Skip to main content
x

काळे, अक्षयकुमार मल्हारराव

धुनिक मराठी कवितेचे एकनिष्ठ अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणारे अक्षयकुमार काळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील वरूड या गावी झाला. १९६८मध्ये शालान्त परीक्षा व १९७२  मध्ये बी.ए. एवढे शिक्षण वरूड येथेच घेतल्यानंतर १९७४मध्ये ते नागपूर विद्यापीठातून एम.ए.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९७५ साली पीएच.डी. पदवीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह’ या विषयावर प्रबंध सादर करून १९८०मध्ये ते पीएच.डी. झाले. ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’ या ग्रंथामुळे त्यांना १९९९ मध्ये नागपूर विद्यापीठाची डी.लिट. ही सर्वोच्च पदवी मिळाली. धरमपेठ महाविद्यालय नागपूर येथे बरीच वर्षे मराठीचे अध्यापन केल्यानंतर ते नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून काम करू लागले आणि तेथेच जुलै २००२पासून त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून काम करावयास सुरुवात केली. ‘सूक्तसंदर्भ’ (१९८५), ‘गोविंदाग्रज-समीक्षा’ (संपादित १९८५), ‘कविता कुसुमाग्रजांची’ (१९८७), ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’ (१९९९), ‘मर्ढेकरांची कविता- आकलन, आस्वाद आणि चिकित्सा’ (२००६), ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - व्यक्ती आणि वाङ्मय’ (संपादित २००८), ‘ग्रेसविषयी’ (२००९) ही अक्षयकुमार काळे यांची ग्रंथरचना. यांखेरीज त्यांनी निरनिराळ्या नियतकालिकांतून भरपूर समीक्षा लेखन केले आहे. ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’ या ८१५ पृष्ठांच्या ग्रंथात १८८५ ते १९९५ या ११० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील समग्र मराठी काव्यनिर्मितीचा सशास्त्र वेध घेतलेला आहे. समतोल व साधार चिकित्सा आणि रसिकवृत्तीने टिपलेली विविध काव्यसौंदर्यस्थळे हे या ग्रंथाचे महत्त्वाचे विशेष होत. मर्ढेकरांच्या कवितेवरील त्यांचा ग्रंथ मर्ढेकरांचे लौकिक व वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व ज्याप्रमाणे सुस्पष्ट करतो, त्याप्रमाणे  मर्ढेकरांच्या समग्र कवितेची सूक्ष्म चिकित्साही करतो. या ग्रंथाचा उत्तरार्ध मर्ढेकरांच्या सर्वच्या सर्व कवितांचे अर्थनिरूपण, आस्वाद आणि चिकित्सा यांना वाहिलेला आहे.

मर्ढेकरांच्या प्रत्येक कवितेचे विवरण करणारा हा मराठीतील एकमेव ग्रंथ आहे. या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा ‘नरहर कुरुंदकर पुरस्कार’ लाभला आहे. ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’ या ग्रंथाचा गौरव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘रा. श्री. जोग पुरस्कारा’ने झाला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या साकोली येथे भरलेल्या चौथ्या जनसाहित्य संमेलनाचे, तसेच भंडारा येथे झालेल्या नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या चौदाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. वि. भि. कोलते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चंद्रपूर येथील लोकसेवा आणि विकास संस्थेने विशेष पुरस्कार देऊनही त्यांचा गौरव केला आहे.

- प्रा. डॉ. विलास खोले

 

काळे, अक्षयकुमार मल्हारराव