Skip to main content
x

इलाटूवलापिल, श्रीधरन

इ. श्रीधरन

        डॉ.इ.श्रीधरन यांचा जन्म केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील करुकापुथुर येथे झाला. श्रीधरन आणि भारत सरकारचे माजी प्रमुख निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन हे शाळेत एकत्रच शिकले. शालेय शिक्षणानंतर श्रीधरन यांनी पालघाटच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि नंतर काकिनाडा येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. कोझिकोड येथील तंत्रनिकेतनात अल्पकाळ स्थापत्य अभियांत्रिकी विषय शिकवल्यावर ते वर्षभर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होते. त्यानंतर त्यांनी भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी सेवेत प्रवेश केला. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली होती. या निवडीनंतर डिसेंबर १९५४ साली दक्षिण रेल्वेत त्यांची नोकरी सुरू झाली.

     तामीळनाडूतील रामेश्वरमला जाणारा पम्बनचा रेल्वे पूल १९६३ साली आलेल्या महापुराने वाहून गेला होता. हा पूल सहा महिन्यांत दुरुस्त करून चालू करायचा होता. पण श्रीधरनच्या वरिष्ठांनी हा पूल तीन महिन्यांत दुरुस्त करून द्यायचे ठरविले. या कामावर श्रीधरन यांची नेमणूक झाली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून हा पूल ४६ दिवसांत सुरू केला. या कामगिरीसाठी त्यांना रेल्वेमंत्र्यांचा खास पुरस्कार मिळाला. १९७० साली श्रीधरन मुख्य अभियंता असताना त्यांना कोलकाता मेट्रो रेल्वेचा आराखडा, नियोजन आणि उभारणीचे काम देण्यात आले. भारतातील ही पहिली मेट्रो रेल्वे आहे. त्यानंतर त्यांना कोचीन शिपयार्डाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून नेमले गेले. त्या वेळी राणी पद्मिनी हे पहिले जहाज तेथे बांधले गेले. १९९० साली भारतीय रेल्वेतून श्रीधरन निवृत्त झाले, तेव्हा ते रेल्वे मंडळावर अभियांत्रिकेचे सभासद होते.

     निवृत्तीनंतर लगेच कोकण रेल्वेत अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पदावर त्यांची नेमणूक झाली. या काळात त्यांनी सात वर्षांत कोकण रेल्वेची पूर्ण उभारणी करून देऊन आगगाडी सुरू करून दिली. हा प्रकल्प अनेक अर्थी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर, राष्ट्रीय स्तरावर झालेला हा पहिला प्रकल्प आहे. भारतीय रेल्वेत असणाऱ्या मनुष्यबळपद्धतीपेक्षा येथे वेगळ्या पद्धतीची रचना केली होती; कारण १९५४ ते १९९० अशी छत्तीस वर्षे रेल्वेत काम केल्यामुळे त्या यंत्रणेचे फायदे-तोटे श्रीधरन यांना अवगत होते. या प्रकल्पात बासष्ट किलोमीटर लांबीत त्र्याण्णव बोगदे आहेत. हे बोगदे पहाड खोदून झालेले नसून भुसभुशीत मातीच्या डोंगरातून काढलेले आहेत. ७६० कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गावर १५० पूल आहेत. आशियातील सर्वाधिक उंच रेल्वे पूल (रत्नागिरी जिल्हा), आशियातील सर्वाधिक लांबीचा बोगदा (रत्नागिरी जिल्हा) आणि आशियातील नदीवरील सर्वाधिक लांबीचा पूल (कारवार जवळ शरावती नदीवर, द. कन्नड जिल्हा) असे शिरपेच कोंकण रेल्वेला लाभले आहेत. हा प्रकल्प मंजूर झालेल्या रकमेपेक्षा कमी रकमेत आणि कमी वेळात झाल्याने या प्रकल्पाची प्रशंसा जागतिक स्तरावर झाली.

     त्यानंतर १९९७ साली दिल्ली मेट्रो प्रकल्पावर त्यांची नेमणूक झाली आणि या रेल्वेच्या नियोजित आराखड्यातील सर्व कामे २००५ सालाच्या मध्यावर पुरी झाली. तसेच, अंदाजित खर्चापेक्षा कमी रकमेत पुरा झालेला हा दुसरा प्रकल्प. या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीमुळे ते श्रीधरनऐवजी ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. फ्रांस सरकारने या कामाबद्दल त्यांना ‘नाइट ऑफ द लेजिऑन ऑफ ऑनर’ हा सन्मान समर्पित केला. वस्तुत: हा टप्पा होईतो श्रीधरन त्र्याहत्तर वर्षांचे झाले होते आणि आपण निवृत्त होणार, असे त्यांनी जाहीरही केले होते. परंतु सरकारने त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांनी वाढवून, दिल्ली मेट्रोचा दुसरा टप्पा पुरा करण्याचे काम त्यांना दिले. त्यांना पाकिस्तान सरकारनेही बोलावले होते आणि लाहोर मेट्रोबद्दल त्यांचा सल्ला घेतला होता. २००५ साली संयुक्त अरब अमिरातीने (युएई) त्यांना बोलावून दुबई मेट्रो प्रकल्पाचे प्रमुखपद देऊ केले होते. पण दिल्ली मेट्रोच्या कामामुळे हे काम त्यांनी नाकारले.

     श्रीधरन प्रकल्पाचे काम सह व्यवस्थापकांना वाटून देतात आणि ती-ती कामे केव्हा पुरी झाली पाहिजेत, त्याच्या तारखा त्यांना देतात. प्रकल्पातील प्रमुख अधिकारी आणि कंत्राटदारांना ते दर आठवड्याला भेटून त्यांच्या कामाची प्रगती पाहतात. आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी ताबडतोब नवी व्यूहरचना करतात, त्यामुळे कामाची प्रगती विनाअडथळा होत जाते. कोकण रेल्वेच्या मुंबई ते मंगलोर या ७६० कि.मी.च्या अंतरात असणाऱ्या त्यांच्या ४००-५०० कार्यालयांत रोज, आता हे काम संपायला किती दिवस बाकी आहेत, ते फळ्यावर लिहिले जाऊन कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सूचना दिली जाई.

     आयुष्यभरातील सातत्याने केलेल्या उत्तम कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९६३ साली रेल्वेमंत्र्यांचा पुरस्कार, २००१ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार, २००२ साली टाइम्स ऑफ इंडियाचा ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार, २००३-२००४ सालचा ‘कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’चा पायाभूत सोयी तयार करण्यात दाखवलेल्या नेतृत्वासाठीचा पुरस्कार, २००३ सालचा टाइम मासिकातर्फे ‘आशिया खंडातील नेता’ पुरस्कार, २००३ सालचा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे ‘सार्वजनिक सेवेतील उत्तमता’ यासाठी पुरस्कार, २००४ साली आय.आय.टी. दिल्लीतर्फे सन्माननीय ‘डॉक्टरेट’, २००५ साली चंदीगडच्या शिरोमणी संस्थेतर्फे ‘भारत शिरोमणी’ पुरस्कार, २००५ साली फ्रान्स सरकारचा ‘चेव्हालियर डी ला लेजिऑन डी ऑनर’, २००८ सालचा सी.एन.एन.-आय.बी.एन. टीव्ही चॅनलतर्फे ‘इंडियन ऑफ द इयर’ सन्मान, २००८ सालचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार हे त्यांपैकी काही प्रमुख होत.

- अ. पां. देशपांडे

इलाटूवलापिल, श्रीधरन