Skip to main content
x

जगताप, सुधीर रामराव

              सुधीर रामराव जगताप यांचा जन्म शेतकरी कुटुंबात जऊळका गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जऊळका या गावी झाले व माध्यमिक ते विज्ञानशाखेचे शिक्षण अमरावती येथे झाले. त्यांनी अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातून कृषीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अकोला येथील डॉ. पं.दे.कृ.वि.तून एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांनी १९७० ते १९८० या दशकात स्नातकोत्तर पदवी असूनही कृषी तंत्रज्ञान वापरून शेती करण्याचे ठरवले.

               जगताप यांनी १९७५मध्ये धामणगाव रेल्वे येथे कृषी सेवा केंद्र स्थापन केले. याद्वारे शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी खते व कीटकनाशके यांचे खरेदी-विक्री केंद्र स्थापन केले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, म्हणून शेतकरी मेळावे आयोजित केले. त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा बागांविषयी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘संत्री जगवा व झाडे सुधारा’ हे अभियान जिद्दीने राबवले. त्यांचे मौलिक मार्गदर्शन मिळत असल्यामुळे संत्रा बागायतदारांना लक्षणीय आर्थिक लाभ झालेला आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची नोकरी न करता प्रगत शेती करून एक प्रयोगशील शेतकरी व उद्योजक म्हणून जगाला स्वतःची ओळख  करून दिली.

                 कलमे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावयाची हे नवीन तंत्रज्ञान त्यांनी  शेतकऱ्यांना शिकवले. संत्र्याची कलमे कोणत्या खुंटावर तयार केलेली आहेत याची माहिती घ्यावी व संत्रा कलमाचे डोळे बांधण्याचा कार्यक्रम कोणत्या रोपवाटिकेत झालेला आहे; हे पाहावे असे त्यांनी शेतकऱ्यांना सूचवले. संत्र्यांची कलमे विकत घेताना ती प्रमाणित रोपवाटिकेमधूनच घ्यावीत हे कळकळीने सांगितले व संत्र्यांचे डोळे भरताना खुंटावर किती उंचीवर लावले आहेत हे पाहण्यास सांगितले. जर संत्रा कलम खुंटावर अगदी खालच्या बाजूला डोळे भरले गेले तर संत्रा बागेमध्ये डोळे भरलेली जागा जमिनीत जाईल आणि संत्र्याच्या झाडाऐवजी खुंटाचीच वाढ जास्त होईल, हे त्यांनी आवर्जून शेतकऱ्यांना सांगितले.

               जगताप यांनी १९९८मध्ये अमरावती येथे अ‍ॅग्रो एंटरप्रायजेस प्रा. लि. कंपनी स्थापना केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदारांना पिकावरील कीड निवारणार्थ, रोग निवारणार्थ मार्गदर्शन केले आणि भारी जमिनीमध्ये कशा प्रकारे झाडे जगवायची व संत्री वाढवायची हे अभियान सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना  मोलाची मदत झाली.

 -  प्रा. चंद्रशेखर मधुकर देशमुख

जगताप, सुधीर रामराव