गरुड, गोपाळ कृष्ण
गोपाळ कृष्ण गरुड यांचा जन्म पुणे येथे झाला अहमदनगर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये सैनिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दि. १९ डिसेंबर १९६१ रोजी त्यांची वायुसेनेत नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर १९६५ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट गोपाळ गरुड शत्रूच्या भूभागाची टेहळणी करणाऱ्या विमानांच्या तुकडीत चालक म्हणून काम करत होते. हे टेहळणीचे काम अतिशय धोकादायक असते कारण, हे काम भरदिवसा, आणि कोणत्याही संरक्षणाशिवाय केले जाते.
पाकिस्तानबरोबरच्या युद्धांमध्ये त्यांनी नेहमीच अत्यंत जोखमीची कामगिरी स्वीकारून शत्रूशी अत्यंत महत्वाची माहिती मिळवून आणली. या माहितीच्या आधारेच अनेक योजना आखणे व त्या यशस्विरीत्या पूर्ण करणे शक्य झाले. आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्यांनी उच्चतम धैर्याचे व कार्यकुशलतेचे उदाहरण समोर उभे केले. या कार्याबद्दल त्यांना दि. २२ सप्टेंबर १९६५ रोजी ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.