Skip to main content
x

कैकिणी, अशोककुमार श्रीपाद

       शोककुमार श्रीपाद कैकिणी यांनी १९४९मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.एस्सी. (व्हेट.) पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५२पर्यंत मुंबई राज्याच्या पशुवैद्यकीय खात्यात नोकरी केली. त्यानंतर त्यांनी भारतीय पशुवैद्यकीय अनुसंधान संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात विद्याशाखेचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांची १९५९मध्ये आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यांनी रॉयल पशुवैद्यकीय महाविद्यालय, स्टॉकहोम (स्वीडन) येथून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला व एफ.आर.व्ही.सी.एस. ही पदवी प्राप्त केली.

       कैकिणी यांची १९६२मध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय प्रसूतिशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९७५मध्ये ‘बेरारी (वऱ्हाडी -नागपुरी) म्हशींच्या प्रजोत्पादन अवयवांच्या इंद्रिय विज्ञान व विकृतीविषयक अभ्यास व संशोधन’ करून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी एम.एस्सी.च्या ७२ आणि पीएच.डी.च्या ११ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते ‘भारतीय पशुप्रजनन’ नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचे ११० संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक समित्यांवर, तसेच विविध कृषी विद्यापीठांच्या निवड समित्यांवर काम केेले. ते १९८६मध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून निवृत्त झाले.

       डॉ. कैकिणी यांनी अकोला येथील डॉ.पं.दे.कृ.वि.च्या पदव्युत्तर संस्थेमध्ये पशुप्रजननशास्त्र या विषयासाठी पदव्युत्तर अभ्यास विभाग स्थापन केला. त्यांनी वऱ्हाडातील गुरांच्या प्रजननासंबंधी संशोधन व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले. संशोधन कार्यामध्ये बहुउद्देशीय व बहुविभागीय पद्धतींचा अवलंब व्हावा, अशी त्यांची विचारसरणी होती. सेवानिवृत्तीनंतरही नागपूर येथील ‘भारतीय वार्तापत्र’ प्रकाशन संस्थेत डॉ.कैकिणी यांनी दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी विषयतज्ज्ञ व गटनेता या पदांवर काम केले.

- संपादित

कैकिणी, अशोककुमार श्रीपाद