ग्रीन, जॉनी विल्यम
जॉनी विल्यम ग्रीन यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे झाला. १६ जून १९५१ रोजी त्यांची हवाई दलामध्ये नियुक्ती करण्यात आली. १९६५ सालच्या पाकिस्तान युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये स्क्वॉड्रन लीडर जॉनी विल्यम ग्रीन यांनी छांब भागात हल्ला करणाऱ्या नॅट विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. याच भागात पाकिस्तान मात्र क्षेपणास्त्रांनी युक्त अशा एफ-८६ सेबर व एफ १०४ स्टारफाइटर यांसारख्या विमानांचा वापर करीत होता. ३ व ४ सप्टेंबर रोजी त्यांनी केलेल्या व्यूहरचनेनुसार शत्रूबरोबर पहिली चकमक सुरू झाली. शत्रूकडील वरचढ युद्धसाहित्याला न जुमानता त्यांनी आपल्या व्यूहरचनेत अशा कौशल्याने बदल केले की त्यामुळे त्यांना या पहिल्याच चकमकीत शत्रूची दोन विमाने टिपता आली. त्याचबरोबर, जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करणाऱ्या मिस्टरी व कॅनबेरा विमानांना सुरक्षा पुरवणाऱ्या व्यूहरचना त्यांनी वापरल्या. या सर्व हल्ल्यांतील यश हे मुख्यत्वे त्यांचे शौर्य आणि नेतृत्व यांमुळेच मिळाले. ३सप्टेंबर१९६५ रोजी ‘वीरचक्र’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना एअर मार्शल पदापर्यंत बढती मिळाली. ‘परमविशिष्ट सेवा पदक’ ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ व ‘वायुसेना पदक’ असे पुरस्कारही मिळाले.