Skip to main content
x

जोशी, नरसिंह महादेव

     नरसिंह महादेव जोशी हे शिक्षणक्षेत्रात ‘नम’ या नावाने प्रसिद्ध आहेत. महादेव आणि अन्नपूर्णा जोशी यांच्यापोटी त्यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे मूळ गाव पाटण तालुक्यातील गारवडे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा व गारवडे येथे झाले. आईवडील फारसे शिकलेले नव्हते. नरसिंह यांची शिक्षणासाठी भ्रमंती सुरू झाली. घरच्या गरिबीमुळे त्यांना काकांकडे रहावे लागले. काकांची रेल्वेत नोकरी असल्यामुळे बदल्या होत. त्यामुळे त्यांचे शिक्षण सोलापूर, जळगाव, सांगली या ठिकाणी झाले. मग मात्र त्यांच्या आईने पुण्याला बिर्‍हाड थाटले. तेही पुण्यात आले. न. म. जोशींचे भटके आयुष्य संपून त्यांच्या जीवनाला स्थिरता आली. पुण्याच्या भावे विद्यालयामध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर एस.टी.सी. व सी.पी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण करून मिरजेला शिक्षकाची नोकरी मिळवली. एक वर्ष तेथे काढून ते पुन्हा पुण्याला आले. पुण्यातही दरवर्षी वेगवेगळ्या शाळेत नोकरी करू लागले. मात्र नोकरी करता करता ते बी.ए. एम. एड. झाले. मग मात्र पुण्याच्या नू.म. वि. शाळेत स्थिर झाले. तेथे त्यांनी चौदा वर्षे अध्यापन केले. हे अध्यापन करीत असताना स्वतःचे अध्ययन सुरूच ठेवले. दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे विद्यापीठात जाऊन एम. ए. पूर्ण केले. मुंबईला जाऊन चार महिन्यांचे इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण घेतले. तसेच सिंधी भाषेचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा प्रकारे मराठी, हिंदी, इंग्रजी व सिंधी भाषांवर प्रभुत्व मिळविले.

     पुढे ते टिळक प्रशिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेही त्यांनी एकोणीस वर्षे अध्यापन केले. पण शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या मुलांना शिकविता शिकविता त्यांनी विपुल साहित्य निर्मितीही केली. बालवाङ्मयामध्ये मुलांसाठी रामशास्त्री प्रभुणे, झाशीची राणी, लालबहाद्दूर शास्त्री, डॉ. होमी भाभा, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इत्यादी थोरांची चरित्रे लिहिली. बालकथांची सात पुस्तके लिहिली. शालेय रंगभूमीला उचित अशी एकांकिकांची सात पुस्तके लिहिली. वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले. त्यात विविध चरित्रकथा, बोधकथा, कौतुककथा यांचा समावेश होता. कादंबरी हा वाङ्मय प्रकार उत्तमप्रकारे हाताळून महात्मा गांधींवरील ‘प्रेषित’, रामशास्त्री प्रभुणेंच्या जीवनावर ‘निःस्पृह’ तर सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी ‘निष्प्रभ’ कादंबरी लिहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन इंग्रजी पुस्तकांचा ‘हिंदुत्वातून कूट प्रश्‍न’ आणि ‘काँग्रेस व गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ हे मराठी अनुवाद केले. वैचारिक वाङ्मयामध्ये ‘पत्रकारांचा शिक्षण विचार’ हा बहुमूल्य वैचारिक ग्रंथ लिहीला. तर त्यांच्या बत्तीस लघुकथा व साठ स्फुटलेख विविध नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत. ‘सकाळ’चे ‘केसरी’, ‘लोकमत’, ‘तरुण भारत’ यासारख्या अग्रगण्य वृत्तपत्रांतून त्यांनी सकस लेखन केले आहे.

     शाळा, महाविद्यालयातून न. म. जोशी यांनी अध्यापनाद्वारे मुलांचे जीवन फुलवले तर लेखनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. अंजन आणि रंजन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मूल्यविचार आणि मूल्यसंस्कार हा त्यांच्या वाणीचा आणि लेखणीचा जीवनधर्म आहे. समाजाने आणि शासनाने दखल घेऊन त्यांच्या कर्तृत्त्वाचा गौरव केला आहे.

     गरिबीतून धडपड करुन नावारूपाला आलेल्या, आदर्श शिक्षक, उत्तम वक्ता, कसदार लेखक, जाणकार शिक्षणतज्ज्ञ म्हणून मान्यता पावलेल्या न. म. जोशी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. २००३ मध्ये पुण्यात (निगडी) भरलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.

     ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरः चरित्र व कार्य’ या ग्रंथाला तसेच ‘जेव्हा देव अवतरतात’ या नाटिकेला आणि ‘पत्रकारांचा शिक्षण विचार’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘मुलांच्या मूल्यकथा’ या ग्रंथास कोल्हापूर साहित्य सभेचा रा. गो. शेवडे पुरस्कार मिळाला आहे. ‘पर्यावरण कथा’ या ग्रंथास किर्लोस्कर फाऊंडेशनचा तसेच संगमनेर येथील अनंत फंदी पुरस्कार मिळाला आहे.

     साहित्य संस्थेमध्येही त्यांनी सहा वर्षे काम केले आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये चिटणीस म्हणून तर अ.भा.मराठी साहित्य मंडळावर कोषाध्यक्ष म्हणून काम केले आहे. डॉ. न. म. जोशी यांची कर्मभूमी पुणे असली तरी व्याख्यानांच्या निमित्ताने आणि पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर मुलाखती देऊन आपली शिक्षणविषयक मते मांडली आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र शाखेमध्ये पीएच. डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले आहे. स्वतःही पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली आहे.

     - दिलीप गरूड

जोशी, नरसिंह महादेव