Skip to main content
x

जाधव, नामदेव रामजी

   नामदेव रामजी जाधव यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या निमज या गावात झाला. त्यांचे मूळ गाव अहमदनगरमधील वीरगाव हे हाय. त्यांचे वडील हे एक गरीब शेतकरी होते. घरातल्या गरीब परिस्थितीमुळे नामदेव शालेय शिक्षण घेऊ शकले नाहीत. शेतीवर वडिलांना मदत करणे व गुरेढोरे राखणे हेच त्यांचे काम. त्यांची आवडती गोष्ट म्हणजे आपल्या मित्रमंडळींना घेऊन प्रवरा नदीत पोहणे. ह्याच त्यांच्या आवडीचे रूपांतर छंदात झाले आणि पुढे  ह्याच छंदाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. असा विचार मात्र त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. 

    त्यानंतर  जाधव यांनी काही काळ सर्कशीत घालवला. वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे १८ नोव्हेंबर १९४१ रोजी ते मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये दाखल झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात, ९ एप्रिल १९४५ रोजी इटलीमध्ये सिनिओ नदीच्या काठावर १/५ मराठा लाइट इन्फन्ट्रीची जर्मन सैन्याशी गाठ पडली. त्या वेळी १/५ मराठा लाइट इन्फन्ट्रीच्रा दोन्ही तुकड्यांनी एकाच वेळी सिनिओ नदीकाठावर पूर्व-पश्चिम भागातल्या बेसावध शत्रुसैन्यावर हल्ला केला.

     हा हल्ला करणाऱ्या तुकडीमध्ये नामदेव जाधव हे कंपनी कमांडरबरोबर आघाडीवर होते. त्यांच्याकडे ‘कंपनी गनर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ते आपल्या तुकडीबरोबर सिनिओ नदी पार करत असताना काठावरच्या तीन जर्मन ठाण्यांमधून जोरदार गोळीबाराला सुरुवात झाली. या गोळीबारामध्ये कंपनी कमांडर व तुकडीतले इतर दोघे जखमी झाले. हे तिघे व नामदेव जाधवांव्यतिरिक्त अन्य सर्वच ठार झाले.

     नामदेव जाधवांनी एका जखमी सोबत्याला घेऊन  नदीचे खोल पात्र पार केले व उताराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यांनी पुन्हा एकदा याच पद्धतीने दुसऱ्या जखमी सैनिकालाही पलीकडे सुखरूप नेऊन पोहोचवले. या दोन्ही वेळेस शत्रुसैन्याकडून तोफेचा व बंदुकीचा मारा सुरूच होता. अशा बिकट परिस्थितीमध्ये नदी पार करताना लहानपणी जोपासलेला जाधव यांचा पोहण्याचा छंद त्यांच्या कामी आला.

     अशा दोन फेऱ्यानंतर दमून न जाता पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी नदी पार केली व जर्मनीच्या शत्रुसैन्यावर आपल्या बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव केला. त्यांच्या हाताला जखम झाली व बंदूक हातात घेणे अशक्य झाले, तेव्हा त्यांनी हातबॉम्ब टाकून शत्रूची दोन ठाणी पार नामशेष करून टाकली. त्यांनी आपल्या जखमी सहकाऱ्यांना मोठ्या शिताफीने व धाडसाने नदीपार नेऊन त्यांचे प्राण वाचवले. यासाठी अत्यंत महत्त्वाचा व मानाचा ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

- रूपाली गोवंडे

जाधव, नामदेव रामजी