Skip to main content
x

जोशी, सुरेश दामोदर

    सुरेश दामोदर जोशी यांचे मूळ गाव निपाणी, जिल्हा बेळगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रांतातील असल्यामुळे मराठीबरोबरच कन्नड भाषेचेही संस्कार त्यांच्यावर झाले. एम.ए. (मराठी) आणि बी.लिब. ह्या पदव्या मिळविल्यानंतर त्यांनी धारवाड विद्यापीठामध्ये गुरुवर्य गो.म. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आधुनिक मराठी गद्यशैली’विषयक संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादित केली.

प्रारंभी काही काळ त्यांनी ‘ग्रंथपाल’ म्हणून काम केले. तेथून घेतलेला ग्रंथप्रेमाचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला आहे. देवरूख येथील आठल्ये-सप्रे महाविद्यालयामध्ये आधी मराठीचे प्राध्यापक, नंतर विभागप्रमुख आणि अखेरीस प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी वाङ्मय संशोधन करून पीएच.डी. ही पदवी मिळविली. यांतील दोन विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट मराठी प्रबंधासाठीचे प्रा. अ. का. प्रियोळकर पारितोषिक लाभले.

विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून डॉ. जोशी यांचे सुमारे दीडशे लेख आजवर प्रसिद्ध झालेले आहेत. आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीच्या अनुभवांवर आधारित ‘पंढरीची वारी’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्यामधील ‘अभक्ता’च्या डोळस निरीक्षणांमुळे वेगळे ठरले आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून कोकणातील साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका ‘ऐसी अक्षरे रसिके’ या शीर्षकाखाली प्रसारित झाली होती. या मालिकेचे संहितालेखन डॉ. जोशी यांनी केले होते. वाङ्मयेतिहासातील दस्तऐवज म्हणून हे लेखन महत्त्वाचे आहे.

‘वाङ्मयीन वाद: संकल्पना आणि स्वरूप’ या गो. म. कुलकर्णी गौरवग्रंथाच्या संपादक मंडळात डॉ. जोशी यांचा समावेश होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ‘झपूर्झा’ या त्रैमासिक मुखपत्राचे ते पहिले मुख्य संपादक होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले कार्यवाह म्हणूनही त्यांनी उत्तम संघटनात्मक कार्य केले. अ. आ. देसाई गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित डॉ. जोशी आपल्या व्याख्यानांमधून समाज जागृतीचे कार्य सतत करीत असतात.

देवरूख, जिल्हा रत्नागिरी येथील त्यांचे ‘मानसी’ हे निवासस्थान वाङ्मयप्रेमींसाठी एक आधाराचे स्थान बनलेले आहे.

अत्यंत शिस्तबद्ध रितीने स्वतः वाङ्मय संशोधन करून तो वारसा आपल्या विद्यार्थ्यांकडे संक्रमित करणारे डॉ.जोशी यांचे वर्णन गुरु-शिष्य परंपरेतील ‘एक समर्थ दुवा’ असे करता येईल.

- डॉ. विद्याधर करंदीकर

जोशी, सुरेश दामोदर