Skip to main content
x

गुप्ते, राजेंद्र केशव

      राजेंद्र केशव गुप्ते यांचा जन्म मध्यप्रदेशातील कटणी येथे झाला. पुण्यातील आंबेगाव हे त्यांचे मूळ गाव. आंबेगावकर गुप्ते म्हणूनच ते सर्वांना परिचित आहेत. सरदार गायकवाडांनी त्यांच्या पणजोबांना वडोदरा (बडोदा) येथे नेले व सुमारे ६० एकर जमीन बक्षीस दिली. तेथे ते वरिष्ठ नागरी अधिकारी म्हणून काम पाहात. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या सहा पिढ्या वडोदऱ्यात वाढल्या. त्यांचे वडील इंपीरियल बँक ऑफ इंडिया येथे व्यवस्थापक  होते.

     त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे, वडोदरा व अमरावती येथे झाले. त्यानंतर पुणे येथील वाडिया महाविद्यालयात त्यांनी दोन वर्षे शास्त्रशाखेचे शिक्षण  घेतले. त्या काळी युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्स नव्यानेच सुरू झाला होता. तेथे त्यांनी प्रवेश घेतला. वडिलांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे एप्रिल १९४६ मध्ये त्यांनी सैनिकी प्रवेश परीक्षा दिली व ते उत्तम प्रकारे उत्तीर्णही झाले.

     डेहराडून येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रेडिओ अभियांत्रिकी’ या अडीच वर्षांच्या कोर्ससाठी त्यांची निवड झाली. या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने महू येथील सैनिकी महाविद्यालयात कनिष्ठ प्रशिक्षक म्हणून ते रुजू झाले. १९५० मध्ये कॅप्टन म्हणून त्यांना बढती मिळाली.  अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिलेल्या स्पर्धापरीक्षेतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर अमेरिकेतील चेल्पार्क येथील मार्कोनी कॉलेज ऑफ रेडिओ इंजिनिअरिंग येथून त्यांनी मार्च १९५३ ते जुलै १९५६ या काळात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. पुढे दिल्लीमध्ये मुख्यालयात ‘स्टाफ ऑफिसर इन चार्ज’ या पदावर त्यांना बढती मिळाली. सैन्यासाठी उपयोगात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक साधनांचा विकास साधण्याचे व त्यासाठीच्या दीर्घकालीन योजना आखण्याचे जबाबदारीचे काम त्यांनी या कालावधीत पार पाडले. त्यांनी आखलेला धोरणांचा हा आराखडा पुढे भारतीय प्रशासनाने जसाच्या तसा स्वीकारला. डॉ. होमी भाभा समितीनेही त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले.

     १९६२ च्या भारत-चीन युद्धात पूर्वेकडील सीमेवर त्यांनी सेकंड-इन-कमांड म्हणून काम पाहिले. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीतील मुख्यालयात त्यांना धोरण व सुसंवाद अधिकारी म्हणून बोलवण्यात आले. १९६५ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून, तर १९७४ मध्ये ब्रिगेडिअर म्हणून त्यांना बढती मिळाली. सैन्यात सिग्नल यंत्रणेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषत: १९६५ व १९७१ च्या युद्धांमध्ये आजसारखी संपर्क साधने  अस्तित्वात नसल्याने ही यंत्रणा म्हणजे संपूर्ण सैन्याचा कणा समजला जाई. याच काळात त्यांनी सिग्नल कोअरचे आधुनिकीकरण केले. पुढे १४,००० फूट उंचीवर असलेल्या ‘से ला’ खिंडीच्या परिसरात माउंटन ब्रिगेडच्या सिग्नल विभागात त्यांनी कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्य केले. ‘बोमदि ला’, ‘से ला’, तवांग, पेनकिन्सो अशा उंच शिखरांवरील संपर्कव्यवस्थेचा आराखडा ठरविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला. डिसेंबर १९७१ ते जानेवारी १९७२ या काळात त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीर येथे रणभूमीवर होती. या वेळी शत्रूकडून सुमारे एक लाख चौरस फूटांएवढा भूप्रदेश जिंकून घेण्यासाठी त्यांनी मोठा पराक्रम गाजविला.

      अशा प्रकारे युद्धकक्षातील अत्युच्च दर्जाची कामगिरी केल्याने पुणे येथील भूसेनेच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयात चीफ सिग्नल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. दळणवळण व्यवस्थेची धोरणे निश्चित करून त्यांची योग्य अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी येथे पार पाडले. याच प्रकारचे कार्य त्यांनी लखनऊ येथील मध्य विभाग मुख्यालय आणि उधमपूर येथील उत्तर विभाग मुख्यालय येथेही मोठ्या जबाबदारीने पार पाडले. वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त होताना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (१९८४) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण सेवाकालात आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा व अचूक निर्णयक्षमतेचा प्रत्यय त्यांनी वारंवार दिला.

     सेवानिवृत्तीनंतर लगेचच, म्हणजे फेब्रुवारी १९८४  मध्ये पुण्यातील फिनोलेक्स केबल्स लि. व फिनोलेक्स सॉफ्टवेअर सिस्टिम्सच्या संचालकपदावर त्यांची निवड झाली.  त्यांनी या पदावर १९९८ पर्यंत कार्य केले. त्यानंतर अशोक ऑरगॅनिक इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीत पूर्णकालीन संचालक म्हणून त्यांनी काम केले. मध्य गुजरातमधील वडोदरा, अंकलेश्वर व बोरीदरा येथे या संस्थेची मुख्यालये होती. इथाइल अल्कोहोल व संलग्न उत्पादने घेणाऱ्या या कंपनीला त्यांनी नाजूक स्थितीतून बाहेर काढले व भरघोस फायदा मिळविणारी कंपनी म्हणून नावारूपास आणले. अशोक अल्कोहोल्स लिमिटेड या कंपनीची वालचंदनगर व महाड येथे स्थापना करण्यातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

     त्यांच्या या सेवेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानेही उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला. सध्या त्यांचे पुणे येथे वास्तव्य आहे.

- ज्योती आफळे

गुप्ते, राजेंद्र केशव