Skip to main content
x

गुप्ते, रमेश शंकर

        मेश शंकर गुप्ते हे जबरदस्त आत्मविश्वास असलेले, अपार उत्साही आणि झपाटलेले, कधी कधी तर अतिक्रियाशील असे व्यक्तित्व होते. प्रचंड बौद्धिक ताकदीमुळे विषयासंंबंधी त्यांची ठाम मते असत. प्रचलित राजकीय व आर्थिक परिस्थितीची सूक्ष्म पारख, इंग्रजी भाषेवर दांडगे प्रभुत्व, उत्तम वक्तृत्व कौशल्यामुळे श्रेष्ठ वाक्पटुत्व कमावलेले गुप्ते हे श्रोतृ समुदायाला जागीच खिळवून ठेवीत असत.

रमेश शंकर गुप्ते यांचा जन्म बडोदा (वडोदरा) येथे झाला. एकूण आठ भावंडांमध्ये ते सर्वांत लहान असून सर्वांचे लाडके होते. त्यांचे शालेय शिक्षण बडोदे येथेच झाले. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईला स्थलांतर केले. हे स्थलांतर डॉ. गुप्ते यांच्याकरिता वरदान ठरले; कारण त्यांना उत्कृष्ट वातावरणात शिक्षण मिळाले. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण प्रसिद्ध रुइया महाविद्यालयात झाले आणि पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. येथील स्वातंत्र्य चळवळीशी युवक रमेश समरस झाले आणि पोषक बौद्धिक वाद-विवादांत सहभागी झाले. बुद्धिवाद आणि तर्कशास्त्र त्यांच्या भावी जीवनात लाभदायी झाले. वाद-विवादात भाग घेताना तार्किकता व भावात्मकता यांतील सूक्ष्म फरक त्यांच्या ध्यानात आला.

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर गुप्ते लगेच काम मिळण्यासाठी प्रयत्न करू लागले. अगोदरच्या त्यांच्या काही कामांचे अनुभव मजेशीर होते. पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी ही त्यांची पहिली नोकरी. प्रशिक्षण घेण्यासाठी ते नागपूरला रवाना झाले; परंतु पहाटेच्या वेळची कष्टदायक कामे, कवायती, व्यायाम त्यांना फार त्रासदायक वाटे. या जाचातून सटकण्याचे ठरवून त्यांनी पलायन केले. बडोद्याच्या क्षेत्रात नडियाद येथे त्यांना डाकूंशी सामना करावा लागला. तिथल्या महाविद्यालयात ते व्याख्याता म्हणून कार्यरत होते; पण डाकूंचे रात्रीचे हल्ले भयभीत करीत, त्यामुळे गुप्ते शेवटी औरंगाबादला पोहोचले.

औरंगाबादच्या वास्तव्यात एका मागोमाग एक यशाची पायरी चढताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. ते मिलिंद कला आणि विज्ञान महाविद्यालयात व्याख्याते म्हणून प्रारंभी रुजू झाले आणि नंतर ते देवगिरी महाविद्यालयात गेले. या दोन्ही महाविद्यालयांत मिळून त्यांनी चौदा वर्षे काढली. देवगिरी महाविद्यालयात व्याख्याते म्हणून कार्यरत असताना त्यांनी एलोरा येथील लेण्यांतील मूर्तिशिल्प विषयात डॉक्टरेट पूर्ण केली आणि १९६२ मध्ये त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच वर्षी मुंबई येथील तारापोरवाला या विख्यात प्रकाशकांनी अजंठा, एलोरा आणि औरंगाबाद लेणीहे त्यांचे पुस्तक प्रकाशित केले आणि १९६५ मध्ये याच प्रकाशकांनी डॉ. गुप्ते यांचा प्रबंध पुस्तकरूपाने प्रकाशित केला. महाविद्यालयामधील त्यांच्या आरंभीच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्रभारतीय राज्यघटनाया नावाची दोन पाठ्यपुस्तकेही प्रकाशित केली होती.

यानंतर नव्यानेच स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठात १९५९ मध्ये डॉ. गुप्ते यांची निवड इतिहास विभाग प्रमुख म्हणून झाल्याने त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याच्या योगदानाला फळ मिळाले. त्यांनी आपल्या विद्यापीठीय नोकरीत वेगाने प्रगती केली; कारण १९६६ मध्ये अमेरिकेने नॉर्थ कॅरोलिना राज्यातील विन्स्टन सालेम युनिव्हर्सिटीत अभ्यागत प्राध्यापक या नात्याने डॉ. रमेश गुप्ते यांना आमंत्रित केले. ते विन्स्टन सालेम युनिव्हर्सिटीत एक वर्ष व नंतर बून युनिव्हर्सिटीत एक वर्ष होते. त्यांनी भारतीय कला, वास्तुशिल्प, संस्कृती हे विषय शिकवले आणि नंतर ते साम्यवादी चीन आणि दक्षिण-पूर्व आशियाकडे वळले. या दोन वर्षांत त्यांनी अमेरिकेच्या अनेक संस्थानांचा दौरा करून विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतून व्याख्याने दिली. यांत मिशिगन व वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचाही समावेश होता आणि तेथील डॉ. रमेश गुप्ते यांच्या व्याख्यानांचे खूप कौतुकही झाले.

अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्यावर चीनचा बराच प्रभाव पडला आणि त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील आपले लक्ष  त्यांनी चीनसंबंधी पुस्तकांचे लेखन करण्याकडे वळविले. त्यांनी चीनवर पुस्तके प्रकाशित केली. यांत चीनमधील राष्ट्रवाद आणि साम्यवाद, अर्वाचीन चीनचा आणि दक्षिण-पूर्व आशियाचा इतिहास ही १९७२-७३ मधील पुस्तके होत. १९७२ मध्येच त्यांचे हिंदू, बौद्ध आणि जैन लेणीया नावाचे पुस्तकसुद्धा प्रसिद्ध झाले. मुळातच संशोधक असलेल्या डॉ. गुप्ते यांनी आयुष्यभर संशोधनपर लेख लिहिले, जे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले. त्यांचे संशोधनपर लेख, विदेशी घडामोडींचे अहवाल (फॉरेन अफेअर्स रिपोर्ट) राजनीतिशास्त्राचा इतिहास आणि साम्यवादी चीन, भारतीय दैनिकांतून, भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूटच्या वार्षिकांमधून प्रसिद्ध झाले.

गुप्ते यांनी स्वत:ला शिक्षण व संशोधनापुरतेच मर्यादित न ठेवता उत्खननाकडेही लक्ष वळविले. नागपूर व मराठवाडा विद्यापीठांनी १९६७ मध्ये संयुक्तरीत्या पुरातन स्थळ भोकरदन’ (भोगवर्दन) या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खनन केले. या जागेतून अनेक पुरातत्त्वीय संग्रह्य वस्तू हातास लागल्या.

भोकरदन उत्खननापूर्वीसुद्धा गुप्ते प्राचीन स्थळांच्या आजूबाजूला फिरत असताना अनेकदा जुनी मंदिरे, त्यांच्या स्तंभांचे अवशेष, मूर्तिकला, मध्यकालीन वाडे, की ज्यांमध्ये गहन व दुर्लभ असे नक्षीकाम त्यांच्या  नजरेस पडले. या अनाथ, स्वामीहीन संग्रह्य वस्तूंमुळे त्यांना एका ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची कल्पना सुचली. हे करणे जरी तत्काळ शक्य झाले नाही, तरी त्यांनी विभागीय वर्गखोल्यांचे रूपांतर इतिहास वस्तुसंग्रहालयात केले. हे करण्यापूर्वी त्यांनी या गैरमालकीच्या संग्रह्य वस्तू गोळा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारची परवानगी घेतली होती. थोड्याच अवधीत डॉ. गुप्ते यांनी मंदिरांचे अवशेष, सोने, रुपे, तांबे यांची नाणी, सचित्र हस्तलिखिते, मोडी लिपीतले दस्तावेज, मराठेशाहीतली अनन्य अशी रंगीत चित्रे अशी मूल्यवान संपदा संग्रहित केली. अनेक व्यक्तींनी त्यांच्याकडील संग्रह नाममात्र किमतीला त्यांना विकत दिले.

गुप्ते यांनी वस्तुसंग्रहालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठीपण प्रस्ताव सादर केला होता. सांस्कृतिक आणि कला, इतिहासविषयक भारतीय राष्ट्रीय ट्रस्ट, दिल्ली यांच्या अध्यक्षांनी दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या नमुन्याप्रमाणे वस्तुसंग्रहालयाच्या भवनासाठी नकाशा बनवण्यात गुप्ते यांना मदत केली होती.

त्याच वर्षी गुप्ते यांनी पर्यटन विषयात पदविका अभ्यासक्रम सुरू केला, जो त्या काळाचा विचार करता खूपच पुरोगामी होता. हा अभ्यासक्रम नोकरीदेय असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बहुसंख्य विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या पर्यटन विभागात आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळात सरकारी नोकर्या मिळाल्या.

पुढे गुप्ते यांना विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक म्हणून  नियुक्त केले गेले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रीय नर्तक पथकाला आमंत्रित एका उत्सवाचे आयोजन केले. नर्तकांनी पौराणिक नृत्य, नाटक सादर केले व मराठवाड्यातील रसिकांना  खिळवून ठेवले. प्रस्तुत आयोजनाने या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना एका परमसुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाची ओळख करून दिली.

मध्यंतरी डॉ. गुप्ते यांनी आपले शैक्षणिक कार्य चालूच ठेवले. ते युनिव्हर्सिटीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि उस्मानिया, मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसारख्या नामांकित विश्वविद्यालयांच्या अभ्यास मंडळांचे सदस्यदेखील होते.

वयाच्या केवळ एकावन्नाव्या वर्षी एका भीषण अपघातात डॉ. गुप्ते यांचे निधन झाले. जागतिक दर्जाच्या वस्तुसंग्रहालयाचे त्यांचे स्वप्न त्यांच्या हयातीत साकार होऊ शकले नाही; परंतु १९८२ मध्ये शेवटी काही अंशी ते पूर्ण झाले.

वि.. जोशी

गुप्ते, रमेश शंकर