Skip to main content
x

जैन, भंवरलाल हिरालाल

             ठिबक सिंचन, ऊतीसंवर्धन, अन्नप्रक्रिया आणि सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप यांसारखे तंत्रज्ञान जगभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी उद्योजक असणाऱ्या भंवरलाल हिरालाल जैन यांनी केले. त्यांचे मूळ घराणे राजस्थानमधील आगोलाई येथील आहे. दुष्काळाच्या काळात सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या वाकोद या छोट्या खेडेगावात स्थलांतरित झाले. त्यांच्या आधीच्या पिढ्या शेती आणि शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असत.

             भंवरलाल हिरालाल जैन यांचा जन्म वाकोद येथे झाला. त्यांच्या आईचे नाव गौराबाई होते. भंवरलाल यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण वाकोद येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण जळगाव येथे झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते त्यांच्या काकांकडे गेले. त्यांचे काका दुलिचंद ओसवाल मुंबईला राहत. तेथे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी राजपत्रित अधिकारी पदासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षाही दिल्या, तेव्हा त्यांची महाराष्ट्र प्रशासन सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली होती, परंतु सेवेत लगेच रुजू न होता ते आईचा सल्ला घेण्यासाठी वाकोदला गेले. आईच्या सल्ल्यानुसार त्यांनी शेतकरी व पशू-पक्षी यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशा उत्पादनांचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांनी ७०००/- रु. भांडवलावर केरोसीनची एजन्सी बुक केली. (पुढे जैन ब्रदर्स नावाने ती ओळखली जाऊ लागली.) तेव्हा जैन यांनी हातगाडीवरून घरोघरी जाऊन केरोसिनची विक्री केली. हा व्यवसाय करताना त्यांना खराब बियाणे, पाण्याची व खतांची कमतरता यांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची तीव्रतेने जाणीव झाली. ते प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी उत्तम सामग्री शेतकऱ्यांना पुरवण्याचे निश्‍चित केले आणि क्रुड ऑइल, बियाणे, खते आणि ट्रॅक्टर्स, इरिगेशन प्लास्टिक पाइप्स आदी उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.

             जैन यांनी १९७९मध्ये केळीची भुकटी तयार करणारा सहकारी कारखाना विकत घेतला व त्या यंत्राचा उपयोग करून पपईच्या चिकापासून पेपेनच्या उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या शोधक नजरेला नावीन्याची ओढ होती. पीव्हीसी पाइप्स हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे, कार्यक्षम, तसेच आर.सी.सी. किंवा मेटल पाइप्सला सक्षम पर्याय आहेत. या पाइप्सच्या वापरामुळे पाणीपुरवठा करताना होणारी गळती व बाष्पीभवन यापासून पाण्याची बचत होते. जमिनीचा खारटपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होते. तसेच वीज व पाण्याचीही बचत होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन जैन यांनी १९८०मध्ये पीव्हीसी पाइप निर्मिती करण्याचा कारखाना सुरू केला. ही अत्याधुनिक ठिबक सिंचनाची नांदी ठरली.

             जैन यांनी १९८६मध्ये ठिबक सिंचनाची योजना भारतात प्रत्यक्षात आणली. पुढे या प्रणालीत आवश्यक सुधारणा घडवून ती छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. सिंचनाचे वेळापत्रक, रोपांना खते देण्याच्या पद्धती यांविषयी त्यांनी शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानामुळे कृषीच्या उत्पादकतेत ४०% ते ५०% नी वाढ झाली.

             वर्तमानात आठ देशांमध्ये जैन इरिगेशनचे सोळा कारखाने कार्यरत आहेत. देश-विदेशातील विभागीय कार्यालये, वितरक प्रतिनिधी यांच्या माध्यमातून जगभरातल्या १२३ देशांमध्ये जैन इरिगेशनची उत्पादने पोहोचली आहेत. ठिबक सिंचनासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती एकाच ठिकाणी करणारी जैन इरिगेशन ही संपूर्ण जगातील प्रमुख कंपनी आहे.

             ठिबक सिंचनानंतर शेतकऱ्यांसाठी भंवरलाल जैन यांनी जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगशाळा उभारली. तसेच त्यांनी ऊती संवर्धनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानही विकसित केले. केळीच्या रोपांचे ऊती संवर्धन लोकप्रिय करण्यासोबतच डाळिंब व कांद्याच्या रोपांच्या ऊती संवर्धनाची संकल्पना जैन यांनी रुजवली. ऊती संवर्धनामुळे केळीच्या कापणी हंगामासाठी लागणारा कालावधी १८ महिन्यांवरून ११ महिन्यांवर आणणे शक्य झाले. त्यांनी ऊती संवर्धन केलेल्या डाळिंबाच्या रोगमुक्त रोपांचे वाटप  केले.  त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबाच्या निरोगी रोपट्यांची लागवड करून उत्पादकतेत वाढ करता आली व त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत झाली. पुढे जैन यांनी जळगाव येथे अन्न प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामध्ये त्यांनी भाजीपाला व कांदा, लसूण, आले आदींचे निर्जलीकरण करण्यात यश मिळवले. भारतात जळगाव व वडोदरा येथे तर अमेरिकेत बोर्डमॅन व ब्रिटनमध्ये सिलफोर्ड येथे त्यांचे कारखाने आहेत. या प्रकल्पात १,७५,००० टन कांद्यावर निर्जलीकरणाची प्रक्रिया होते. त्यांनी कांद्यासारख्या पिकाला बाजारभावाची हमी मिळवून देण्याचे कामही केले. भारतात कांद्याच्या संदर्भात करार शेतीची संकल्पना रुजवणे, यात जैन यांचा मोलाचा वाटा आहे. हे जगातले तिसरे निर्जलीकरण केंद्र आहे. जैन यांनी फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्पही सुरू केला. या प्रकल्पात आंबा, केळी, पेरू, डाळिंब, पपई, आवळा व टोमॅटो या फळांवर प्रक्रिया करून त्याचे निर्जंतुक अशा पल्प व प्युरी यामध्ये रूपांतर करण्यात येते. जैन यांचे फळांवर प्रक्रिया करण्याचे तीन कारखाने आहेत. त्यातील एक कारखाना जळगाव व दोन कारखाने चित्तूर येथे आहेत. त्यात १,७५,००० टनपेक्षाही जास्त फळांवर प्रक्रिया केली जाते.

             जैन यांनी शेती व शेतीच्या संदर्भात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी जैन हायटेक अ‍ॅग्री इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पुढे हे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याचे व शिकण्याचे केंद्र झाले. जैन यांनी पाण्याचे संवर्धन करून अनुत्पादक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांनी क्षारयुक्त चोपण व जिरायती जमिनीही लागवडीखाली आणल्या. पीक लागवडीच्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जैविक तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळा स्थापन केल्या. त्याचबरोबरीने त्यांनी कृषी व प्रात्यक्षिक संशोधन केंद्राची स्थापनाही केली. या केंद्रांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. जैन उच्च तंत्रज्ञान कृषी प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांनी सहभागी झाले. पडीक जमीन लागवडीखाली आणणे, जमिनीचा कस कायम राखणे, डोंगराळ व खडकाळ भागांत लागवड करणे, पाणी अडवून त्यांचे व्यवस्थापन करणे, हरितगृहे निर्माण करणे, सेंद्रिय व जैविक खते आणि कीटकनाशके तयार करणे, ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

             जैन यांनी अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले, तसेच त्यांनी ऊर्जेच्या समस्येवर मात करण्यासाठी बायोगॅस व सौर ऊर्जेचा उपयोग करून ऊर्जानिर्मितीचे यशस्वी प्रयोग केले. बायोगॅसवर आधारित १.७ मेगावॅटचा प्रकल्प सुरू करण्यात आला. ऊर्जा फळप्रक्रिया कारखान्यातून निघणाऱ्या टाकाऊ अथवा निरुपयोगी पदार्थांपासून बायोगॅस बनवण्यात येतो. तसेच बायोगॅसमधून निघणाऱ्या मिथेनच्या अर्कापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आलेले आहे. भंवरलाल जैन यांनी ‘ती आणि मी’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्यांनी ‘आजची समाजरचना ः स्वरूप व पुनर्बांधणी’ हे चिंतनात्मक पुस्तकही लिहिले आहे. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य भंवरलाल जैन यांनी केले.

             भंवरलाल जैन यांना एकूण २२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना १९९५मध्ये ‘इनोव्हेशन इन अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ हा फाय फाऊंडेशनचा पुरस्कार देण्यात आला. त्यांना २००७ मध्ये युनेस्कोतर्फे दिला जाणारा वॉटर कन्झर्व्हर ऑफ इंडिया हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना २००८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कृषीक्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी जैन यांना २००६मध्ये डी.लिट.(विद्यापीठ) ही पदवी बहाल करण्यात आली. २०११ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

             - किशोर कुळकर्णी

जैन, भंवरलाल हिरालाल