Skip to main content
x

गुंडी, नीलिमा माधव

     नीलिमा गुंडी यांचे पूर्वाश्रमीचे नाव नीलिमा राम वैद्य. शिक्षण एम.ए., पीच.डी., डी. एच. ई. हे सारे मुंबई येथे झाले. बी.ए.च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्व विषयांमध्ये सर्वप्रथम येऊन त्यांनी नवा उच्चांक प्रस्थापित केला. एम.ए.लाही मुंबई विद्यापीठात त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्या. या दोन्ही वर्षी विद्यापीठातील विविध पारितोषिकांबरोबर त्या सुवर्ण पदकाच्याही मानकरी ठरल्या. ‘काव्य आणि काव्यविचार’ हा त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता.

     सध्या त्या स.प.महाविद्यालय, पुणे येथे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. मराठीत बालसाहित्य जरी विपुल प्रमाणात लिहिले गेले असले, तरी मुलांच्या भावविश्वात त्यांच्या कल्पना मांडणारे आणि त्यातून त्यांना नवे अनुभव देणारे साहित्य अपवादातून दिसते. डॉ. गुंडी यांचे साहित्य वाचताना याचा प्रत्यय येतो. मात्र केवळ बालसाहित्यापुरतेच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित नाही तर काव्य, काव्यसमीक्षा, ललितगद्य, पुस्तक परीक्षण, व्याख्यान, निबंधलेखन आणि विविध पुस्तकांचे, ग्रंथांचे संपादन असे वाङ्मयविषयक विपुल कार्य त्यांनी केले आहे. त्यांचे ‘आभाळाचा फळा’, ‘कानामात्रा’, ‘रंगांचा थवा’, ‘दुधाचे दात’ इत्यादी बालकवितासंग्रह व ‘वार्‍यावर स्वार’, ‘देवमासा’ इत्यादी बालकथा प्रकाशित झाल्या आहेत. ‘स्पर्शरेषा’, ‘प्रकाशाचे अंग’ हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. याखेरीज ‘शब्दांची पहाट’, ‘अक्षरस्पंदन’ व ‘भाषाभान’ या ललित लेखसंग्रहांतून त्यांनी भाषा, साहित्य व संस्कृती यांविषयी मार्मिक निरीक्षणे नोंदवली आहेत.

     काव्य हा त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि त्यामुळेच ‘लाटांचे मनोगत’ हा काव्यविषयक लेखसंग्रह त्यांनी स्वतंत्रपणे संपादित केला. या संग्रहातून १९५० ते २००० ह्या कालावधीतील स्त्रियांच्या काव्याचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी घेतला आहे. याखेरीज ‘कविता विसाव्या शतकाची’ ‘चैतन्यवेल’ असे काव्यविषयक ग्रंथही त्यांनी संपादित केले आहेत.

     ‘सकाळ’,‘साप्ताहिक सकाळ’,‘अंतर्नाद’ इत्यादी नियतकालिकांतून पाचशेहून अधिक पुस्तक-परीक्षणेही त्यांनी लिहिली आहेत. अनेक दर्जेदार नियतकालिकांतून कथा, कविता, ललित इत्यादी समीक्षणात्मक लेखनही त्यांनी केले.

     याखेरीज ‘मराठी वाङ्मय कोश’, ‘अक्षरवेल’ ‘युवकभारती’ इत्यादींच्या संपादनात मोलाचे साहाय्य त्यांनी केले आहे. ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाच्या संपादक मंडळावरही त्या कार्यरत आहेत. मराठी अभ्यास परिषदेच्या त्या कार्यवाह आहेत.

     डॉ. गुंडी यांना विदर्भ साहित्य संघातर्फे ‘वि. स. खांडेकर’ पुरस्कार, कल्याण महानगर पालिकेकडून ‘कल्याणभूषण’ पुरस्कार व रुईया महाविद्यालयाकडून ‘विद्याभूषण’ पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.

- वैखरी वैद्य

गुंडी, नीलिमा माधव