Skip to main content
x

जाधव, लक्ष्मीबाई

      लक्ष्मीबाई जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई होते. बालपणीच माता-पित्याचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या मावशीनेच  त्यांचे पालनपोषण केले. लक्ष्मीबाईंचा आवाज अत्यंत नाजूक व गोड होता. मावशीच्या पतिराजांना गाण्याचा शौक होता. त्यांनी लक्ष्मीबाईंना चांगला गुरू मिळावा म्हणून खूप धडपड केली. लक्ष्मीबाईंनी १९१७ साली अल्लादिया खाँ साहेबांचे बंधू हैदर खाँ यांचा गंडा बांधला. दुर्दैवाने ऐन तारुण्यातच त्यांना गंडमाळेचा आजार झाला. शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी पुन्हा गाण्याची मेहनत सुरू केली. हैदर खाँकडून १९३० पर्यंत त्यांना तालीम मिळाली. नंतर उ. अल्लादिया खाँ व त्यांचे पुत्र भूर्जी खाँ यांच्याकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळत राहिले.
लक्ष्मीबाईंच्या गाण्यात आम व अनवट रागांची सहजसुंदर पेशकश, सूक्ष्म लयकारी, दाणेदार ताना व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्तम बोलतान ही वैशिष्ट्ये होती. लक्ष्मीबाईंनी शास्त्रग्रंथांचा अभ्यास करून आपली दृष्टी व्यापक केली होती. त्यांच्या गुरुभगिनी मोगूबाई यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण सांगीतिक संबंध होते. ख्यालाखेरीज ठुमरी, गझल, भावगीत, भजन हे प्रकारही त्या उत्तम गात. त्यांनी अनेक द्रुत बंदिशी, दादऱ्यांच्या रचना केल्या होत्या. ‘सारे छंद सोड कन्हैया’ अशी त्यांनी गायलेली काही भावगीते त्या काळी गाजली होती.
लक्ष्मीबाई १९२२ पासून ते १९४५ पर्यंत बडोदा दरबारात दरबार गायिका म्हणून होत्या. याबद्दलची एक कथा अशी सांगितली जाते. सयाजीराव निद्रानाशाच्या विकाराने ग्रसले असता, त्यांना स्वस्थ झोप लागावी म्हणून बऱ्याच गायक-वादकांना अंगाई गीत गाण्यावाजवण्याकरिता बोलावण्यात आले, परंतु कोणालाच यात यश आले नाही. लक्ष्मीबाई मात्र यात यशस्वी झाल्या. अर्थात दुसऱ्या दिवशी दरबार गायिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. सयाजीरावांनी त्यांना भरजरी वस्त्रे, अलंकार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला, तसेच दरबारात येण्याकरिता बग्गीही दिली. बडोद्यातील त्यांच्या कारकिर्दीमुळे त्या काळात ‘लक्ष्मीबाई बडोदेकर’ या नावानेही त्या ओळखल्या जात.
बडोद्यात त्यांना धन, प्रसिद्धी आणि मानसन्मानही मिळाले. बडोद्यात आणि बाहेरही बनारस, कलकत्ता, इ. ठिकाणी गाण्याकरिता त्यांना निमंत्रणे मिळत गेली. बडोदा दरबारामध्ये वर्षातून चार महिने रजा मिळे. या काळात त्यांनी भारतात अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले. प्रयागच्या संगीत परिषदेतही त्या गाजल्या. शंकराचार्य डॉक्टर कूर्तकोटींनी लक्ष्मीबाईंना ‘संगीत चंद्रिका’ ही पदवी दिली.
लक्ष्मीबाईंचा आवाज अत्यंत सुरेल व गोड होता. ख्यालाबरोबरच त्या ठुमरीही गात. एच.एम.व्ही आणि यंग इंडिया कंपनीनेही त्यांच्या जवळजवळ ५० ध्वनिमुद्रिका काढल्या. आकाशवाणी, मुंबई
  व पुणे केंद्रांवरूनही त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले.
लक्ष्मीबाई जाधवांनी कोल्हापुरातील स्वतःचे घर आणि बरीचशी संपत्ती शाळा आणि रुग्णालयाला दान दिली. कोल्हापूर विद्यापीठालाही त्यांच्या उदारतेचा लाभ झाला. धारवाड विद्यापीठात संगीत अध्यापनासाठी त्या काही काळ कार्यरत होत्या. धोंडूताई कुलकर्णी या त्यांच्या प्रमुख शिष्या होत. तसेच मल्लिकार्जुन मन्सूर यांनीही त्यांच्याकडून काही बंदिशींचे मार्गदर्शन घेतले होते.
कलावंतांच्या जगात वावरणाऱ्या लक्ष्मीबाई
  आचारविचारांत अत्यंत सुसंस्कृत होत्या. १९४५ नंतर त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात होते. वयाच्या साठाव्या वर्षाच्या पूर्वार्धापर्यंत त्यांनी गायनाला पूर्ण वाहून घेतले होते. त्यांना पोटशुळाची व्यथा होती; पण शस्त्रक्रिया केली तर गाणे जाईल, म्हणून उपचार न करता ही व्यथा घेऊनच त्या गात राहिल्या. शेवटी या आजारातच त्यांचा अंत झाला.

माधव इमारते

जाधव, लक्ष्मीबाई