Skip to main content
x

हिर्लेकर, श्रीकृष्ण हरी

         गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकरांचे प्रथम शिष्य श्रीकृष्ण हरी हिर्लेकर यांचा जन्म गगनबावडा संस्थानात झाला. त्यांचा आवाज गोड होता आणि बालपणीच त्यांना भजने गाण्याची आवड निर्माण झाली. गगनबावडा संस्थानाचे अधिपती माधवराव मोरेश्वरराव हे उत्तम सतारवादक होते. तत्कालीन प्रसिद्ध कलाकार उ. अल्लादिया खाँ, उमराव खाँ, रहमत खाँ वगैरे या संस्थानात येऊन गाणे सादर करीत असत. बालवयात हे गाण्याचे कार्यक्रम ऐकून त्यांची अभिरुची संपन्न झाली.

त्यांचे वडील गगनबावडा संस्थानात राजोपाध्ये होते व वडिलांकडूनच त्यांना पारंपरिक वेदविद्या, हिशेबाचे व्यवहार यांचे शिक्षण मिळाले. मराठी सहावीपर्यंत शालेय शिक्षण झाल्यावर त्यांना संस्कृत शिक्षणासाठी बडोद्यास पाठवले गेले. तेथे बीनकार अली हुसेन यांच्याकडून हिर्लेकरांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले.

त्यांचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून संस्थानिकांनी त्यांना मिरजेला पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शिकण्यासाठी पाठविले. तिथे शिकायला येणार्या पं. विष्णू दिगंबरांशी त्यांचा परिचय झाला आणि श्रीकृष्ण त्यांनाही गुरुस्थानी मानू लागले. पं. विष्णू दिगंबर १८९६ साली मिरज सोडून गेले तेव्हा श्रीकृष्णदेखील त्यांच्याबरोबर गेले आणि विष्णूबुवांचे जिथे कार्यक्रम असतील, तिथे तेही गाऊ लागले.

महाराष्ट्र, गुजरात, काठेवाड प्रांती गायनार्थ भ्रमण करत ते ब्रजभूमीत, मथुरेला पोहोचले. तिथून दिल्लीला जाऊन पुढे पंजाबात गेले. या दरम्यान पं. पलुसकरांच्या सहवासात राहून शास्त्राचे अध्ययन, त्याचबरोबर स्वरलिपीची माहितीही त्यांनी घेतली. पं. विष्णू दिगंबरांनी संगीतबद्ध केलेल्या ॠग्वेदातील ॠचांचे गायन ऐकून प्रभावित झालेल्या डॉ. ॅनी बेझंट यांनी काश्मीरच्या महाराजांना त्याविषयी सांगितले. तेव्हा काश्मीरच्या महाराजांनी पलुसकरांना एका शिष्याला संगीत शिकवण्यासाठी पाठविण्याविषयी सांगितले. पं. पलुसकरांनी १९०३ साली पं. हिर्लेकरांना काश्मीरला पाठविले. तीन वर्षे तिथे संगीताचे शिक्षण देऊन पुढे त्यांनी १९०६ साली बनारसला संगीताचे अध्यापक झाले आणि फार उत्तम प्रकारे कार्य करून त्यांनी बरेच विद्यार्थी घडवले.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी वानप्रस्थाश्रमी गृहस्थाची जीवनचर्या अंगीकारली आणि भगवद्भक्तीत काळ व्यतीत केला. त्यांचे वाराणसी येथे निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

संदर्भ :
१. देवधर, बी.आर.; ‘थोर संगीतकारांची परंपरा’;पॉप्युलर प्रकाशन; मुंबई, २००७.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].