Skip to main content
x

गुप्ते, रामचंद्र भालचंद्र

      प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्‍नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या ‘कोयना टेमर्स कमिटी’च्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.

     पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.

     १९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या ‘डेक्कन टॅप’ खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.

     भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.

     १९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण, समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत, वरसगाव, टेमघर, भाभा आसखेड, चासकमान इत्यादी धरणांवर, तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.

     नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.

    महाराष्ट्र सरकारच्या ‘कोयना ट्रेमर्स कमिटी’ व ‘एक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजी’चे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.

    महाराष्ट्र सरकारच्या ‘सिंचन व जल आयोगा’चे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.

    भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. ‘पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ‘ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजी’ व ‘एजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्स’ ही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.

    भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.

डॉ. बा. मो. करमरकर

गुप्ते, रामचंद्र भालचंद्र