Skip to main content
x

जोग, केशव पांडुरंग

संस्कृतचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असा लौकिक मिळविलेल्या केशव पांडुरंग जोग यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले आणि त्यांना ह.दा. वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदविभागातील संशोधनाकरिता मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट १९६५ मध्ये मिळाली. विद्यार्थिदशेत त्यांना दक्षिणा शिष्यवृत्ती’, ‘अक्षीकर शिष्यवृत्ती आणि सुवर्णपदक’, ‘भाऊ दाजी लाड सुवर्णपदकअसे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. सुरुवातीस मुंबई येथील खालसा महाविद्यालय (१९५०-५४), कीर्ती महाविद्यालय (१९५४-६१) येथे संस्कृतचे अध्यापन केल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटविला. त्यानंतर त्यांनी डेक्कन महाविद्यालयाच्या वैदिक संस्कृत विभागाचे प्राध्यापकपद भूषविले. त्यांनी डेक्कन महाविद्यालयाच्या कोश प्रकल्पाच्या प्रधान संपादकपदाची धुरा वाहिली (१९८०-८५). त्यांच्या विविधांगी आणि चिकित्सक संस्कृत ज्ञानामुळे विद्यापीठ आयोगाने राष्ट्रीय व्याख्याताम्हणून त्यांचा गौरव केला होता. त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या म.. काणे संशोधन संस्थेचे मानद निदेशकपद आणि भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक संशोधन विभागाचे प्रमुखपद भूषविले (१९९०-९२).

डॉ. जोग यांनी वेद, अलंकारशास्त्र, अभिजात संस्कृत वाङ्मय, सांख्य, वेदान्त दर्शन आणि प्राकृत अशा सर्वच विषयांत चौफेर आणि विपुल संशोधनपर लेख लिहिले आणि भारतीय विद्येच्या विविध अंगांवर त्यांनी अधिकारवाणीने व्याख्याने दिली.

मुंबई विद्यापीठाची संस्कृत आणि अर्धमागधी अभ्यासक्रमाची पुस्तके त्यांनी सटीप संपादित केली. त्यांच्या एकंदर सोळा प्रकाशित/संपादित पुस्तकांमध्ये सुरेश्वरांच्या वार्तिकांवरील मूलभूत संशोधनपर अशा नऊ पुस्तकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याशिवाय त्यांचे साठाच्यावर संशोधनपर लेख आणि जवळजवळ चाळीस पुस्तक परीक्षणे आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झालेली आहेत.

विद्यार्थ्यांचे ते केवळ गुरू आणि मार्गदर्शकच नव्हते, तर त्यांचे हितचिंतक मित्रही होते. आपल्या चिकित्सक अभ्यासू वृत्तीने आणि शिष्यांबद्दल वाटणाऱ्या आस्थेने त्यांनी केवळ भारतीयच नव्हे, तर अनेक विदेशी विद्यार्थ्यांनाही आकृष्ट केले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतचा अभ्यास करण्याची नवी दृष्टी देऊन त्यांनी त्यांना लिहिते केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अकरा विद्यार्थ्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळविली. एक उत्तम संस्कृत शिक्षक आपल्यामागे कसा वारसा निर्माण करतो याचा वस्तुपाठ जोग सरांनी घालून दिला.

  डॉ. परिणीता देशपांडे                                                                         

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].