Skip to main content
x

गुप्ते, अनंत खंडेराव

       नंत खंडेराव गुप्ते यांचा जन्म लोणावळा येथे एका मध्यम परिस्थितीतील कुटुंबात झाला. त्यांचे वडील माळीनगर साखर कारखान्यात इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात काम करत होते. अनंत गुप्ते यांचे बालपण पुण्यातच गेले, तसेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामधून फर्स्ट इयर सायन्स १९४४ साली पूर्ण करून पुणे येथील शेतकी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला व १९४७ साली बी.एस्सी. (कृषी) विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली.

       त्यानंतर अनंत गुप्ते यांची लगेच भात संशोधन केंद्र, कर्जत येथे शेतकी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. येथील वास्तव्यात त्यांनी उत्तर कोकणासाठी ई.के. ७० हा उन्नत वाण प्रा. व्ही.एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केला (१९५०). त्यानंतर भात संशोधन केंद्र, वडगाव (मावळ) येथे १९५३ साली आंबेमोहर व चिमणसाल या स्थानिक भाताच्या जातींतून निवड पद्धतीने आंबेमोहोर १०२ व चिमणसाल ३२९ हे वाण विकसित करण्यात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर १९५४ साली कर्जत येथे जापनीज भात लागवड पद्धतीच्या प्रकल्पात सहभागी झाले. त्याची प्रात्यक्षिके घेऊन प्रसार करण्यातही भाग घेतला. भात संशोधन केंद्र, इगतपुरी येथे उशिरा येणारा कोळपी हा वाण निवडण्यात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर कराड व पालघर संशोधन केंद्रात अनु. ज्वारी व भात संशोधनास मदत केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी नाशिक व पुणे येथे शेतकी खात्याच्या प्रशासकीय विभागात काम केले. सन १९६५मध्ये शेतकी महाविद्यालयात प्रतिनियुक्तीवर जाऊन एम.एस्सी. (कृषी) ही पदवी आनुवंशिकशास्त्र व रोपपैदास या विषयात मिळवली. त्यांनी वाल या पिकातील आनुवंशिकता व पेरूच्या काही जातींमधील पुवंध्यत्वाचा अभ्यास केला. ज्यायोगे पेरूमध्ये बिनबियांची जात निर्माण करता येईल. त्यानंतर त्यांनी शेतकी खात्यात प्लॅनिंग व बी-बियाणे विभागामध्ये काम केले. १९६४पासून संकरित/उन्नत वाणांचे मोठ्या प्रमाणावर बीजनिर्मितीचे काम ज्वारी, बाजरी, मका, भात, कपाशी इ. पिकांत सार्वजनिक व खासगी क्षेत्रात सुरू झाले. यामुळे शेतकी खात्यामध्ये एक नवीन उत्पादक कार्यक्रम सुरू होऊन शेतकर्‍यांना नवीन व्यवसायही मिळाला.

       संकरित ज्वारी, बाजरी, मका व कापूस यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. शिवाय त्यांनी ते घेत असलेल्या इतर पिकांतही खते व पीक संरक्षणाचा कार्यक्रम राबवून उत्पादनात वाढ केली. त्यामुळे गावातील शेतमजूर व भूमिहीन लोकांचा रोजगार वाढण्यास मदत झाली. बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यासाठी पीकवार आनुवंशिक शुद्धता राखण्यासाठी काही मापदंडक होते व त्याप्रमाणे बीजोत्पादनाचे पिकाच्या निरनिराळ्या अवस्थांत तपासणी करणे, बी तयार झाल्यावर त्यातील शुद्धता तपासणे, उगवणशक्ती तपासणे इ.साठी काही भाग काढून घ्यावा लागत असे (बी-बियाणे कायद्यानुसार), तसे छोट्या क्षेत्रात ते लावून फुलोर्‍यापर्यंत वाढवून आनुवंशिक शुद्धतेची तपासणी करणे, हे एक फार मोठे व जबाबदारीचे काम होते. या नवीनच सुरू झालेल्या कामाची बैठक बसवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. या त्यांच्या कामामुळे महाराष्ट्र सीड सर्टिफिकेशन एजन्सीचे काम भारतात आदर्शवत झाले. वरील कामासाठीचे विशेष बीजतंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना १९७०-७१मध्ये एक वर्षासाठी मिसिसीपी स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका येथे प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. त्यांनी तेथे दीर्घ मुदतीच्या बीजसाठवणीच्या पद्धती, ज्यामध्ये उगवणशक्तीवर दुष्परिणाम होणार नाही, यावर संशोधन केले.

       १९८५मध्ये निवृत्त झाल्यावर निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत शेती विकासाचे काम त्यांनी सुरूच ठेवले.

- संपादित

गुप्ते, अनंत खंडेराव