Skip to main content
x

जाचक, माणिक सोपान

दादा जाचक

            कृषिनिष्ठ शेतकरी माणिक सोपान जाचक यांचा जन्म बारामती तालुक्यातील पिंपळी या खेडेगावात झाला. वडील शेतकरी असल्यामुळे त्यांनाही शेतीची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील समाजाच्या भल्यासाठी मनापासून झटत. त्यांना इंग्रज सरकारने रावबहादूर ही पदवी दिली होती. जाचक यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. ते शेतीत नवनवीन प्रयोग करत असत. नीरा खोऱ्यातील प्रसिद्ध उद्योगपती व प्रयोगशील शेतकरी असा त्यांचा नावलौकिक होता. दिल्ली येथील जागतिक प्रदर्शनात द्राक्षाच्या उत्तम उत्पादनाबद्दल पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सर्व प्रकारची कडधान्ये, फळे (केळी, डाळिंबे), भाजीपाला यांचे उत्तम उत्पादन करून त्याही पिकांसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस त्यांना मिळाले होते. आजूबाजूच्या फळबागा पाहून त्यांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुधारणा करून उत्तम फळे निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आणि प्रसार करत. इंदापूर (पुणे) तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारखान्याचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कारभार करून कारखाना प्रथम क्रमांकात आणला. ते बारा वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदी होते.

            गुऱ्हाळे सुरू करण्याऐवजी उसापासून साखर करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. त्यांनी १९६०पासून संकरित गोपैदास करून ५०० गाईंचा आदर्श गोठा आणि ५००० शेळ्या-मेंढ्याचा फार्म तयार केला. शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

            जाचक यांची शेती पाहण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील व कृषिमंत्री शरद पवार यांनीही भेट दिली होती. जाचक नामवंत उद्योगपतीही होते. शरद पवार यांची जडणघडण करण्यात जाचक यांचे मोठे योगदान आहे. भारत फोर्ज, किर्लोस्कर ब्रदर्स लि. या कंपन्याचे ते अनेक वर्षे संचालक होते.

- संपादित

जाचक, माणिक सोपान