Skip to main content
x

जगताप, बाबूराव गणपत

      बाबूराव गणपतराव जगताप यांचा जन्म पुणे येथे  झाला. दुर्दैवाने १८९७ च्या प्लेगच्या साथीत त्यांचे आईवडील व बहीणभावंडे सर्वजण दगावले. पोरक्या झालेल्या बाबूला चुलते रावबहाद्दूर रामा पांडू यांनी आधार देऊन पदवीधर केले. नू. म. वि. व फर्गसन महाविद्यालयामध्ये शिकताना त्यांनी चित्रकला व क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळविले. बालपणापासून त्यांचे आराध्यदैवत व मार्गदर्शक होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. पुण्याच्या पूर्वभागात राहणाऱ्या कष्टकरी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून महर्षींच्या व लक्ष्मणपंत ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबूरावांनी विद्यार्थीदशेतच आपले शैक्षणिक कार्य सुरू केले. उदा. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके मिळवून देणे, वाचनालय चालविणे, विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणे इत्यादी. त्यातूनच ‘मराठा स्टुडंटस् ब्रदरहुड’ व ‘महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ’ या संस्था स्थापन झाल्या. त्यांनी उशिरा १९२८ मध्ये मुंबईतील ‘सेकंडरी टीचर्स ट्रेनिंग विद्यालया’मधून बी. टी. पूर्ण केले.

     बी. ए. झाल्यानंतर चुलत्याच्या आग्रहामुळे त्यांनी नाशिक येथे पोलिस प्रशिक्षण घेतले. नंतर ते दोन वर्षे बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे ए. डी. सी. (शरीर रक्षक) होते, पण शिक्षण व समाजसेवेची त्यांना मुळातच आवड असल्यामुळे ते बडोद्यात रमले नाहीत.

     चांगली मानाची नोकरी सोडून ते पुण्यात आले आणि बाबूरावांनी सन १९१८ मध्ये शुक्रवार पेठेत अवघ्या तीन मुलांना मिळवून एका खोलीत ‘श्री शिवाजी मराठा शाळा’ सुरू केली. शाळेसाठी त्यांनी ‘बहुजन समाजाच्या उन्नतिप्रीत्यर्थ’ हे ध्येयवाक्य निवडले. सुरुवातीच्या काळात शाळेची स्वच्छता, घंटा देणे या सारख्या गोष्टीसुद्धा अध्यापनाबरोबर केल्या. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून आणि स्वत: आर्थिक हानी सहन करून त्यांनी श्री शिवाजी मराठा शाळेला नावारूपाला आणले. या निरपेक्ष कार्यातील त्यांची तळमळ व कष्ट बघून समाजाने त्यांना सहकार्याचा हात दिला. म्हणूनच ते ‘श्री शिवाजी मराठा शाळे’ चे संस्थापक ठरतात. लवकरच काही ध्येयवादी तरुण एकत्र येऊन त्यांनी ‘श्री शिवाजी मराठा सोसायटी’ स्थापन केली. तिची आर्थिक मदत शाळेला झाली. ‘श्री शिवाजी मराठा सोसायटी’ची अशी एखादी शाळा असावी असा सोसायटीचा विचार झाल्यामुळे बाबूरावांचे ‘श्री शिवाजी शाळा व सोसायटी’ या दोन्ही संस्था एक झाल्या. त्यामुळे सर्वांच्या शिक्षणकार्याला गती मिळाली.

     विद्यार्थ्यांचा विकास चांगला माणूस म्हणून होण्याच्या दृष्टीने त्यांनी शाळेत अनेक संस्कारक्षम उपक्रम सुरू केले. त्या उपक्रमांतून त्यांनी पुण्याच्या पूर्व भागातील बहुजन समाज घडविला. त्यांच्या शिक्षणकार्याला समाजभूषण अप्पासाहेब जेधे व राजर्षी शाहू छत्रपती यांनी मनापासून साथ तर दिलीच पण आर्थिक मदतही केली. त्यांच्या कार्याची वैचारिक पार्श्‍वभूमी भक्कम मूल्यसंस्काराच्या पायावर आधारलेली होती. म. गांधीजींबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर होता. ते दररोज दोन तास चरख्यावर सूत कातत, कातलेल्या गुंड्या देऊन कापड विणून घेत. त्याच कापडातून सदरा, विजार शिवून घेत. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी चरख्याची सोबत सोडली नाही. दर रविवारी स्पृश्य-अस्पृश्य जातीची अनेक कुटुंबे एकत्र येऊन प्रार्थना समाजाची उपासना व नंतर सहभोजन करीत. षट्यब्दीपूर्ती सत्कार समारंभात त्यांना एकसष्ट हजारांची मिळालेली थैली त्यांनी परत करून ‘गांधी ट्रेनिंग कॉलेज’च्या इमारती बांधण्यासाठी ती खर्च करावी अशी इच्छा व्यक्त केली. उच्च दर्जाच्या नैतिक मूल्यांचा अंगीकार हा त्यांच्या जीवनाचा स्थायिभाव होता.

     ‘श्री शिवाजी मराठा शाळा’मध्ये शिक्षक व मुख्याध्यापक या भूमिका काटेकोरपणे सांभाळत असताना शिक्षणाला पूरक असे अनेक उपक्रम त्यांनी चालू केले. शिक्षकांना त्यांच्या अध्यापनकार्यात मार्गदर्शन करणारे ‘शिक्षक’ हे मासिक १९२० साली सुरू करून ते चव्वेचाळीस वर्षे चालविले. इ. १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मन्वंतर वाचनमाला’ संपादित केली. याशिवाय ‘टॉलस्टॉयच्या गोष्टी’, ‘भारतीय शिक्षणाचा इतिहास’, ‘शाळा कशी चालवावी’, ‘माझी शाळा’ इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

     ‘पुणे जिल्हा स्कूलबोर्डा’चे अध्यक्ष, ‘प्रार्थना समाजा’चे अध्यक्ष, बालवीर चळवळीत पुणे जिल्ह्याचे ‘आयुक्त  लोकशिक्षण समिती’चे अध्यक्ष, ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदे’चे अध्यक्ष, कोल्हापूर संस्थानचे प्रमुख शिक्षणाधिकारी, ‘गारगोटी शिक्षण संस्थे’चे कार्यकारी अधिकारी, ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’च्या कारभारी मंडळात सदस्य, ‘क्रमिक पुस्तक समितीचे सल्लागार, पुण्याचे महापौर, जातिनिर्मूलन संस्था, प्रार्थना समाज प्रौढ साक्षरता व पालकशिक्षक संघ इ. अनेक संस्थांत त्यांनी निरनिराळ्या कालावधीत मूल्याधिष्ठित कार्य करून आपला ठसा उमटविला. पुण्याच्या महापौरपदी असताना कोणत्याही कार्यक्रमाला ते पायी जात व वेळेपूर्वी तेथे हजर राहत, त्यामुळे म.न.पा. च्या कारभाराला शिस्त लागली. शेवटपर्यंत कार्यमग्न असताना गुरूवर्य बाबुराव जगताप यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.

- प्रा. राजकुँँवर ग. सोनवणे

जगताप, बाबूराव गणपत