Skip to main content
x

जोशी, वासुदेव विनायक

‘फरारी’ (१९४५) या आपल्या लघुकथासंग्रहाच्या प्रस्तावनेत, वासुदेव जोशी म्हणतात ‘मी लघुकथा लिहितो ते केवळ हौस, करमणूक म्हणून. लोकरंजन हीच लघुकथेची अखेरची कसोटी आहे. लघुकथेच्या प्रकाराप्रमाणे, हेतूप्रमाणे, लोकपरिस्थितीप्रमाणे वेळोवेळी, स्थळीकाळी लघुकथेचे तंत्र बदलत असते, आणि म्हणूनच मराठी लघुकथांच्या भोवती भिंती उभारू नयेत.’

‘नाट्यनिबंध’ (१९४२) हा त्यांचा नाट्यविषयासंबंधी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. नाटकातील संगीत, रस आणि राग यांचा संबंध भावगीत, कीर्तन, साधे गाणे, बोलपट, संगीताचे मराठीकरण या विविध विषयांवरील माहिती या लेखांतून त्यांनी मांडली आहे. १९२० पासून त्यांनी स्त्री-पुरुष प्रेमाचे केवळ स्वप्नाळू वृत्तीने वर्णन न करता, यातील अडचणी, फसगती यांकडे लक्ष वेधणारे विषय घेऊन कादंबरी लेखन केले. ‘रोहिणी उर्फ कठीण कसोटी’ (१९२९), ‘जन्माचा बंदिवास’ (१९३१), ‘पराधीन’ (१९३५), ‘ओघळलेले मोती’ (१९३७), ‘न सुटलेले कोडे’ (१९३९), ‘अंतर’ (१९४१), ‘सूड’ (१९४४), ‘दुराचारी’ (१९४६) इत्यादी कादंबर्‍यांतून त्यांनी स्त्रियांचा आर्थिक कोंडमारा, अनौरस संततीचे प्रश्न, मिश्रविवाह, घटस्फोटाची आवश्यकता, लैंगिक समस्या, दांपत्यातील विजोडपणा,  परित्यक्तांचा प्रश्न इत्यादी अनेक कौटुंबिक, सामाजिक प्रश्न मांडले आहेत.

‘स्त्रियांचे हक्क व सुधारणा’ (१९३८), ‘विवाहितांचे नंदनवन’ (१९३८), ‘अविवाहितांचे प्रश्न (१९४०), ‘बदसूर जोडपी’ (१९४२), ‘वैषयिक जीवन’ (१९४७) असे समाजशास्त्रीय स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले आहे. १९२८ साली जोशींनी ‘हिंदू स्त्रियांच्या कायदेशीर हक्कांबद्दल’ जागृती उत्पन्न करणारा ग्रंथ लिहिला. एवढेच नव्हे तर या विषयाचा सतत पाठपुरवाही केला. ‘सनत्कुमार’ (१९३५) हे पौराणिक नाटक त्यांनी लिहिले. ‘रेशमी चिमटे’ (१९३६) हा विनोदी लेखसंग्रह, आणि ‘नरमगरम’ (१९३८), ‘म्हातारपणच्या उलाढाली’ (१९४६) हे विनोदी लेखनही त्यांनी केले आहे.

कौटुंबिक, सामाजिक प्रश्न, तसेच लघुकथा, कादंबरी, नाटक, विनोदी लेखन अशा साहित्याच्या विविध प्रकारांत जोशी यांनी चौफेर मुशाफिरी केलेली दिसते.

- प्रा. मंगला गोखले

जोशी, वासुदेव विनायक