Skip to main content
x

इनामदार, सतीश गोविंद

वायुसेना - एअर मार्शल

परमविशिष्ट सेवा पदक

तीश गोविंद इनामदार यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे कोल्हापूरचे. गणितज्ञ असलेले त्यांचे वडील पुण्याचे फर्गसन महाविद्यालय, ग्वाल्हेरचे व्हिक्टोरिया महाविद्यालय, इंदूरचे होळकर महाविद्यालय आदी ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करून जबलपूरच्या रॉबर्टसन महाविद्यालयातून प्राचार्यपदावरून निवृत्त झाले. त्यामुळे सतीश इनामदारांचे शिक्षण या सर्व ठिकाणी झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण व युद्धशास्त्रया विषयात एम. एस्सी. पदवी प्राप्त केली.

त्यांनी वायुसेनेच्या उड्डाण प्रशिक्षण महाविद्यालयात १९६१ साली प्रवेश घेऊन प्रशिक्षण घेतले. ते मार्च १९६३ मध्ये भारतीय वायुसेनेत लढाऊ जेट वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यानंतर बंगळूरच्या ए.एस.टी.ई.च्या विमानचाचणी वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी प्रशिक्षण प्राप्त केले. ते उत्तम विमानचाचणी वैमानिक आहेत. तामीळनाडूतील वेलिंग्टन येथील डिफेन्स सव्हिर्सेस स्टाफ कॉलेज, सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, हैदराबादच्या कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर आणि नवी दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेज या संस्थांमधून त्यांचे विविधांगी प्रशिक्षण झाले.

भारतातील सर्व प्रमुख व्यावसायिक लष्करी प्रशिक्षणाच्या अर्हता त्यांच्या नावावर जमा आहेत. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे ते मुख्य प्रशिक्षक (चीफ इन्स्ट्रक्टर) म्हणून काही काळ कार्यरत होते. १९७४ ते १९७७ या काळात त्यांची नियुक्ती बंगळूरच्या हिंदुस्थान अरोनॉटिक्स लि.मध्ये विमान चाचणी वैमानिक म्हणून झाली होती. १९८३ ते १९८५ अशी दोन वर्षे इराकी वायुदलाच्या बगदाद रेथील फायटर लीडर स्कूलमध्ये उड्डाण प्रशिक्षक म्हणून ते प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. भारतीय लढाऊ विमानांच्या बॅटलअ‍ॅक्सया नावाने प्रसिद्ध असलेल्या सातव्या स्क्वॉड्रनचे ते प्रमुख होते. वायुसेनेच्या सैनिक परीक्षा मंडळा (ए.ई.बी.)चेही ते काही काळ प्रमुख होते. कलाईकुंडा येथील वायुसेनेच्या तळाचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी काम केले. पुढे ते काही काळ हिंदुस्थान अरोनाटिक्सच्या संचालक मंडळाचे सदस्य होते.

वायुसेनेतील सर्व महत्त्वाच्या चार उच्च पदांवर काम केलेल्या मोजक्या अधिकार्‍यांत सतीश इनामदार यांचा क्रमांक वरचा आहे. वायुसेनेच्या मध्य विभागाचे सीनिअर एअर स्टाफ ऑफिसर, वायुसेनेच्या मुख्यालयाचे उपप्रमुख, वायुसेनेच्या पूर्वविभागाचे प्रमुख आणि वायुसेनेचे उपाध्यक्ष (व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ) या चार सर्वांत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी निर्धारित कालावधी पूर्ण केला आहे. या सर्व ठिकाणी त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. वायुसेनेच्या नियोजन व संपादन विभागाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. लढाऊ विमाने, हवाई युद्धातील शस्त्रास्त्रे, रडार व रडारचे विविध प्रकार यांची खरेदी त्यांंच्या अखत्यारीत झाली.

ब्रिटनकडून खरेदी करण्यात येणार्‍या हॉकया अत्याधुनिक जेट प्रशिक्षण विमानांच्या किंमत निर्धारण समितीवर सेनादलांतर्फे ते एकमेव प्रतिनिधी होते. दोन दशकांपूर्वी सुरू झालेली ही हॉकविमानांची संपादन प्रक्रिया सतीश इनामदारांनी पाठपुरावा करून पूर्णत्वास नेली. भारतीय संसदेवर पाकिस्तानने दहशतवादी हल्ला घडवून आणला होता, तेव्हा ते वायुसेनेचे उपाध्यक्ष होते. तेव्हा त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सेनादलांनी आखलेल्या ऑपरेशन पराक्रमया मोहिमेतील वायुसेनेच्या सहभागाची व वायुसेनेच्या संपूर्ण हालचालींची जबाबदारी एअर मार्शल सतीश इनामदारांनी समर्थपणे पार पाडली. त्यांना विशिष्ट सेवा पदकआणि परमविशिष्ट सेवा पदकयांनी सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी तेरा हजार फूट उंचीवरून पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेणारे ते जगातील एकमेव वायुसेना अधिकारी आहेत.

एअर मार्शल इनामदारांच्या निवृत्तीनंतर २००३मध्ये त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिस या संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. राष्ट्रीय अपंग ऑलिम्पिक समितीचे ते अध्यक्ष आहेत.

विविध खेळांच्या क्रीडा नियमन समित्यांचे ते सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय सुरक्षाविषयक घटना, संरक्षण व लष्करी धोरणे, आण्विक युद्धशास्त्रातील घडामोडी अशा संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर त्यांचा अभ्यास आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाटकांची आवड असलेले सतीश इनामदार निवृत्तीनंतरही विविध क्षेत्रांत देशसेवेत कार्यरत आहेत.

- राजेश प्रभु साळगांवकर

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].