Skip to main content
x

काळेले, रामचंद्र अनंत

रामचंद्र काळेले यांचा जन्म सेंधवा या गावी झाला. ते बी.ए., एल्एल.बी., संस्कृत काव्यतीर्थ झाले. मूळ गाव जुन्नर परंतु नोकरीनिमित्त इंदूरला स्थायिक झाले. पोलीस प्रॉसिक्यूटर म्हणून नोकरी केली. शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि चारित्र्यसंपन्न म्हणून नोकरीत त्यांचा दबदबा होता. इंदूर

चित्रकार होण्याचे त्यांचे स्वप्न होते. सुट्टीच्या दिवशी गावाबाहेर जाऊन जलरंगात निसर्गचित्रे रंगविण्याचा छंद आयुष्यभर जोपासला. मित्रमंडळींनी ही चित्रे फ्रेम करून आपापल्या घरात जपली. काही ब्रिटीश मित्रांनी ती परदेशीही नेली. पुठ्ठ्याची घरे बनविण्याचाही छंद त्यांनी जपला. देखण्या घरांच्या प्रतिकृती बनवण्यातला आगळा आनंद त्यांना मिळत असे. त्यांच्या ‘वाग्वसंत’ (१९३४), ‘भावपूर्णा’ (१९४३), ‘ओळखीचे सूर’ (१९४१) या सुरुवातीच्या कविता संग्रहांतील कवितांवर भा.रा.तांबे आणि रविकिरण मंडळातील कवींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. ‘वाग्वसंत’ या काव्य संग्रहातील मोठा भाग हा प्रणय, शृंगार, प्रेमविषयक कविता यांचा आहे. या संग्रहाला कविवर्य भा.रा. तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. तांब्यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करून त्यांनी या काव्य संग्रहातील कविता सौंदर्यपूर्ण प्रतिमांच्या भाषेत मांडल्या गेल्या. ‘तांबे एक अध्ययन’ हे समीक्षात्मक पुस्तकही लिहिले. ‘रूपवती’ आणि महात्मा गांधींवरील ‘गीत निर्वाण’ ही त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. ‘हिमअंगार’ आणि ‘नवे अलंकार’ ही पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. ‘तांबे एक अध्ययन’ हा भा.रा.तांबे यांच्या कवितेचे मूल्यमापन करणारा त्यांचा ग्रंथ महत्त्वाचा आहे.

काळेले हे नवकवींच्या मागच्या पिढीतले असूनही त्यांनी नवकवितेचे स्वागत केले व हे वळण आत्मसातही केले. त्यांची सुरुवातीची कविता गेय होती. त्यांना अतिशय देखणे व्यक्तिमत्त्व लाभले होते. ते उत्तम काव्यगायन सादर करीत. अनेक कविसंमेलनांतून त्यांनी काव्यगायन केले. त्यांची उत्तरकालीन कविता मुक्तछंदात्मक होती. त्यांत दलितोद्धाराची तळमळ दिसते. संस्कृत भाषेचे आणि काव्याचे विलक्षण प्रेम होते. त्यातूनच ‘विक्रमोर्वशीय’ या संस्कृत काव्याचे मराठीत रूपांतर केले. म.ना. अदवंत यांच्या मतानुसार कुसुमाग्रज, वा.रा.कांत, बा.भ.बोरकर, श्रीकृष्ण पोवळे आणि रा.अ.काळेले हे पाच कवी म्हणजे आधुनिक कविपंचक आहे.

काळेले यांच्या बाबतीत एक विशेष नोंद म्हणजे पुढे मराठी कवितेच्या प्रांतात नाव मिळविलेल्या या कवीला बालपणी नीट मराठी बोलताही येत नव्हते. वडिलांमुळे त्यांच्यावर इंग्रजीचाच प्रभाव होता. पुढे मात्र त्यांनी मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांच्या पत्नी प्रतिभा स्वत: कविता करत असत. ‘मनपाखरू पाखरू’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

- शशिकला उपाध्ये

 

संदर्भ
१.देशपांडे अ.ना.; ‘आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास’ १९२० ते १९५०भाग २; व्हीनस प्रकाशन, पुणे
काळेले, रामचंद्र अनंत