Skip to main content
x

काळे, केशव नारायण

     केशव काळे १९२२ साली मॅट्रिकची परीक्षा, १९२८ मध्ये बी. ए.ची परीक्षा व १९३३ साली कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. पन्नास वर्षे त्यांनी वाङ्मय, नाट्य आणि चित्रपट ह्या क्षेत्रांत स्पृहणीय कामगिरी बजावली. आकर्षक व रुबाबदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या काळे यांनी इंग्रजीवर व संस्कृतवर प्रभुत्व मिळवले होते आणि मराठी तसेच ग्रीक व युरोपिअन रंगभूमीचा सखोल व व्यासंगी अभ्यास केला होता.

     य.गो. जोशी आपल्या अनौपचारिक मुलाखतीत म्हणतात की, के.ना. काळे दिसावयाला दांभिक आणि अहंमन्य वाटतात, पण अनुभवाने मात्र ते निराळे आहेत हे पटते. काळे सतत चिंतन करत असत. ते म्हणाले, “विज्ञानाने मनुष्याला सृष्टीतील शक्तींवर प्रभुत्व दिले, तर कलांनी त्याच्या जीवनात सौंदर्य, सरसता आणि उत्साह यांची भरती केली. त्यामुळे ज्ञानाइतकीच कला हेही मानवी जीवनाचे एक अंग समजणे भाग आहे. म्हणून कलेचे पावित्र्य सांभाळणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.” काळे हे ‘प्रतिभा’ पाक्षिकाच्या संपादक मंडळापैकी एक होते.

    आपल्या ‘स्मरणगंध’ या ग्रंथात डॉ. वि. भा. देशपांडे यांनी के. ना. काळे यांचा ‘मनस्वी नाट्यविमर्शक, एक जबरदस्त नृत्य समीक्षक, अतिशय मितभाषी, मनस्वी’ असा उल्लेख केला आहे. १ जुलै १९३३ रोजी त्यांनी ‘ग्वांटलेट’चे मराठी भाषांतर ‘आंधळ्यांची शाळा’ या नावाने रंगभूमीवर आणले. मराठी प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ या नाटकाने रोवली. १९८३मध्ये ‘नाट्यमन्वंतर’ला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांनी लिहिलेला प्रदीर्घ लेख एक दस्तऐवज ठरला. रंगभूमीला नवे वळण देणारी संस्था फार काळ टिकली नाही हे दुःख त्यांच्या मनात खोल रुतले होते. तशी संस्था, तसे वेगळे कार्य पुण्यात पुन्हा सुरू व्हावे; असे काळे यांना मनोमन वाटे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर काळे आले. प्रभातच्या वातावरणात त्यांचा राबता होता. पु.लं.च्या ‘अंमलदार’ चित्रपटाचे दिग्दर्शन काळे यांनीच केले होते. ‘धर्मात्मा’ चित्रपट चालला नसला, तरी काळे यांच्या अभिनयाची झलक त्यात दिसून आली. त्यांनी ‘म्युनिसिपालिटी’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली आणि आठ चित्रपटांत कामे केली. त्यांना अभिनय, दिग्दर्शन, नाटक, चित्रपट निर्मिती आणि त्यामागील सिद्धान्त या साऱ्यांची पुरेपूर जाण होती. ‘नाट्यविमर्श’ हा त्यांचा ग्रंथ मानला जातो. रशियन लेखक स्टॅनिस्लाव्हस्की याचे दोन ग्रंथ त्यांनी मराठीत आणले. ‘अभिनयसाधना’ आणि ‘भूमिकाशिल्प’ हे ग्रंथ जागतिक स्तरावर मान्यता पावलेले आहेत. नाट्यसंहिता आणि नाट्यप्रयोग यांचे भान एकत्रितपणे राखले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. कला तत्त्वचिंतक, समालोचक व पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांनी ‘रत्नाकर’ (१९२९), ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ (१९४० - १९४२) व (१९४६ - १९७०) या पत्रिकांचे संपादनही केले. काळे यांचा ‘प्रतिमारूप आणि रंग’ हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला.

- वि. ग. जोशी

काळे, केशव नारायण