Skip to main content
x

घोरपडे, वासंती विनायक

वासंती

     राठी बोलपटातली पहिली बालनटी, पहिली बालगायिका असल्याचा मान अभिनेत्री वासंती अर्थात, वासंती विनायक घोरपडे यांच्याकडे जातो. गोरापान रंग, तरतरीत नाक, चुणचुणीतपणा, मोहक चेहरा, जोडीला असलेली बुद्धिमत्ता, लक्षणीय गायकी, समरसून उत्कट अभिनय करण्याची समज अशा अनेक गुणांमुळे वासंती या अतिशय लोकप्रिय बालकलाकार ठरल्या. वासंती यांना भारताची ‘शर्ले टेंपल’ म्हटले जात असे.

     वासंती यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विनायकराव घारेपडे सरदार घराण्यातले. ते व्यवसायाने वकील होते, पण त्यांचा चित्रपट क्षेत्राशीही संबंध होता. महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते बाबूराव पेंटर यांच्याबरोबर कामही करत असत. चित्रपट निर्मितीक्षेत्राशी संबंधित असलेल्या तानीबाई कागलकर या वासंती यांच्या मावशी. ‘प्रभात’चे केशवराव धायबर हे वासंतीच्या आत्याचे यजमान. वासंती यांचे कुटुंबीय शांतारामबापूंच्या घरासमोरच राहत होते. शांतारामबापूंनी छोट्या वासंती यांना तिथे खेळताना अनेकदा पाहिले होते. बापूंनी असेच एकदा त्यांना “चित्रपटात काम करशील का?” असे विचारले. त्यांनी हो म्हटले आणि वासंती यांचा बालगायिका-बालअभिनेत्री असा प्रवास सुरू झाला. हा चित्रपट होता ‘धर्मात्मा’ आणि साल होते १९३५.

     व्ही. शांताराम यांनी ‘धर्मात्मा’साठी वासंती यांची निवड केली, तेव्हा त्या १० वर्षांच्या होत्या. ही भूमिका ‘जाई’ नावाच्या एका अस्पृश्य मुलीची होती. मुळात या चित्रपटात ‘जाई’चे काम अगदी थोडे होते, पण वासंती यांचे अभिनयकौशल्य बघून भूमिका काम वाढवण्यात आली. ‘धर्मात्मा’नंतर १९३७ मध्ये ‘कुंकू’ या सामाजिक प्रश्‍न हाताळणाऱ्या, अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या चिपटात काम करण्याची संधीही वासंती यांना मिळाली होती. ‘गोहर पारितोषिक’ प्राप्त करणारा १९३७ सालातला हा सर्वोत्तम चित्रपट होता.‘धर्मात्मा’, ‘कुंकू’ हे दोनही चित्रपट मराठी चित्रसृष्टीतले अतिशय महत्त्वाचे चित्रपट. या चित्रपटांची आशय-मांडणी, मुख्य कलाकार याचबरोबर बालकलाकार वासंतीही तितकीच महत्त्वपूर्ण दाद मिळवून गेल्या. ‘धर्मात्मा’मधला संत एकनाथांचा मुलगा हरिपंडित कानफटात देतो तेव्हा हमसून रडणारी न् रडतारडता हसणारी... भूमिकेच्या दोन टोकाचा सूर नेमका पकडणारी ‘जाई’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे...’ म्हणत ‘कुंकू’मध्ये नाचणारी परकरी मुलगी रसिकांमध्ये कौतुकाची, चर्चेची ठरली.

     वासंती यांना बालकलाकार म्हणून जसे प्रेक्षकांचे प्रेम लाभले, तसेच बालगायिका म्हणूनही त्या लोकप्रिय ठरल्या. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे’, ‘आहा भारत विराजे’ ही ‘कुंकू’मधली गाणी फारच लोकप्रिय झाली. गाण्यात मिळालेल्या या लोकप्रियतेनंतर त्यांनी खाँसाहेब धम्मनखाँ आणि पंडित वामनराव सडोलीकर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. वासंती यांच्या गाण्यामध्ये ताकद आहे, त्यांनी गाण्यासाठी जगप्रवास करावा, असे त्यांचे गुरू खाँसाहेब धम्मनखाँ यांना परोपरीने वाटे.

     वासंती यांनी गायलेले ‘माझ्या मामाच्या घरी मामीचे बघ राज्य रे’ हे गाणे, ‘बेटी’ चित्रपटातले ‘तारे चमके पंछी’ हे गाणे, ‘मुसाफिर’मधले ‘ओ बिसरी कहानी’, ‘दिवाली’मधले ‘काहे पंछी’ ही गीते, तसेच ‘रंगात रंगलं, छंदामध्ये दंगलं, गुंगून मन हे आनंदलं’ हे एकलगीतही कमालीचे गाजले.

     ‘प्रभात’ कंपनीबरोबर काम केल्यानंतर वासंती यांनी रणजित फिल्म कंपनीच्या ‘संत तुलसीदास’मध्ये काम केले.‘धर्मात्मा’, ‘कुंकू’, ‘संत तुलसीदास’ या मराठी चित्रपटांनंतर मात्र त्या हिंदी चित्रपटांमध्येच दिसल्या.‘अमरज्योती’, ‘अछूत’, ‘दिवाली’, ‘मुसाफिर’, ‘बेटी’, ‘दुःखसुख’, ‘आपकी मर्जी’, ‘भक्तराज’, ‘भाग्यलक्ष्मी’ हे त्यांचे हिंदी चित्रपट. पैकी ‘अमरज्योती’ हा चित्रपट गाजला. जयंत देसाई यांचा ‘भक्तराज’ हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट. या वेळी त्या तरुण नायिका म्हणून त्या पडद्यावर आल्या. यानंतर गुजरातचे चित्रपट दिग्दर्शक इंदूभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी चित्रपटात काम करणे थांबवले. अपवाद फक्त ‘भाग्यलक्ष्मी’ चित्रपटाचा. वासंती यांनी ‘शारदा’ या नाटकातही काम केले होते. स्वतः बालगंधर्वांनी या नाटकासाठी त्यांची रंगभूषा केली. रुपाचा गोडवा, अभिनयाचा आणि गायकीचाही वरदहस्त लाभलेल्या वासंती यांचा शाळेतही एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक होता. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. गणित हा त्यांचा आवडीचा विषय. मात्र चित्रपटांकडे वळल्यामुळे त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. केशरचना करणे ही वासंती यांची अगदी लहानपणापासूनच खासियत होती. ‘सिकंदर’मध्ये वनमालाबाईंची केशरचना वासंती यांनीच केलेली आहे.

     केवळ बालकलाकार म्हणून अभिनय करून १२ ते १५ इतके मोजके चित्रपट करूनही रसिकांच्या मनात स्वतःचे स्वतंत्र स्थान मिळवणाऱ्या वासंती यांना चंद्रलाल, सर्वोत्तम बदामी, व्ही शांताराम असे उत्तम दिग्दर्शक लाभले. नटश्रेष्ठ बालगंधर्व, विष्णुपंत पागनीस, लीला चिटणीस, राम मराठे, शांता आपटे, दुर्गा खोटे आदी मराठी, तर  मोतीलाल, खुर्शिद या हिंदीतील अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधीही मिळाली. चित्रपट क्षेत्राचा निरोप घेतल्यावर त्या आपले पती इंदुभाई पटेल व मीना, अजित, नितीन आणि अमर या चार मुलांसह संसारात रमल्या.

- स्वाती प्रभुमिराशी

संदर्भ
१) इसाक मुजावर, 'गाथा मराठी सिनेमाची', प्रतीक प्रकाशन, पुणे; २०१२.
२) रंजना पंडित, 'दरवळ', प्रतीक प्रकाशन, पुणे; जानेवारी २०१३.
घोरपडे, वासंती विनायक