपी यांचा अभ्यास केला. त्यांनी कालिदासावरील आपला पहिला निबंध १८७७ मध्ये प्रसिद्ध केला. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांचा व्यासंग सतत चालू होता.

१९३६ साली यांचा ८५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्या वेळी यांना व्हॉल्यूम ऑफ इंडियन अँड इराणियन स्टडीजहा ग्रंथ अर्पण करण्यात आला. त्या ग्रंथात हिंदुस्थानात ६० वर्षापर्यंत त्यांनी केलेल्या भाषाशास्त्रविषयक अभ्यासाचा अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. त्याच ग्रंथाची २० पाने त्यांच्या लिखाणाच्या सूचीने व्यापलेली होती. यावरून त्यांच्या लिखाणाचा व्याप ध्यानात येतो. तसेच हिंदुस्थानातील २००पेक्षा अधिक लिप्यांवर असलेले प्रभुत्वही समजून येते. अनेक लिप्यांप्रमाणे अनेक भाषाही त्यांना येत असल्या, तरी हिंदुस्थानातील वायव्य भागाच्या भाषेवर यांचे विशेष प्रभुत्व होते. यांनी त्यापैकी कित्येक ज्ञात व अज्ञात भाषांची व्याकरणे लिहिली तसेच मध्ययुगीन व अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांची  भाषांतरे केली.

त्यांनी लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाया ग्रंथाचे २० खंड प्रसिद्ध करून हिंदुस्थानातील भाषांच्या अभ्यासकांना पूर्वपरंपरा तर प्रकट करून दाखवलीच, त्याशिवाय त्या त्या भाषेतील अनेक उतारे देऊन नवीन अभ्यासकांना सांगाडा निर्माण करून देऊन त्यांच्या घटनेचा अभ्यास करून, त्यांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला. यांच्या या कार्यामुळे हिंदी विश्वविद्यालयाचे भाषाशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाकडे लक्ष ओढले गेले. यापुढे प्रत्येक संशोधकावर त्यांच्या या कार्याची छाप पडणे अपरिहार्य होऊन बसले आहे.

सेव्हन ग्रामर्स ऑफ द डायलेक्ट्स अँड सबडायलेक्ट्स ऑफ द बिहारी लँग्वेज’ (१८८३-८७) आणि बिहार पीझंट लाइफ’ (१८८५) ही त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या पुस्तकांपैकी दोन पुस्तके होत. यापैकी दुसर्या पुस्तकात भाषेविषयीची पुष्कळ माहिती आहेच, शिवाय यात बिहारमधील शेतकर्यांचे जीवन, शेतीच्या पद्धती व श्रद्धा याविषयीचे वर्णनही आलेले आहे. त्यांनी हिंदी, वायव्य भारतातील दद्रिक भाषा व काश्मिरी भाषा याविषयीही संशोधन केले.

त्यांनी भारताचे भाषाशास्त्रीय दृष्टीने सर्वेक्षण केले. १८९८-१९२८ या कालावधीमध्ये आणि ३६४ भाषा आणि बोलीभाषा याविषयी माहिती मिळवली. भारताच्या भाषाविषयक सर्वेक्षणाला (पाहणीला) त्यांनी १८९८ साली सुरुवात केली आणि त्यापुढील ३० वर्षे अथक प्रयत्न करून त्यांनी ८००० पृष्ठांचे १९ खंड भरतील एवढी माहिती गोळा केली. नॉर्वेजियन भाषाशास्त्रज्ञ स्टेन कोनौंनी लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ (१८९४-१९२७) या एकोणीस खंडांपैकी इंडो-युरोपियन भाषांविषयीचे पाच खंड तयार केले, तर इतर बहुतेक ग्रिअर्सननी सिद्ध केले होते. हे सर्वेक्षण म्हणजे संघटना चातुर्यातील मोठे यश होते. कारण यात त्यांनी इंडो-युरोपियन, चिनी, ऑस्ट्रो-आशियाई आणि भारतातील द्राविडी भाषाकुल यांचा एकत्रित आढावा घेतला होता. बहुतेक भाषा व बोलीभाषांच्या बाबतीत शब्दसंग्रहांशिवाय व्याकरणाचा आराखडा व थोडक्यात संहिताही दिल्या होत्या. या सर्वेक्षणाचे ते १८९८-१९२८ दरम्यान संचालक होते व त्यांनी १९०३पासून कँबर्ली या आपल्या गावातून हे काम केले. या सर्वेक्षणाच्या काळात त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. उदा.ॅन इंट्रोडक्शन टू द मैथिली डायलेक्ट ऑफ द बिहारी लँग्वेज (१९१०), ‘अ मॅन्युअल ऑफ काश्मिरी लँग्वेज’ (१९११), ‘ए डिक्शनरी ऑफ द काश्मिरी लँग्वेज’ (१९१६-३२), ‘लल्ल-वाक्यानि’ (१९२०) वगैरे. शिवाय त्यांनी अनेक प्राचीन संहिता व कोरीव लेख यांची भाषांतरे केली.

त्यांचा हा प्रचंड प्रयत्न भाषाशास्त्रातील नवीन शोधास जन्म देणारा असल्याने त्यांच्या उत्तरायुष्यात त्यांच्यावर जगातील सर्व भागांतून पदवी व मान यांचा वर्षाव झाला. बंगालच्या व मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या शाखेचे हे ऑननरी फेलो होते. नागरी प्रचारिणी सभा (काशी), बिहार अँड ओरिसा रिसर्च सोसायटी, दि मॉडर्न लँग्वेज असोसिएशन, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया व बंगीय साहित्य परिषद या संस्थांचे ते मानद सभासद होते. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे कँबेल सुवर्णपदक व बंगाल रॉयल एशियाटिक सोसायटीचे सर विल्यम जोन्स सुवर्णपदकही त्यांना मिळाले होते.ग्रिअर्सनना १९१२ साली सरहा किताब तर १९२८ साली द ऑर्डर ऑफ मेरिटहा इंग्लंडचा सर्वोच्च बहुमान देण्यात आला. कँबर्ली (सरे, इंग्लंड) या त्यांच्या गावी वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

संपादित

ग्रीअर्सन, जॉर्ज अब्राहम