Skip to main content
x

जानोरकर, डेबू झिंगराजी

ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती अशा सामाजिक कार्यांना आणि समाज प्रबोधनाला अग्रक्रम देणारे संत गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेणगावयेथे १८७६ साली झाला. त्यांच्या आईचे नाव सोनूबाई ऊर्फ सखूबाई होते. त्यांचे वडील अडाणी व व्यसनी होते. व्यसनामुळेच ते निधन पावले आणि छोटा डेबू लहानपणीच पितृसुखाला पारखा झाला. अन्य कोणाचा आधार नसल्याने आईला छोट्या डेबूला घेऊन वडिलांकडे दापुरेयेथे जावे लागले. डेबूचा मामा दापुरे गावातील बऱ्यापैकी  शेती असणारा शेतकरी होता. मामाच्या गोठ्यातील गुरे सांभाळण्याचे काम डेबू करू लागला. दिवसभर गाई-गुरे राना-वनात चरावयास सोडून सर्व गुराखी मुले एकत्र खेळत, भाकरतुकडा खात व गाणी म्हणत. इथेच डेबूला संत तुकारामांच्या अभंगाची ओळख झाली व रोज रात्री गावातील मंदिरात होणार्या भजनात डेबू रंगून गेला. थोडा मोठा होताच मामाने आपल्या शेतीच्या कामाची सर्व जबाबदारी डेबूवर सोपविली. आई व मामाने १९१२ साली डेबूचे लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव कुंताबाई. त्यांना एक मुलगा व एक मुलगीही झाली. कर्जबाजारीपणामुळे खंगून मामाचे अकाली निधन झाले. डेबूच्या व त्याच्या आईच्या नशिबी एक नवे संकट आले. डेबूचे मन मुळातच संसारामध्ये रमणारे नव्हते. त्यांना पंढरीच्या नामभक्तीची विलक्षण ओढ लागली होती. अखेर एके दिवशी ते घर सोडून निघून गेले.

गृहत्याग केल्यानंतर त्यांनी सतत देशभर भटकंती केली. गरिबांची सुखदु:खे अगदी जवळून अनुभवली. समाजातील अडाणीपणा, शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धेचा प्रभाव या अनिष्ट गोष्टींच्या निर्मूलनार्थ कार्य करण्याचा मनोमन संकल्प करून कीर्तनाद्वारे समाज जागृतीचा श्रीगणेशा केला.

कर्ज काढू नका, व्यसनांपासून दूर राहा, देवाच्या नावाने कोंबड्या-बकऱ्यांचे बळी देऊ नकागाव स्वच्छ ठेवा, मुलांना शिक्षण द्या,’ असा त्यांनी कीर्तनातून गावोगाव उपदेश केला. हातात झाडू घेऊन ते प्रथम सर्व गाव झाडून स्वच्छ करीत व मगच त्या गावात रात्री कीर्तन करीत. त्यांच्या अंगावर ठिगळाचा वेष असे आणि हातात मातीचे पसरट गाडगे असे. या गाडग्यातच ते भिक्षा घेत. या गाडग्यातच पाणी पित व रिकामे गाडगे डोक्यावर पालथे घालून हिंडत. म्हणूनच लोक त्यांना गाडगे महाराजम्हणत होते. त्यांची कीर्तने म्हणजे केवळ संतवचनांची निरूपणे नव्हती, तर श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी प्रबोधने होती.

कोणत्याही गावात गाडगे महाराज एक-दोन दिवसांपेक्षा अधिक राहत नव्हते. त्यांनी आळंदी, देहू, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर येथे जमणाऱ्या लाखो गरीब भाविकांचे हाल पाहिले व त्या-त्या क्षेत्री एकेक धर्मशाळा बांधून वारकरी बांधवांची निवाऱ्याची सोय केली. त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या, पण स्वत: मात्र बाहेर,उघड्यावरच राहिले. त्यांचा नि:स्पृहपणा, त्याग, वैराग्यवृत्ती, सारेच विलक्षण व आदर्श होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजकार्याबद्दल गाडगे महाराजांना विशेष आस्था होती. या दोघांनाही त्यांनी वेळोवेळी सहकार्य दिले. भाऊराव पाटील व आंबेडकर यांच्या मनात गाडगे महाराजांविषयी अपार श्रद्धाभाव होता. डॉ. आंबेडकरांनी दलित बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वी गाडगे महाराज यांच्याशी विचार-विनिमय केला होता. या चर्चेमुळेच डॉ. आंबेडकर यांनी इस्लाम आदी अन्य धर्मांमध्ये प्रवेश न करता भारतीय भूमीत जन्मलेल्या बौद्ध धर्मात प्रवेश केला. प्रबोधनकार ठाकरे यांच्याशीही गाडगे महाराजांचे निकटचे संबंध होते. १९४९ साली गाडगे महाराज आजारी पडले.

औषधोपचाराची टाळाटाळ व सततचा प्रवास, कीर्तने यांमुळे त्यांचा आजार बळावत गेला. ८ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांनी मुंबईतील वांद्रे येथे अखेरचे कीर्तन केले. १२ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांनी पंढरीची अखेरची भेट घेतली.

डॉ. आंबेडकरांच्या निधनाचे वृत्त ऐकून ते अस्वस्थ झाले. १९ डिसेंबरला ते चांदूर बाजार येथे आले व गंभीर आजारी पडले. तेथून त्यांना अमरावतीला नेण्यात येत असताना अमरावतीच्या जवळच त्यांचे निधन झाले. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर तेराव्या दिवशी गाडगेबाबांचे निधन झाले. आज त्यांनी स्थापन केलेल्या धर्मशाळा व ट्रस्ट त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवीत आहेत. गाडगेबाबा यांनी ना कोणताही मठ स्थापला, ना गादी निर्माण केली, ना कोणी शिष्य केला. हेच गाडगे महाराज यांच्या समाजकार्याचे वेगळेपण होते.

  विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].