Skip to main content
x

जोशी, मालती जनार्दन

संस्थापक

     जनार्दन वामन जोशी तथा बाबूराव जोशी यांचा जन्म देवरूख येथे झाला. त्यांचे वडील वामनराव वकील तर आई यशोदा गृहिणी होत्या. ते ९ महिन्यांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे पुढे वामनरावांची धाकटी बहीण काशी - सौ. यशोदा भिडे यांच्याकडे शिक्षणासाठी बाबूरावांना सोपविण्यात आले. १९१४ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.

    इथेच त्यांची दामोदर छत्र्यांशी भेट झाली. भेटीचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले. ते १९०५ ते १९२१ या काळात पुण्यात होते. पार्वतीबाई आठवले यांचाही निकट सहवास त्यांना मिळाला. त्यांची निष्काम सेवा, दीर्घोद्योग, ध्येयनिष्ठा बाबूराव सतत पाहात होते. रँग्लर परांजपे, प्रा. विनयराव आपटे अशा शिक्षणक्षेत्रातल्या दिग्गजांच्या त्यागमय जीवनाचे अवलोकन ते करत होता. लो.टिळक यांच्या कार्याबरोबर त्या काळात पुण्यात येणारे लाला लजपतराय, अ‍ॅनी बेझंट, श्रीनिवास शास्त्री, दादासाहेब खापर्डे अशा थोर राष्ट्रपुरुषांचे कार्यही त्यांनी जवळून पाहिले. या सर्वांच्या बद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. मार्च १९१८ मध्ये बाबूराव फर्गसन महाविद्यालयामधून बी.ए. झाले.

      रत्नागिरीतील साखरप्याच्या केमकरांची मुलगी आनंदी बाबूरावांच्या जीवनात पत्नी म्हणून आली. बाबूरावांना वडिलांसारखे वकील व्हायचे होते म्हणून ते मुंबईला गेले. बाबूरावांचा एलएल.बी. चा अभ्यास सुरू झाला. टिळकांच्या कार्यात विशेषतः शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले होते. तसेच काही ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होते. त्यांना कोकणासाठी विशेषतः शिक्षण क्षेत्रात काही तरी करायचे होतेे. कोकण त्यातही रत्नागिरीचा शिक्षणनगरी करण्याचा ध्यास बाबूरावांनी त्या वयापासून घेेतला होता.

      पहिल्या पत्नीच्या निधनानंतर बाबूरावांनी अण्णा शेवडे यांच्या मुलीशी मालतीबाईंशी विवाह केला. कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या मालतीबाई गृहविज्ञान घेऊन बी.ए. झाल्या होत्या. १९२३ - २४ मध्ये रत्नागिरीत लोकल बोर्डाची स्थापना झाली. १९२४ साली त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रासाठी रत्नागिरीची निवड केली.  मालतीबाईही त्यात होत्या. मालतीबाई आपला संसार सांभाळत, शेेजारी - पाजारी ओळख वाढवत. स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होत्या. बाबूराव व मालतीबाई यांनी आपल्या राहत्या घरातच १ जानेवारी १९२५ ला महिला विद्यालयाची स्थापना केली. त्या काळातल्या रत्नागिरीला मुलींचे शिक्षण आणि मुलींची शाळा हा बदल सोसणारा नव्हता. मालतीबाईंनी मुलींची शाळा सुरू करून एक क्रांतीच केली. सुरुवातीला अवघ्या तीन मुली घेऊन ही शाळा सुरू झाली.

      संस्थेचे शिक्षणविषयक विस्ताराचे उद्देश नक्की करून ८ ऑक्टोबर १९३३ या दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. बाबूराव संस्थेचे सचिव झाले आणि मालतीबाई महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झाल्या. रत्नागिरीमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची उणीव होती. बाबूरावांची वकिली चांगली चालली होती. पण त्यांना शैक्षणिक प्रसारातून सामाजिक कार्य करण्याची ओढ होती. मार्च १९४२ ला महिला विद्यालयाला मॅट्रिकचे केंद्र झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची योजना त्यांनी कार्यकारी समितीपुढे मांडली आणि २५ सप्टेंबर १९४४ ला बाबूरावांनी महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी विद्यापीठाकडे अर्जही केला. विद्यापीठाने घातलेल्या जाचक अटींचे पालन करून रत्नागिरी क्लबची इमारत विकत घेेतली. गोगटे यांनी दिलेल्या देणगीतून पुढे या महाविद्यालयाला ‘गोगटे महाविद्यालय’ असे नाव देण्यात आले.

     १९२५ मधल्या महिला महाविद्यालयाच्या स्थापनेनंतरही बाबूराव जोशींनी इतरही काही संस्था सुरू केल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी (१९३३), गोगटे जोगळेकर महाविद्यालय (१९४५), रा.ना. शिर्के प्रशाला (१९४८), आर.एस.पाध्ये शिवणकला निकेतन (१९५६), अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय (१९७५), पॅरामेडिकल कोर्सेस (१९९२), श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय (१९९५),

     ल. ग.पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर (१९९५), श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडियम स्कूल (१९९६), बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (१९९६), श्री. एस.वाय.गोडबोले माध्यमिक विद्यामंदिर (२०००), मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर (२००२), गुरुकुल प्रकल्प व्दारा, रा.ना.शिर्के प्रशाला (२००५). असे बाबूराव जोशी यांचे कार्य बहुआयामी आहे.

- राजेश अहिरे

जोशी, मालती जनार्दन