Skip to main content
x

जाधव, राजा सखाराम

     राजा जाधव यांचा जन्म वाटक-खंडळा, ता.जि. रत्नागिरी येथे झाला. एम.ए. व पत्रकारितेतील पदविका असे शिक्षण राजा जाधव यांनी प्राप्त केले.

     बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस, मालाड दलित शिक्षण संस्थेचे विश्वस्त ही पदे त्यांनी भूषविली. राजा जाधव यांची चिंतन, कोकणातील दलित चळवळ, सामाजिक सांस्कृतिक विषयांवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य चळवळ’, ‘६ डिसेंबर १९५६ आणि त्यानंतर’, ‘आंबेडकरी साहित्य विचारसौंदर्य’, ‘प्रबोधनाचे शिल्पकार’, ‘दलित साहित्य समीक्षा’, ‘साहित्यातील समाजजीवन’, ‘शतकातील क्रांती- महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सम्यक आकलनाची दिशा’ इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत.

     महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, नवा काळ, साप्ताहिक विवेक, सामाजिक समरसता मंच पत्रिका यांतून राजा जाधव यांनी विपुल लेखन केले असून दलित समस्यांची उकल आणि समतेचा आग्रह ही राजा जाधव यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.

     राजा जाधव यांच्या ‘६ डिसेंबर १९५६ आणि त्यानंतर’  या पुस्तकाला शासनाचा ‘अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ लाभला. त्याचप्रमाणे मुंबई मराठी पत्रलेखकाचा ‘समाजसेवा पुरस्कार’, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ‘समीक्षक पुरस्कार’, सामाजिक समरसता मंचाचा ‘संत गाडगेबाबा पुरस्कार’, कोकण परिषदेचा ‘समीक्षक पुरस्कार’ असे लाभले आहेत.

     २००५ साली पणजी, गोवा येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजा जाधव यांनी भूषविले. साहित्य आणि समाज यांचे नाते हे समाजाला दिशा देणारे असावे, ‘भवतु सब्ब मंगलम्’ या वचनाचा आधार घेत साहित्याने समाजातील व्यथा वेदना मांडाव्यात; पण त्या दूर करण्याचाही प्रयत्न करावा, अशा प्रेरणा जागवणारे लेखन राजा जाधव यांनी केले. आपल्या लेखनाबद्दल ते म्हणतात, “साहित्यातले समाज-दर्शन सर्वच सत्य असते असे नाही. तो सत्याचा आभास असतो. पण सत्याचा आभास निर्माण करताना वास्तव जीवनातील मूलतत्त्वे चित्रित झाली पाहिजेत. परात्मता ही एक संकल्पना रूढ होत आहे. दुसर्‍यांच्या जीवनात घडणार्‍या घटनांचे मूळ घटक शोधण्याचे काम परात्मतेने करणे आवश्यक ठरते.” याचाच अर्थ राजा जाधव समरस साहित्यासाठी आग्रही होते. प्रामुख्याने दलित चळवळीतील सक्रिय सहभाग, दलित साहित्याचे आणि समाजाचे चिंतन अशी राजा जाधव यांची ओळख  आहे. राजा जाधव यांच्या साहित्याचे आणि समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची समन्वयवादी भूमिका. सामाजिक विद्वेष, जाति-प्रथांचे समर्थन आणि दुराग्रह यांपासून राजा जाधव दूर राहून सामाजिक ऐक्याच्या प्रेरणा जागवणारे साहित्य निर्माण करतात. त्यांच्या समीक्षेचेही तेच बलस्थान असते.

    - रवीन्द्र गोळे

जाधव, राजा सखाराम