Skip to main content
x

जोगळेकर, प्रमोद प्रभाकर

     दाशिव आत्माराम जोगळेकर यांचा जन्म बेळगाव येथे झाला. ते आठ वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांचे वडील डॉक्टर झाले आणि त्या व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा प्रयास करीत होते. त्यांना संगमनेर हे गाव योग्य वाटल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह केल्यानंतर तिकडे प्रयाण केले. सदाशिव यांचे आजोबाही डॉक्टरच होते. त्यांच्याजवळच वडिलांनी छोट्या सदाशिवला ठेवले होते. आजोबांचा ग्रंथसंग्रह समृद्ध होता आणि सदाशिवला वाचनाची खूप आवड होती.

     आजोबांच्या मृत्यनंतर सदाशिव एकाकी झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी वडिलांनी पुण्यास पाठविले. डेक्कन महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण पार पडले. शिकत असतानाच पुण्यातील प्राध्यापक चिंतामण गंगाधर भानू यांची कन्या शांताबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. जोगळेकरांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पत्नीला तिच्या सासरी म्हणजे संगमनेरलाच ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्नीला पुण्यात आणले व ते तेथेच स्थायिक झाले.

     जोगळेकर पेशाने वकील होते. तथापि लहानपणापासून त्यांचा ओढा साहित्याकडेच होता. ‘मॅझिनीची जीवन कहाणी’ आणि ‘मानवी कर्तव्ये’ या नावाने भाषांतराचा संग्रह प्रकाशित करून त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली.

     आरंभीच्या काळात अनेक नियतकालिकांशी ते संबंधित होते, पण लेखक आणि संपादक म्हणून त्यांचा बोलबाला झाला तो ‘यशवंत’ या मुख्यत: कथा साहित्याला वाहिलेल्या मासिकाचे त्यांनी संपादकत्व पत्करल्यावर. अखेरच्या काळात त्यांनी उत्तम रहस्यकथाही लिहिल्या. किंबहुना मराठीतील रहस्यलेखनाचे ते जनक मानले जातात. कारण यशवंत मासिकाचे संपादक असताना त्यांनी ‘चार आणे माला’ च्या माध्यमातून अनेक डिटेक्टिव्ह कथांची भाषांतरे करून ती पुस्तकरूपाने प्रकाशित केली होती. ‘घारापुरी’, ‘देवगिरी’ आणि ‘सह्याद्री’ यावर त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन केले. त्यांनी संपादित केलेली ‘गाथा सप्तशती’ हा संपादनाचा आदर्श वस्तुपाठ समजला जातो. त्यातून त्यांचे पांडित्य आणि चिकित्सक वृत्तीचे खोल दर्शन घडले. या ग्रंथाचा अभ्यास करताना त्यांनी अर्धमागधी भाषा शिकून घेतली होती.

     संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे. त्यातील कथा अतिशय वेधक आहेत. ‘सूर्यफूल’ हा त्यांचा इतर कथांचा आणखी एक संग्रह, त्यांच्या मरणोत्तर तो प्रकाशित झाला.

     जोगळेकर उत्तम फोटोग्रफरही होते आणि दिलरुबा नावाचे वाद्यही उत्तम वाजवत असत. कामाच्या निमित्ताने त्यांनी कांजीवरमपासून पेशावरपर्यंत प्रवास करताना शेकडो प्राचीन नाणी जमवली व त्यांचा उत्तम संग्रहही केला होता.

      — संपादित 

जोगळेकर, प्रमोद प्रभाकर