Skip to main content
x

जोसेफ, डॅनिअल ट्रेव्हेलिन

          जोसेफ डॅनिअल ट्रेव्हेलिन यांचा जन्म तामिळनाडू मधील तुतिकोरीन या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पॉल सॅम्युएल जोसेफ होते. मदुराईमध्ये लहानपण गेल्यानंतर मद्रास विद्यापीठातून १९६६ मध्ये इंग्रजी या विषयात एम.ए.ची पदवी मिळविली. पुढे ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातून १९८५ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले. शालेय, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणातही ते कायमच प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
    दोन वर्षे मदुराई येथील एस.व्ही.एन. महाविद्यालयात व्याख्यात्याची नोकरी केल्यानंतर १९६७-६८ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. उत्तीर्ण झाल्यानंतर जोसेफ यांना महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले. एक वर्ष मसुरी येथे प्रशिक्षण घेतल्यावर ते सातारा येथे पुढील प्रशिक्षणासाठी रुजू झाले व नंतर त्यांची नियुक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. १९७२ मध्ये जोसेफ यांचा विवाह सिलका यांच्याशी झाला.
    १९७३ मध्ये त्यांची बदली अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात करण्यात आली होती, परंतु त्याच वर्षी ते सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून साताऱ्यात परत आले. आणीबाणीच्या वेळेस १९७५ मध्ये त्यांची नियुक्ती कोल्हापूर येथे झाली होती. त्यांच्या तेथील चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी मागासवर्गीय लोकांना जमीन मिळवून देणे, पाटबंधारे खात्याची बाकी रकमेची वसुली, कुटुंबनियोजनासाठी शिबीर यासारख्या कामांसाठी प्रयत्न केले.
   शाहू ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी ‘शाहू स्मारका’चे बांधकाम करवून घेतले तसेच कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आयुक्त असताना ‘महाराणी ताराबाईं’चा पुतळा उभारला.
      १९७९ मध्ये कोल्हापूरहून जोसेफ यांची कोकण विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून मुंबई येथे बदली झाली. त्या काळात सावंतवाडीजवळ त्यांनी रबरच्या झाडांची लागवड केली. काही काळ त्यांनी योजना मंत्रालयात रोजगार हमी योजनेवरही काम केले. त्याच काळात योजना मंत्रालयाचे मुख्य सचिव परांजपे यांच्या सहकार्याने ‘जलविभाजन’ क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली.
     १९८३ मध्ये जोसेफ यांची नियुक्ती मुंबई विद्यापीठात परीक्षा विभागाकडे लक्ष देण्यासाठी झाली. त्यांनी उत्तरपत्रिकेची केंद्रवर्ती तपासणी (सेंट्रलाइज्ड असेसमेन्ट) सुरू केली.
     त्यानंतर त्यांची बदली मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तेव्हा मुंबई शहर व उपनगर म्हणून एक जिल्हा मानला जायचा. त्याचे विभाजन होण्याआधीचे ते शेवटचे जिल्हाधिकारी होत. त्यानंतर जोसेफ यांना पुढील शिक्षणासाठी ब्रिटनमधील मँचेस्टर या विद्यापीठात पाठविण्यात आले. १९८५ मध्ये ते अर्थशास्त्रातील पदवी घेऊन, परत येऊन सार्वजनिक आरोग्य खात्यात संयुक्त सचिव म्हणून रुजू झाले. ज्या दिवशी त्यांची आरोग्य खात्यात नियुक्ती झाली त्या दिवसापासून त्यांनी धूम्रपान पूर्णपणे बंद केले, हे विशेष होय. ऑगस्ट १९८७ मध्ये मुंबई पोलीस कायदा, १९५१ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा ठरवण्यात आला. त्याचे श्रेय जोसेफ यांनाच जाते. तसेच त्यांनी टाटा स्मारक रुग्णालयाबरोबर कर्करोग नियमन कार्यक्रम राबविला.
    १९८५ च्या सुमारास गर्भाचे लिंगनिदान करून गर्भपात करण्यासाठी गर्भलिंग चिकित्सेचा गैरवापर
  मोठ्या प्रमाणात होत होता. जोसेफ यांनी या विषयाचा अभ्यास करून गर्भलिंग चिकित्सेवर कायद्याने मर्यादा आणल्या. लिंगनिदानासाठी चिकित्सा हा गुन्हा ठरवून १९८८ मध्ये तसा कायदा करण्यात आला. परंतु लोक शेजारच्या गुजराथ राज्यात जाऊन लिंगनिदान करून इकडे परत येऊन गर्भपात करून घेत होते. याला निर्बंध घालण्यासाठी जोसेफ यांनी केंद्रीय आरोग्य खात्यातील अतिरिक्त सचिव मीरा सेठ यांच्या सहकार्याने एक समिती स्थापन केली. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने गर्भलिंग चिकित्साबंदीचा कायदा करण्यात यश मिळविले. १९९४ मध्ये हा कायदा देशभर लागू करण्यात आला.
    १९८९-९० मध्ये जोसेफ यांनी यशदाचे महाव्यवस्थापक म्हणून कार्य केल्यानंतर १९९० मध्ये त्यांची नगर विकास खात्यात सचिव म्हणून बदली करण्यात आली. तेथे त्यांनी मुंबईसाठी विकास आराखडा मान्य करून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. फेब्रुवारी १९९१ मध्ये, जुन्या महत्त्वाच्या इमारतींना वारसाहक्क नियमन लागू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानुसार या इमारतींची प्रतवारी करण्यात आली. नगर विकास आराखड्यासाठी टी.डी.आर.द्वारे महानगरपालिकेला जमीन संपादित करता यावी यासाठीचे नियम जोसेफ यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आले.
     १९९६ मध्ये त्यांची नियुक्ती झोपडपट्टी पुनर्वसन अधिकार विभागाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली. त्यानंतर ‘एसआयसीओएम’ चे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९९ मध्ये जहाज व्यवस्थापनाचे संचालक म्हणून जोसेफ यांची नियुक्ती झाली. ते केंद्र सरकारच्या जहाज व्यवस्थापन मंत्रालयाचे सचिव म्हणून २००५ मध्ये निवृत्त झाले. या त्यांच्या कार्य काळात त्यांनी समुद्रविषयक प्रशिक्षणासाठी खाजगी संस्थांना अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. वल्लारपदम, सेतुसमुद्रम यासारखे प्रकल्प त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले.निवृत्त झाल्यावरही काही काळ या मंत्रालयाच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.

- आशा बापट

जोसेफ, डॅनिअल ट्रेव्हेलिन