Skip to main content
x

जोगळेकर, प्रभाकर काशिनाथ

    प्रभाकर काशिनाथ जोगळेकर यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. कर्नाटकातील राणीबेन्नुर येथे त्यांचा दवाखाना होता व ते १९४१ ते १९४७ या काळात सैन्यात मेडिकल डिव्हिजनला होते. प्रभाकर जोगळेकर यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सांगलीला विलिंग्टन महाविद्यालयात व पुणे येथील वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांच्या मनात सैन्यात जाण्याची आवड वडिलांमुळे निर्माण झाली होती. त्या प्रभावामुळे जोगळेकर हे राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये रुजू झाले.

     वाडिया महाविद्यालयामधून बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर जुलै १९४९मध्ये सैन्यात त्यांची निवड झाली व प्रशिक्षणासाठी त्यांना डेहराडूनला पाठवण्यात आले. तेथे दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यावर जोगळेकर यांची ‘कोअर ऑफ सिग्नल्स’मध्ये (आर्मी कम्युनिकेशन बँ्रच) सेकंड लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली.

     १९५१मध्ये त्यांची पहिली नियुक्ती सिग्नल रेजिमेंटला झाली. बिनतारी व दूरध्वनी आणि इतर पद्धतीने सैन्याची संपर्कयंत्रणा सांभाळणे हे त्यांच्या रेजिमेंटचे काम होते. काश्मीरनंतर पंजाब, आसाम, झाशी अशा ठिकाणी त्यांनी काम केले. १९६५मध्ये ते कमांडर झाले. १९६९मध्ये प्रभाकर जोगळेकर यांना लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळाली. अर्थात ही नियुक्तीही सिग्नल रेजिमेंटमध्येच होती. १९७१ मधील भारत-पाक युद्धाच्या वेळी ते ‘सिग्नल डायरेक्टोरेट’मध्ये मुख्य समन्वयक या पदावर दिल्लीतील सेना मुख्यालयामध्ये कार्यरत होते. त्यानंतर १९७८मध्ये ब्रिगेडियर पदावर पुण्यातील दक्षिण विभाग मुख्यालयामध्ये चीफ सिग्नल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

     त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज येथे पदवी घेतली. त्यानंतर १९८०मध्ये ब्रिगेडियर असताना नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

     त्यानंतर दिल्लीत सेना मुख्यालयात ते १९८४मध्ये मेजर जनरल म्हणून सुरुवातीला डेप्युटी सिग्नल ऑफिसर इन चीफ या हुद्द्यावर काम करत होते. जोगळेकर यांना एका वर्षाने डेप्युटी कोड मास्टर जनरल हा हुद्दा मिळाला व डिसेंबर १९८६मध्ये ते तिथूनच निवृत्त झाले.

     १९८६च्या जानेवारीमध्ये त्यांना त्यांच्या सैनिकी सेवेसाठी ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.  ह्या दोन युद्धांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

     निवृत्त झाल्यानंतर ते चार वर्षे गुजरातमध्ये अ‍ॅन्टिफ्रिक्शन बेअरिंग्ज कॉर्पोरेशनमध्ये जनरल मॅनेजर या पदावर काम करत होते.

     १९९१पासून त्यांचे पुण्यात वास्तव्य आहे. मेजर जनरल जोगळेकर सैन्यात असताना हॉकी आणि बास्केटबॉल खेळत असत. त्यांना स्क्वॉश, टेनिस व गोल्फ या खेळांचीही आवड आहे.

    - रूपाली गोवंडे

जोगळेकर, प्रभाकर काशिनाथ