Skip to main content
x

इचलकरंजीकर,बाळकृष्ण रामचंद्र

बाळकृष्णबुवा रामचंद्र इचलकरंजीकरांचा जन्म त्यांच्या आजोळी, बेडग येथे झाला. त्यांचे वडील रामचंद्रबुवा चंदूरकर हे कोल्हापूर जवळील चंदूर येथील प्रसिद्ध गवई होते. रामचंद्रबुवांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता. काही परिस्थितीमुळे हे कुटुंब मिरजला स्थलांतरित झाले. गायकीचे प्राथमिक शिक्षण त्यांना वडिलांकडून प्राप्त झाले तरी आईचा मात्र याला विरोध होता व त्याने भिक्षुकी व्यवसायाकडे लक्ष द्यावे असे तिला वाटत असे.
बाळकृष्ण पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी बाळकृष्णांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे काका-काकूंनी त्यांचा संभाळ केला. चुलत्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीने व्यथित होऊन ते घरातून बाहेर पडले.
बाळकृष्णांची गायन शिकण्याची मनापासून इच्छा असल्याने त्या दृष्टीने ते प्रयत्न करू लागले. म्हैसाळ या गावी विष्णूबुवा जोगळेकर या गायक व कीर्तनकारांच्या घरी त्यांना आश्रय मिळाला. त्यांनी बाळकृष्णांना पदे व भजने शिकविली. नंतर जत संस्थानात ते आलिदात खाँ यांच्याकडे गायन शिकले. तिथून कोल्हापूरला ते भाऊराव कागवडकर यांच्याकडून गायकी शिकले. परंतु सतत स्थलांतर केल्याने त्यांच्या गायनाध्ययनात बाधा येऊ लागली. त्यांनी काही काळ अमरचंद वाडीकर नाटक मंडळीतही काम केले.
पुढे एक संतपुरुष माणिक प्रभू यांच्या सल्ल्यानुसार ते उत्तरेला धार येथे गेले. त्यांनी तिथले प्रसिद्ध गायक देवजीबुवा परांजपे धारकर यांचे शिष्यत्व पत्करले. देवजीबुवांनी धृपद, धमार-टप्पा गायन शिकवले. परंतु तिथेसुद्धा गुरुपत्नीच्या कडक स्वभावामुळे धारकर यांचे घर सोडून त्यांना काशीला जावे लागले.
काशीला विजयनगरच्या महाराजांनी त्यांना आश्रय दिला. इथेही त्यांच्या गायन शिक्षणात खंड पडल्याने ते निराश झाले. काही काळ त्यांनी देवीची आराधना करण्यात घालवला. ग्वाल्हेरचे वासुदेवबुवा जोशी यांच्याकडे बाळकृष्णांची तालीम सुरू झाली. येथील शिक्षणानंतर मात्र बाळकृष्णबुवा गायक म्हणून नावारूपास आले. वासुदेवबुवांची तब्येत बिघडली असता त्यांनी त्यांची सेवा केली. मनापासून शुश्रूषा केल्याने गुरूंनी त्यांना, ‘‘तुझी मैफल कधीही बेरंग होणार नाही व तुझा शिष्यसुद्धा विजयपताका फडकवेल,’’ असा आशीर्वाद दिला. पुढे वासुदेवबुवांच्या निधनानंतर बाळकृष्णबुवा महाराष्ट्रात मिरजेला स्थायिक झाले. स्वतःला पडलेले कष्ट इतर शिष्यांना होऊ नयेत म्हणून त्यांनी मुंबईला १८८५ साली गायन विद्यालय स्थापन केले. अनेक विद्यार्थ्यांना त्यात त्यांनी गायन शिक्षण दिले व त्याचबरोबर ‘संगीत दर्पण’ नावाचे मासिक चालवले, जे पुढे पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले. 

अनेक बैठकी गाजवीत व गायनाचा प्रचार करीत बाळकृष्णबुवा मुंबईहून पुणे व पुण्याहून सातारा संस्थान व नंतर औंधला आले. औंधच्या राजेसाहेबांनी त्यांचे गायन ऐकले व त्यांना राजाश्रय दिला. पुढे १८८७ साली ते मिरजेला स्थायिक झाले. हद्दू-हस्सू खाँच्या वेळची अस्सल ग्वाल्हेर गायकी जी त्यांना वासुदेवबुवांकडून प्राप्त झाली होती, ती त्यांच्या गळ्यात होती. ही गायकी अस्ताई (स्थायी), अंतऱ्यासाठी प्रसिद्ध होती. शिवाय बडे महंमद खाँकडूनही त्यांना विद्या मिळाली होती. त्यांच्याजवळ अनेक चिजांचा भरणा होता.
घराण्याच्या शिस्तीप्रमाणे गायला बसल्यावर प्रत्येक चिजेची अस्ताई दोनदा व एकदा अंतरा भरल्यावरच ते गायनाला आरंभ करीत. मध्य षड्जापासून ते सप्तकाच्या मध्यम पंचमापर्यंत एकेक स्वर घेऊन बढत करून बुवा अंतऱ्यावर जात. अंतऱ्याचे आलाप करून पुन्हा स्थायीवर येऊन मग बोलबाट आणि शेवटी ताना हा गायकीचा क्रम असे. डाव्या हाताने स्वतः डग्गा धरून व उजव्या हाताने तंबोरा वाजवून ते कैक तास मेहनत करीत. त्यांची गायकी साधी आणि निर्मळ होती व त्यांच्या ख्यालाची लय ग्वाल्हेर पद्धतीप्रमाणे थोडी जलद असे.
बाळकृष्णबुवांच्या पूर्वीही महाराष्ट्रात रागदारी संगीत होते. मात्र बाळकृष्णबुवांनी या संगीताचा प्रसार आपल्या शिष्यवर्गाद्वारे विस्तृतपणे केला. म्हणून बाळकृष्णबुवांना ग्वाल्हेर घराण्याची ख्यालगायकी महाराष्ट्रात रुजवण्याचे श्रेय दिले जाते. त्यांची विशाल शिष्यशाखा अशी : गुंडूबुवा इंगळे, विष्णू दिगंबर पलुसकर, अनंत मनोहर जोशी, यशवंतबुवा मिराशी, वामन चाफेकर, नीळकंठ जंगम, भाटेबुवा, काळेबुवा, म्हैसकरबुवा, पाध्येबुवा इ. त्यांच्या सांगीतिक कार्यामुळे ‘संगीताचार्य’, ‘ख्यालगायकीचे भीष्माचार्य’ अशा शब्दांत त्यांना गौरविले गेले. महाराष्ट्राबाहेर लाहोर, अंबाला ते कलकत्ता आणि नेपाळ ते म्हैसूर असे भारत भ्रमण करून त्यांनी मैफली गाजवल्या. तत्कालीन थोर संगीतशास्त्री सौरिंद्रमोेहन टागोर यांनी कलकत्ता येथे बुवांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
गायनामध्ये सातत्य, चिकाटी हे गुण शिष्यांमध्ये यावेत म्हणून ते सतत प्रयत्नशील असत. याचा एक अनुभव असा, की एकदा मिरजेला प्लेगची साथ पसरली असता लोक घरे सोडून जात, त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यावर बाळकृष्णबुवांनी एक उत्कृष्ट तोडगा काढून रोज रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत सर्व शिष्यांना तालीम द्यायला सुरुवात केली. रात्रभर तालीम होत असल्याने गावात जाग असे व त्यामुळे चोरीला आळा बसला, सोबतच आजांऱ्याकडे लक्षही दिले जात असे. त्यांच्या शिष्यांना अनेक राग पाठ झाले. अनेक चिजा त्यांच्या पदरी पडल्या. 

१८९८ साली पत्नीच्या निधनानंतर बाळकृष्णबुवांच्या तरुण पुत्राचे अण्णाबुवांचेसुद्धा १९२४ मध्ये निधन झाले, त्यामुळे बाळकृष्णबुवा दुःखी झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना दम्याचा असह्य त्रास झाला. त्यामुळेच बाळकृष्णबुवांचे इचलकरंजी येथे निधन झाले. 

          डॉ. सुधा पटवर्धन

 

इचलकरंजीकर,बाळकृष्ण रामचंद्र