Skip to main content
x

गुंथर, सोन्थायमर

       प्राच्यविद्या आणि भारतीय विद्या या विषयांवर पाश्चात्त्य संशोधकांनी गेल्या शे-दीडशे वर्षांत प्रचंड संशोधन केले. विशेषत: जर्मन संशोधकांनी संस्कृत भाषेच्या आश्रयाने भारतीय संस्कृतीचा मागोवा अधिक स्वरूपात घेतला. पण मराठी संस्कृतीसाठी वाहून घेतलेल्या आणि ‘गुरुणां गुरू’ म्हणून ओळखले गेलेल्या, जर्मनी येथील हायडेलबर्गच्या डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे नाव अजरामर झाले आहे. लोकदेवता, जत्रा-यात्रा, श्री विठ्ठल, खंडोबा यासारखी लोकप्रिय दैवते, धनगर समाजाची संस्कृती, त्यांची लोकगीते अशा अनेक विषयांवर प्रचंड स्वरूपात काम करणाऱ्या ह्या संशोधकाचे वस्तुसंग्रहालयाच्या स्वरूपात स्मारक करण्याचे मराठी लोकांनी ठरवले असून ते मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

     डॉ. सोन्थायमर यांना लंडनमधून पीएच.डी. मिळाल्यावर १९५४ साली ते पुण्यात आले. पुण्यात येण्यामागे डॉ. रा.ना. दांडेकर, डॉ. डी.डी. कोसंबी आणि डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्याकडून क्रमश: संस्कृत, गणित आणि प्राचीन मराठी शिकण्याचा त्यांचा मानस होता. धर्मशास्त्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या कायदा महाविद्यालयामध्ये ते दाखल झाले. प्राचार्य पंडित यांनी त्यांना प्रेम-जिव्हाळा दिला. धर्मशास्त्राच्या समस्या सोडवण्यासाठी ते म.म. काणे यांच्याकडे मुंबईस जात. त्या निमित्ताने भांडारकर संस्थेत त्यांचे येणे-जाणे वाढले. डॉ. दांडेकरांशी  त्यांचे दृढ संबंध आले. दांडेकर १९३८ मध्ये हायडेलबर्ग (जर्मनी) विद्यापीठातून पीएच.डी. करून आले होते. ते संस्थेचे सचिव होते. कोसंबी यांच्याकडे गणित शिकतानाच सोन्थायमर यांची लोकदेवतांच्या अभ्यासाची गोडी वाढली. पुस्तकी ज्ञानापेक्षा भटकंतीतून मिळणारा अनुभव त्यांना महत्त्वाचा वाटला. त्यातून लोकदैवते विरोबा-विठोबा, खंडोबा, वीरगळ, धनगर जमात इत्यादी विषयांचा त्यांचा अभ्यास सुरू झाला आणि त्यांच्या रचनांचा अभ्यास करतानाच श्रीविठ्ठलाचे मूळ एका वीरगळात आहे असा धक्कादायक सिद्धान्त त्यांनी मांडला. ज्या ओव्यांवर-संदर्भावर तो आधारित होता, तो भाग पुढे म.म. मिराशींनी प्रक्षिप्त ठरवल्याने त्यावर पुढे काही झाले नाही. सोन्थायमर यांची जन्मभूमी हायडेलबर्ग त्यांच्या व्यासंगाने प्राचीन मराठी भाषेची कर्मभूमी बनली. १९७० सालानंतर पश्चिम जर्मनीतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी विविध विद्वान पुण्यात येऊन राहिले. त्यामध्ये संत साहित्य आणि प्राचीन मराठी हाच प्रमुख विषय होता. डॉ. स्कोय हॉक (एकनाथी भागवत), डॉ. मायकेल मार्टीनस (श्रीगोंद्याचा शेख महंमद), डॉ. जेनसन (तुळजाभवानी), डॉ. किट्टेकोनिग (लोकदेवता) आणि बरेच विद्यार्थी त्यांनी महाराष्ट्रात अभ्यासासाठी आणले.

     १९८८ साली हायडेलबर्गमध्ये सोन्थायमर यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक आणि संस्था परिषदेचे पहिले अधिवेशन आयोजले होते. त्यात जगभरातून पन्नास अभ्यासक महाराष्ट्र संस्कृतीवर शोध-निबंध वाचण्यासाठी हजर राहिले होते. डॉ. दांडेकर आणि डॉ. शं.गो. तुळपुळे या परिषदेला हजर होते. एक आंतरराष्ट्रीय भक्ती परिषद त्यांनी हायडेलबर्गलाच घेतली होती. विशेेष म्हणजे वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. सोनोपंत दांडेकरांच्या कीर्तनाचे ध्वनिमुद्रण त्यांनी तिथे ऐकवले. १९३८मध्ये डॉ. दांडेकरांना वेदावर पीएच.डी. मिळाली होती. त्याला १९८८मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली आणि त्याच क्षेत्रात ते सातत्याने काम करीत आहेत, हे पाहून हायडेलबर्ग विद्यापीठाने या पदवीच्या नूतनीकरणाचा समारंभ योजला होता. त्यातही डॉ. सोन्थायमर यांचा पुढाकार होता.

      खंडोबा आणि धनगर जमात यांचा अभ्यास करताना सातत्याने त्यांचा मुक्काम जेजुरीत असे. तिथल्या वास्तव्यात खेड्यातील जानपद मराठी भाषा त्यांच्या तोंडी असे. ‘व्हय’, ‘नगं’, ‘लई’ आणि शहरात इंग्रजी, विद्यार्थ्यांशी जर्मन असे बहुविध दर्शन त्यांच्या सहवासात मिळे.

      लोकदेवतात वीरगळ (ज्यावर त्यांनी पुढे ‘हिरोस्टोन’ नावाचा संशोधनात्मक ग्रंथ काढला.) विठोबा, म्हस्कोबा, यमाई-तुकाई, मरिआई या विषयाच्या अभ्यासासाठी, देवतांच्या स्थानासाठी ते महाराष्ट्र कर्नाटकात खूप हिंडले. धनगर मंडळींच्या वस्त्यावर राहिले. त्यांची गाणी ध्वनिमुद्रित केली, त्यांच्या जत्रा-यात्रात भाग घेतला, त्यावर त्यांनी संशोधनात्मक लेखन केले, शोधनिबंध वाचले. काही मंडळी तर त्यांच्या आप्ताइतकी जवळची झाली होती.

     पंढरपूरची वारी, पालखी सोहळा हा गुंथर यांच्या अति जिव्हाळ्याचा विषय. वारीवर त्यांनी १९८९मध्ये एकूण दीड तासांचा एक सुंदर माहितीपट काढला. हा लघुपट प्रथम प्रदर्शित करण्याचा मान जर्मन दूरचित्रवाणीने घेतला. त्यानंतर आशय फिल्म संघटनेने खासगीत फर्ग्युसन मध्ये हा लघुपट दाखवला. त्यावर भाष्य करण्यासाठी डॉ. सोन्थायमर उपस्थित होते. भारताच्या दूरचित्रवाणीवर तो फार उशीरा दाखवला गेला. या लघुपटात त्यांनी अनेक मान्यवरांच्या मुलाखती, आठवणी, मत-मतांतरे चित्रित केली होती. जुन्या मूर्ती (धातूंच्या), पारंपरिक गाणी, हस्तलिखिते या सर्वांचा एक उत्तम संग्रह त्यांच्याकडे निर्माण झाला होता. पुढे त्यांच्यानंतर डॉ. सोन्थायमर वस्तुसंग्रहालय काढण्याची योजना होती आणि तेही जेजुरीमध्येच. पण अद्याप त्याला मूर्त स्वरूप आलेले नाही. डॉ. दांडेकरांच्या पीएच.डी.च्या नूतनीकरणाच्या कामात हायडेलबर्गमध्ये गुंथर यांनी बरीच धावपळ केली. असे काही होणार आहे याची डॉ. दांडेकरांनी पुण्यात कोणासही चाहूल लागू दिली नाही. पण समारंभाचे प्रत्यक्षदर्शी डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी पुण्यात आल्यावर ‘सकाळ’मध्ये यावर सविस्तर लेख लिहिला. दांडेकरांचे सर्वत्र अभिनंदन झाले. पुढे दांडेकरांनी भांडारकर संस्थेमध्ये गुंथर सोन्थायमर यांच्या सत्काराचा कार्यक्रम योजला होता.

     डॉ. सोन्थायमर अविवाहित होते. त्यांचे वडील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९८५ च्या सुमाराला थोड्या फरकाने माता-पित्याचे छत्र हरपले आणि जर्मनीतील आकर्षण संपले. सोन्थायमर यांच्या संशोधनात डॉ. अ‍ॅन फेल्ड हौस यांचाही सहभाग मोठा असे. त्यांनी व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’चे जर्मन भाषांतर केले होते. वीरगळावर ‘हिरोस्टोन’ नावाचे पुस्तकही खूप गाजले होते. डॉ. सोन्थायमर यांचे वयाच्या चोपन्नाव्या वर्षी हृदयविकाराने राहत्या घरी जर्मनीत निधन झाले. मृत्यूनंतर आपल्या कलेवराचे दहन करावे आणि रक्षा जेजुरीला कऱ्हेच्या  पात्रात टाकावी, असे मरण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवले होते. त्यानुसार अस्थी पुण्यात भांडारकर ग्रंथालयात ठेवल्या होत्या. जेजुरीकरांनी गडाच्या पायथ्याला अस्थिकलशावर पुष्पवर्षाव करून त्यांना श्रद्धांजली वाहिली व कर्‍हा नदीत अस्थिविसर्जन केले. सोन्थायमर यांचे नाव आणि संशोधन अजरामर झाले.

वा. ल. मंजूळ

गुंथर, सोन्थायमर