Skip to main content
x

इंगळे ठाकूर, माणिकदेव बंडोजी

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिकदेव बंडोजी इंगळे ठाकूर हे होय. त्यांचा जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील माणिकया गावी झाला. त्यांचे वडील बंडोजी नामदेव इंगळे हे उदरनिर्वाहासाठी शिवणकामाचा व्यवसाय करीत. त्यांचे मूळ गाव यावली’. तुकडोजी यांची आई मंजूळाबाई या धर्मपरायण व माहूरगडच्या देवीच्या उपासक होत्या. तुकडोजी महाराजांचे घराणेच पंढरीचे वारकरी होते. वडिलांकडून त्यांना पंढरीच्या वारीचा वारसा मिळाला. प्रज्ञाचक्षू गुलाबमहाराज व संत हरिबाबा तुकडोजींच्या नामकरणास उपस्थित होते व त्यांनी बाळाचे नाव माणिकदेवअसे ठेवले होते.

थोर संत आडकोजी यांच्या सेवेत तुकडोजी महाराजांचे मामा होते. त्यामुळे लहानपणीच तुकडोजी महाराजांना आडकोजी यांचा संतसंग व आशीर्वाद प्राप्त झालेला होता. संत आडकोजी १९२१ साली समाधिस्थ झाले व त्यामुळे तुकडोजी उदास-विरक्त झाले व मन:शांतीसाठी थेट पंढरीस गेले. तेथे भक्त पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीच्या कथा ऐकून पुनश्च घरी परतले व वडिलांचा शिवणकामाचा व्यवसाय करू लागले. पण त्यांचे मन संसारात रमत नव्हते. अखेर, एके दिवशी ते गृहत्याग करून ईश्वरदर्शनाच्या ओढीने रामटेकच्या अरण्यात तपश्चर्या करू लागले. तेथे त्यांची एका फकिराशी भेट झाली. बालपणापासूनच असलेली भजनाची आवड वृद्धिंगत होऊन, हृदयाचा ठाव घेणारा भजनगायक - खंजिरीवादक म्हणून त्यांचे सर्वत्र नाव झाले. त्यांनी १९२४ मध्ये भारतभ्रमण करीत सर्व देश पालथा घातला.

ग्रमांची स्थिती, ग्रमीण लोकजीवनातील अनंत व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या व ग्रमसुधारणेच्या कार्याचा मनोमन संकल्प केला. १९४२ च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. मोझरी येथे त्यांनी गुरुदेव धर्मसेवा आश्रमस्थापन केला. १९४३ साली त्यांनी गुरुदेवनावाचे मासिक सुरू केले. म. गांधी, विनोबा भावे यांचा ग्रमविकासाचा विचार त्यांनी खेडोपाडी आपल्या प्रभावी भजनांद्वारे मांडला. स्वावलंबन, स्वच्छता, साक्षरता, राष्ट्रीय एकात्मता या विषयांना केंद्रस्थानी ठेवून गावोगावी सप्ताह साजरे केले.

ते १९५३ साली पंढरीच्या वारीला गेले असता, चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांना ग्रमगीतालिहिण्याची प्रेरणा मिळाली. खेडी सुधारली तरच देश सुधारेल, असा विचार करून त्यांनी ग्रमगीतालिहिली. १९५४ साली, मे महिन्यामध्ये ४१ अध्यायांच्या ग्रमगीतेचे लेखन पूर्ण होऊन देशभर १००० कार्यक्रमांत एकाच वेळी गीताजयंतीच्या मुहूर्तावर तिचे प्रकाशन करण्यात आले.

ग्रमगीतेमध्ये तुकडोजी महाराज आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात : ग्रमगीता माझे हृदय । त्यात बसले सद्गुरुराय । बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रमासि ॥ही ग्रमगीता गावोगावी सामुदायिकरीत्या वाचन केली जात असे, अशी लोकप्रियता या रचनेस लाभली.

१) सद्धर्ममंथन, २) लोकवशीकरण, ३) ग्रमनिर्माण, ४) दृष्टिपरिवर्तन, ५) संस्कारशोधन, ६) प्रेमधर्मस्थापना, ७) देवत्वसाधना व ८) आदर्श जीवन अशी एकूण आठ पंचके ग्रमगीतेत आहेत. या ग्रंथाचा देशातील सर्व मान्यवरांनी गौरव केलेला आहे.

तुकडोजींची या ग्रंथातून व्यक्त होणारी ग्रमविकासाची तळमळ राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, विनोबा भावे, गाडगे महाराज, पंडित सातवळेकर, वि.स. खांडेकर, शंकरदयाळ शर्मा आदींनी विशेषत्वाने अधोरेखित केलेली आहे. भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंतही पदवी देऊन गौरव केला.

ग्रमगीता लिहिण्यापूर्वीच तुकडोजींच्या भजनावलीचे प्रकाशन झालेले होते. केवळ धार्मिक-पारमार्थिक नव्हे, तर त्यांच्या देशभक्तिपर स्फूर्तिगीतांनी अनेकांना वेड लावले होते. ही गीते गात त्या काळात बालतरुण प्रभातफेर्‍या काढीत.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व नंतर स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी तुकडोजी महाराजांनी आपले सारे जीवन वाहिले. चीन-भारत युद्धावेळी त्यांनी थेट सीमेवर जाऊन भारतीय सैन्याचे मनोबल वाढविले, तसेच त्यांच्यासाठी संरक्षणनिधी गोळा केला.

विनोबांच्या भूदान चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. सततचा प्रवास व आरोग्याची हेळसांड यांमुळे तुकडोजी महाराजांना पुढे कर्करोग झाला व तो बळावून त्यांचे देहावसान झाले. त्यांनी स्थापन केलेला गुरुदेव आश्रमतुकडोजींचे कार्य पुढे चालवीत आहे.

विद्याधर ताठे

इंगळे ठाकूर, माणिकदेव बंडोजी