Skip to main content
x

हराळकर, नामदेवतात्या शिवराम

स्पृश्य समाजाच्या उद्धाराचा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य करणारे संत नामदेवतात्या हराळकर यांचा जन्म तुगाव येथे कार्तिक महिन्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवराम व आईचे नाव गीताबाई होते. नामदेवतात्यांना एक बहीण व सहा भाऊ होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी परंपरेनेच चालत आली होती. अगदी बालवयापासून नामदेवतात्यांनी वडिलांचे बोट धरून, त्यांच्या खांद्यावर बसून पंढरीची वारी केली आणि विठ्ठलभक्तीचे व्रत अंगीकारले.

त्यांचे लौकिक शिक्षण फार झाले नाही; पण त्यांची दृष्टी, त्यांची वृत्ती, त्यांची धारणा अत्यंत व्यापक व माणुसकीची होती. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव होता. लहानपणीच पंढरीच्या वारीबरोबरच त्यांना शेतीची आवड प्राप्त झालेली होती. सतराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे मन विठ्ठलभक्तीत रमलेले होते. आठ-दहा वर्षे संसार करून नामदेवतात्या पूर्णपणे विरक्त झाले.

संसाराच्या आसक्तीचा त्यांना कधीही अडसर झाला नाही. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झाली. एका मुलाचे अकाली निधन झाले व तात्यांना संसाराच्या क्षणभंगुरतेची प्रचिती आली व त्यांचे मन नामभक्तीच्या शाश्वत सुखाकडे अधिक वेगाने आकर्षित झाले.

ज्ञानेश्वरी हा त्यांचा आवडीचा व विश्रांतीचा विषय होता. वेळ मिळेल तेव्हा ते ज्ञानेश्वरी वाचण्यात मग्न होत. थोर संत व ज्ञानेश्वरीचे गाढे अधिकारी विष्णुपंत जोग यांचे नामदेवतात्यांना मार्गदर्शन लाभले होते.

‘ग्रामगीता’कार संत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचाही नामदेवतात्यांवर व त्यांच्या एकूण सामाजिक कार्यावर ठसा होता. टिळकांमुळे राष्ट्रसेवेच्या, महात्मा गांधींमुळे हरिजन उद्धाराच्या, तर संत तुकडोजी महाराजांकडून ग्राम सुधारणेच्या कार्याची प्रेरणा नामदेवतात्यांनी घेतली. ‘तुगाव’मध्ये तात्यांनी ज्या सामाजिक सुधारणा केल्या, त्यांमुळे लोक त्यांना ‘कर्मयोगी’ म्हणत. त्यांनी महिलांची पडदा पद्धत बंद केली, स्त्री-पुरुषांसाठी गावात स्वतंत्र शौचालये बांधली, मुलींना पोहण्यास शिकवले, तरुणांमध्ये व्यायामाची आवड रुजवली. शेतीत आधुनिक पद्धती अवलंबल्या. भूदान चळवळीत भाग घेऊन २२ एकर जमीन प्राप्त केली व हरिजन कुटुंबांना वाटून टाकली.

गाव तंटामुक्त करण्याचे पहिले कार्य तात्यांनी तुगावमध्ये केले. भेदाभेद दूर करून सर्व समाज एक केला. रोज रात्री सर्व समाजातील लोकांना त्यांनी भजनाद्वारे माणुसकीचे, प्रेमाचे, गुण्यागोविंदाने नांदण्याचे धडे दिले. फाळणीनंतर १९४७ साली बंडखोर रझाकारांच्या हल्ल्यामुळे हराळकर परिवारासह अनेकांना आपली गावे सोडून पलायन करावे लागले. हराळकर कुटुंबाला तुगाव सोडून सोलापूर येथे आश्रय घ्यावा लागला. अस्पृश्य समाजातील महार व मांग समाजांत तात्यांनी फार मोठी जागृती केली. ते रोज महारवाड्यात-मांगवाड्यात जात. ‘भीक मागू नका, कोणाचे उष्टे खाऊ नका, बकऱ्या -कोंबड्यांचे बळी देऊ नका, शिका व स्वच्छ राहा, मांसाहार-दारू यांपासून दूर राहा’ अशी शिकवण तात्या लोकांना अत्यंत प्रेमाने देत असत. तात्यांनी १९३८ साली गावातील मंदिर हरिजनांना खुले करून दिले, तेही कोणताही तंटाबखेडा-संघर्ष न करता, केवळ सामोपचाराने. ही एक त्या काळातील अभूतपूर्व घटना होती. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर १९५२ साली हरिजनांसाठी खुले झाले ही गोष्ट लक्षात घेतली, की तात्यांनी १९३८ साली घडविलेल्या घटनेचे नेमके महत्त्व कळते. तात्यांचे हे कार्य ऐकून खुद्द संत गाडगे महाराज तुगावला तात्यांना भेटण्यास आले होते.

१९६७ साली, चैत्र वद्य सप्तमी रोजी वयाच्या चौर्‍याऐंशीव्या वर्षी नामदेवतात्यांनी आपला देह विठ्ठलाचरणी अर्पण केला. त्यांचे सुपुत्र विश्वंभर यांनी पुढे तात्यांच्या कार्याची धुरा सांभाळली. त्यांनी तात्यांसारखेच पारमार्थिक व सामाजिक कार्य केले.

विद्याधर ताठे

हराळकर, नामदेवतात्या शिवराम