Skip to main content
x

जोग, विष्णुबुवा नरसोपंत

     विष्णुबुवा नरसोपंत जोग यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या मातु:श्रींचे नाव सरस्वती होते. त्यांना भगवंत (पिलोबा), गोपाळ (गुण्याबोवा), पांडोबा, विष्णुबुवा आणि यमुना ही पाच अपत्ये होती. पांडोबा हे मल्ल असल्यामुळे विष्णुबुवांनाही मल्लविद्येचा छंद होता. पुण्यात कोणतीही मोठ्या जोडीची कुस्ती ठरली की तिचे पंच म्हणून बुवांची नेमणूक लोक आग्रहाने करत असत. 

     बुवांचे शालेय शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांना इंग्रजी फारसे येत नव्हते. पांडोबा महाराज बुवांना नेहमी आळंदीला आणत असल्यामुळे तेथे येऊन ज्ञानेश्वर माउलींच्या पायांवर डोके ठेवण्याचा त्यांना छंद लागला. त्यांनी माउलींच्या समाधीवर तुळशीमाळ ठेवून आपल्या गळ्यात घातली होती. यापरता दुसरा गुरू त्यांनी केला नाही. बुवांनी अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायणे केली. त्यानंतर भंडारा डोंगरावर जाऊन तुकाराम गाथेची पारायणे केली. त्यांना संत वाङ्मयाची आवड होती आणि त्यांनी संत-साहित्याचा चांगला अभ्यासही केला. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले. नाना महाराज साखरे यांच्याकडे त्यांनी सांप्रदायिक पद्धतीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, तसेच श्री. केशवानंद उदासी यांच्याकडून शंकराचार्यांचे शारीरभाष्य समजावून घेतले.

     विष्णुबुवांचा स्वभाव अत्यंत तापट होता. ते स्वतःच आपणांला नरसिंहाचा अवतार म्हणत. त्यांच्या या कडक स्वभावामुळे त्यांचा शिष्यवर्ग त्यांना फार भीत असे.

     बुवा जसे तापट होते, तसेच ते निःस्पृह व निर्भीडही होते. कोणापुढे याचना करायची नाही व कोणी काही आणून दिले तरी ते घ्यायचे नाही, असा त्यांचा बाणा होता. बुवांचे कीर्तन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असायचे. ते कीर्तनाला उभे राहिले म्हणजे त्यांच्यामागे शे-दीडशे टाळकरी उभे राहत. खेडेगावांतून दहा-दहा कोसांवरून मुला-बायांसहित गावकरी गाड्या भरभरून येत असत. त्यांच्या कीर्तनाचा परिणाम तात्कालिक नसे. श्रोत्यांच्या मनांवर कायमचा ठसा उमटून त्यांची वृत्ती परमार्थाकडे वळत असे. ज्ञानेश्वरीचे उत्कृष्ट प्रवचनकार आणि वारकरी पद्धतीचे श्रेष्ठ कीर्तनकार अशी त्यांची ओळख होती.

     तुकाराम गाथेत सर्वच अभंगांची सरमिसळ असल्यामुळे कोणता अभंग कशासंबंधी याचा मागोवा घेणे अशक्य झाले होते. ही कोंडी फोडण्यासाठी विष्णुबुवांनी तुकाराम गाथेचे वर्गीकरण करून १९०१ साली त्र्यंबकराव आवटे यांच्याकरवी ती गाथा प्रकाशित केली. तुकाराम महाराजांचे अभंग दिसायला सोपे, पण अर्थ लावायला तितकेच कठीण आहेत. तेव्हा बुवांनी १९०९ साली तुकाराम महाराजांच्या अभंगांची सार्थ गाथा प्रकाशित केली. याशिवाय बुवांनी सार्थ अमृतानुभव (१९०५), निळोबा व ज्ञानेश्वर महाराजांची वर्गीकृत गाथा (१९०७), सार्थ हरिपाठ-चांगदेवपासष्टी, एकनाथी भागवतादि सहा ग्रंथ (१९११), वेदान्तविचार (१९१५), महिपतिकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७) इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले. ग्रंथ संपादनासाठी त्यांनी एक कवडीसुद्धा घेतली नाही. हे सर्व कार्य त्यांनी बहुजनहिताय दृष्टीनेच केले.

     वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीर चालावे आणि त्यासाठी कार्यकर्ते तयार करावेत, या हेतूने बुवांनी १९१७ मध्ये आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आज त्या इवल्याशा रोपाचा विस्तार महाराष्ट्रभर झाला आहे.

     पुढे १९२० साली कार्तिक महिन्यानंतर त्यांची तब्येत बरी राहत नसे. त्यांना रात्र-रात्र खोकल्यामुळे झोप येत नसे. त्यांची औषधांवर फारशी भिस्त नसल्यामुळे ते औषधे घेत नसत. माघ शुद्ध दशमी जवळ आल्यावर बुवा आळंदीला जाण्याबाबत बोलू लागले. घरच्यांचा विरोध पत्करून माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच सोनोपंत दांडेकरांना त्यांनी आपल्याला आळंदीस नेण्यास सांगितले. विष्णुबुवा बैलगाडीतून आळंदीस पोहोचल्यानंतर त्यांनी गुरु प्रतिपदेला आपला देह ठेवला. त्यांची समाधी इंद्रायणीकाठी आहे.

     त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले होते की, ‘‘माझी ही ब्रह्मचाऱ्याची तुळशीची माळ मी कोणाच्या गळ्यात घालू?’’ त्यावेळी सोनोपंत दांडेकर यांनी ती माळ स्वीकारली व तेही आजन्म ब्रह्मचारी राहिले.

- डॉ. वि.य. कुलकर्णी

- दीपक हनुमंत जेवणे

जोग, विष्णुबुवा नरसोपंत