Skip to main content
x

जाधव, कैकाडी भागुजी

कैकाडीबाबा

     पूर्वाश्रमीचे कैकाडी भागुजी जाधव म्हणजेच संत कैकाडीबाबा यांचा जन्म कात्राबाद, मांडवगण, जिल्हा अहमदनगर येथे सुखी कुटुंबात झाला. त्यांच्या वाड-वडिलांचा कंत्राटदारीचा धंदा होता. सच्चेपणामुळे धंदा उत्तम चालून जाधव कुटुंब सुखवस्तू झाले. कैकाडीबाबांना सहाव्या वर्षी शाळेत घातले; पण त्यांचे मन पाटी-पुस्तकात रमेना. बालपणीच त्यांची ओढ ईश्वराकडे होती. त्यांना विठ्ठलनामात, पोथ्यापुराणे, कथा, कीर्तने, प्रवचने ऐकण्यात रस होता.

     वयाच्या पंचविसाव्या वर्षीच त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्या आसपासच्या काळातली हकिकत अशी, की बाबा कीर्तन करीत होते. त्यांचे मोठे बंधू व बुवांची पत्नी आजारी मुलाला मांडीवर घेऊन कीर्तनास बसली. कीर्तन चालू असतानाच मूल दगावले व आईने हंबरडा फोडला. कैकाडींना झाला प्रकार समजला, तरी ते शांत, निर्विकार होते. ते म्हणाले, ‘‘मनुष्य मर्त्य आहे. तो आज ना उद्या मरणारच. कालवश होणारच. क्षणैक जीवनासाठी रडण्यात काय अर्थ आहे? शाश्वत सुख परमेश्वराच्या नामस्मरणात, चिंतनात, भजनात असताना खंड कशाला?’’

     ज्याचे होते त्याने नेले । त्यात तुझे काय गेले ।

     ऐसे मेले कोट्यान्कोटी । काय रडू एकासाठी ?

     त्या काळी स्पृश्यास्पृश्य भेद तीव्र होते. देवळात कैकाडी समाजाच्या माणसाला प्रवेश नव्हता. त्याला हलके समजण्यात येई. बाबांनी देवळासमोरच अन्न सत्याग्रह केला. आठ दिवस तसेच उभेच्या उभे राहिले. ग्रामस्थांना त्यांचे म्हणणे पटू लागले. शेवटी कैकाडी बाबांचे मागणे मान्य झाले. बाबांनी समजावले की, ‘‘ईश्वराने जन्म देताना भेदभाव केला नाही... ईश्वरसेवा केवळ उच्च जातीचा हक्क नाही. देवाचे दर्शन, भजन यांचा लाभ कोणालाही घेता यावा.’’ शेतकऱ्यांना त्यांनी कळकळीने समजावले, ‘‘माझ्या शेतकरी बंधूंनो, जागे व्हा. डोळे उघडा. या सर्व धनिक लोकांचा विचार करा आणि त्यांच्या जुलुमी हक्कांची वाट लावा, तरच तुमची धडगत आहे.’’

     परमेश्वराच्या भक्तीला काही खर्च येत नाही. मनापासून केलेली सेवा परमेश्वराकडे रुजू होते. ते धनिक व विद्वानांना आवाहन करीत, की गरिबांना, दलितांना मागे ठेवू नका. ‘शिवाशीव’ हा शब्द गाडून टाका. दलितांना स्वच्छतेचे धडे द्या. मनुष्य मनुष्याला शिवला तर विटाळ कसला मानता? सगळ्यांचे देह सारखेच. देवानेच असे पंचमहाभूतात्मक देह निर्माण केले, मग भेद राहिला कोठे? बाबांच्या जीवनात सामुदायिक प्रार्थनेचा नियम अतिमहत्त्वाचा असे. तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. परमार्थ साधनेच्या दृष्टीने बाबांनी अनेक खडतर नियमांचे पालन केले. यांतील बहुतेक नियम वैयक्तिक आणि अवघडच होते. त्यांना वाटे, की आत्मोद्धारासाठी आपण साधना करीत आहोत; पण यापासून जनसामान्यांना कोणता लाभ होणार? सर्वांसाठी सुलभ प्रार्थनेचा नियम आहे.

     बाबांना तीव्रतेने एकांताची जरुरी वाटू लागली. त्यांनी सरळ हिमालयाचा रस्ता धरला. एकांतात त्यांच्या मनात अनेक प्रश्‍न उभे राहत. आत्मशोधन, तत्त्वशोधन, मनुष्याचे जीवन कशाकरिता? मनुष्याचा खरा धर्म कोणता? अशा एकांतातही चार वर्षे व्यतीत झाली. समाधान गवसेना. बाबांनी झाडांचा पाला ओरबाडून खाणे सुरू केले. त्यांचे शरीर क्षीण, अशक्त व कृश झाले. याच प्रसंगी संत गाडगे महाराज भेटीला आले. गाडगे महाराज म्हणाले, ‘‘पशूच्या शरीर रचनेत आणि माणसाच्या शरीर रचनेत परमेश्वराने भेद केला आहे. म्हणून त्यांचा आहार आणि माणसांचा आहार यांत फरक पडतो. मनुष्य अन्न खातो ते समाजकार्यास शक्ती लाभावी म्हणून खातो. पशूचे अन्न माणसाला कसे पचेल?’’ गाडगेमहाराजांच्या समजावण्याने कैकाडीबाबा अन्न सेवन करू लागले. ते गाडगेमहाराजांचे शिष्य बनले. त्यांनी कीर्तनाचे दौरे काढले. जनसामान्यांना खऱ्या सुखाचा मार्ग दाखवून, भक्तीचा प्रसार केला. मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा दिली. अन्नदान व वस्त्रदान केले. देह चंदनाप्रमाणे झिजवला. जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून त्यात रममाण असणारा भगवंत जवळ केला. ठिकठिकाणच्या दौऱ्यांत असंख्य लोकांना व्यसनापासून व अनिष्ट चालीरीतींपासून मुक्त केले.

     कैकाडीबाबा आत्मविश्वासाने जमावाला सांगत, ‘‘मी सांगतो तसे वागाल, तर तुम्हांला स्वानंदाचे साम्राज्य मिळेल. मी सांगतो तसे ऐकून, वागूनही जर तुमचे अकल्याण झाले, तर तुमच्या कैकाडीबाबाला फाशी द्या.’’ त्यांनी लिहिलेल्या ‘एक डोई शंभर न्हावी’ या पुस्तकमालेचा अर्थ काय? डोके एक व हजामत करणारे शेकडो. बिचारे एक डोके कोणा न्हाव्याचा चरितार्थ चालवील? तसा पिढ्या आणि पिढ्या  दरिद्री अवस्थेत सापडलेला कष्टाळू शेतकरी समाज एकटा व आम्ही तुमचे कल्याण करतो असे फक्त सांगत त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला पिळून खाणारे जास्त, अशी परिस्थिती. कैकाडीबाबांनी श्रमजीवी व अज्ञानी बहुजन समाजाच्या हितासाठी आपले विचार परखडपणे मांडले.

वि.ग. जोशी

जाधव, कैकाडी भागुजी