जाधव, सुरेश वसंत
डॉ. सुरेश वसंत जाधव यांचा जन्म सावंतवाडी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मुंबईला काकांकडे आले. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच सुरेश जाधव हे काकांबरोबर ‘मिनर्व्हा मुव्हीटोन’ मध्ये काम करायला लागले.
कुठलेही शालेय शिक्षण नसताना सुरेश जाधव यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. काम करून मिळवलेल्या पैशांतून ते पुस्तके विकत घेत असत. जाधव हे इंग्रजी, मराठी उत्तम वाचत. मिनर्व्हा मुव्हीटोनमध्ये त्यांनी छायाचित्रणाचे धडे घेतले. शालेय शिक्षण नसलेले सुरेश जाधव १९५२ मध्ये छायाचित्रणाच्या शिक्षणाच्या पाठबळावर भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षणात रुजू झाले.
जाधव यांनी पुण्यातील कार्यालयात काम केले व त्याचबरोबर औरंगाबाद येथील बहाल, दायमाबाद, मास्की, पितळखोरा, कान्हेरी व वेरूळ येथील उत्खननात सहभाग घेतला.
सुरेश जाधव यांच्या विविध छायाचित्रांना श्री. घोष, देशपांडे, कृष्णास्वामी इत्यादी मोठ्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी प्रोत्साहन दिले.
१९५५ मध्ये त्यांनी ‘ Darid Dela Harport यांच्या ‘युनेस्को’ प्रोजेक्टमध्ये अजिंठ्याच्या रंगीत छायाचित्रणाचे काम केले. त्यांनी काढलेली लयण-चित्रे, युरोपचे नकाशे, महाराष्ट्राचे नकाशे यांनी पुष्कळ लौकिक मिळविला.
प्रो. स्पिंक या अजिंठा अभ्यासक व तज्ज्ञ यांच्या सहवासात आल्यामुळे त्यांच्या कलेला व विद्वत्तेला वाव मिळाला. त्यांच्याबरोबर अजिंठ्यावर काम करत असताना त्यांनी बी.ए. व एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. डेक्कन महाविद्यालयामधील त्यांचे मित्र गुरुवर्य डॉ. ढवळीकर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुरातत्त्व विद्येत ‘The Rock Cut Cave Temples at Jinwa-An Integrated Study’या विषयात पीएच.डी. पूर्ण केली.
मिशिगन विद्यापीठातील ACSAA प्रकल्पाकरिता त्यांनी भारत, नेपाळ, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, ब्रिटिश म्युझियम इत्यादी ठिकाणची लेणी, मंदिरे, शिल्पे, प्राचीन स्थळे यांचे अनेक प्रकारे छायाचित्रांकन केले.सन १९८५ व १९९२ साली त्यांना अमेरिकेची सिनिअर फुलब्राइट फेलोशिप मिळाली. त्या वेळी ते अभ्यागत व्याख्याता म्हणून कार्यरत होते. १९९३ मध्ये ते २२व्या ACSAA चे अध्यक्ष होते. या सर्व उपाधी असूनही ते अत्यंत नम्र व विनयशील होते. त्यांनी काढलेल्या एलिफन्टाच्या महेशमूर्तीच्या छायाचित्रांत दिसणार्या ‘शिवाचे’ योगीरूप फक्त त्यांच्या कलेतून साध्य होऊ शकते. जाधव यांनी लिहिलेले ८० हून अधिक शोधनिबंध, सर्व तरुण पुरातत्त्व शास्त्रज्ञांना कायम मार्गदर्शक ठरत राहतील.